फुटबॉलला प्रोत्साहन हवे | पुढारी

फुटबॉलला प्रोत्साहन हवे

अनादी बारुआ, फुटबॉल प्रशिक्षक

भारतात फुटबॉलचा खेळ सुरू होऊन सुमारे 130 वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला असला तरी जागतिक पातळीवर अजूनही आपण चाचपडत खेळत आहोत. स्वातंत्र्याच्या अगोदर आणि नंतर देशात फुटबॉलची स्थिती चांगली होती.1952 मध्ये आपण आशियाई क्रीडा स्पर्धेत विजय मिळवला होता; मात्र 1970 च्या दशकापासून आपली पीछेहाट होऊ लागली. अर्थात, आजूनही अनेक प्रकारच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात, खेळाडूही येत आहेत; मात्र आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली पाटी कोरीच आहे.

ब्रिटिश राजवटीत भारतात फुटबॉलची पायाभरणी झाली आणि तिचा विकास कोलकता शहरात झाला. आज भारताने सर्वच खेळांत प्रावीण्य मिळवण्यास सुरुवात केलेली असताना फुटबॉलमध्येही चमकदार कामगिरी करावी, अशी अपेक्षा भारतीय चाहत्यांना आहे. सरकार आणि अकादमीच्या पातळीवर दिल्या जाणार्‍या प्रोत्साहनाला कॉर्पोरेट जगाचे बळ मिळाले तर आगामी काळात प्रतिभावान फुटबॉलपटू निर्माण होण्यास वेळ लागणार नाही. आधुनिक फुटबॉलची अधिकृत पायाभरणी 1863 मध्ये इंग्लंडमध्ये फुटबॉल असोसिएशनच्या रूपातून झाली आणि त्यात खेळाचे प्राथमिक नियम तयार केले.

याच काळात भारतासह जगातील अनेक देशांत बि-टिशांच्या वसाहती होत्या आणि त्यांची राजवट होती. साहजिकच इंग्रजांबरोबरच आधुनिक फुटबॉलने भारतासह अनेक देशांत शिरकाव केला आणि तो लोकप्रिय खेळ झाला. आपल्या देशात डुरंड कप ही सर्वात जुनी स्पर्धा मानली जाते. आशिया खंडातील ही सर्वात जुनी स्पर्धा होय. पहिल्यांदा त्याचे आयोजन 1888 मध्ये सिमल्यात झाले होते. अर्थात, फुटबॉलला बळकटी कोलकता येथून मिळाली आणि तीच भारतातील फुटबॉलची राजधानी म्हणून ओळखली गेली. कोलकता इंग्रजांचीही राजधानी होती. कोलकता येथे मोहन बागान, ईस्ट बंगला, मोहामेडन स्पोर्टिंग यासारखे क्लब सुरू झाले आणि तेथून नामांकित खेळाडू बाहेर पडले.

आज देशातील लहान-मोठे फुटबॉल क्लब आणि अकादमींच्या संख्येचा विचार केल्यास ती 50 हजारांपेक्षा अधिक आहे. जुन्या खेळाडूंत पीके बॅनर्जी, अरुण घोष, सेलेन मन्ना, तुलसीदास बलराम, मोहंमद सलीम, पीटर थंगराज, मेवालाल, करीम, जर्नल सिंह यांसारख्या नावांचा उल्लेख करता येईल. नवीन पिढीतील खेळाडूंत सुनील छेत्री, सुब-त पाल, वायचुंग भुतिया, लालपेखलुआ, गुरप्रीत संधू, संदेश झिंगन, तेलम सिंह, धीरज सिंह, प्रणय हलदर, कुमाम सिंह, आशिक कुरुनिया यांनी आपल्या खेळाच्या कौशल्यावर लोकप्रियता मिळवली. सुनील छेत्रीने तर भारताकडून सर्वाधिक गोल करण्याचा विक्रम केला आहे.

ऑलिंपिकमध्ये सहभागी होत नसल्याने आणि जागतिक करंडक पात्रता फेरीतच गारद होत असल्याने आपले मनोधैर्य आणि आत्मविश्वास खचलेला आहे. त्याचवेळी क्रिकेटमध्ये विश्वचषक जिंकल्याने आणि सतत यश मिळाल्याने त्याची लोकप्रियता वाढत गेली आणि तरुणांचा कल क्रिकेटकडे वळला. फुटबॉलच्या बाबतीत जे घडले, तेच हॉकीतही घडले. त्यातही आपण मागे पडू लागलो. जिल्हा आणि राज्य पातळीवर अकादमींची स्थापना करणे गरजेचे आहे, जेणेकरून नव्या प्रतिभावन खेळाडूंना प्रोत्साहन मिळेल आणि त्यांना योग्य मार्गदर्शन मिळेल. निवृत्त झालेल्या फुटबॉलपटूंची मदतही याकामी घ्यायला हवी.

फुटबॉलच्या विकासात एक सर्वात मोठे आव्हान म्हणजे प्रशिक्षकांचा अभाव. यावरही लक्ष देणे गरजेचे आहे. आपल्या देशातील सर्व खेळांत पैसा आला असेल, लोकप्रियता वाढली असेल, तरीही खेळ संस्कृतीचा अभाव आहे. यासाठी मैदानांची संख्या पुरेशी असणे अपेक्षित आहे. अनेक शाळांत आणि महाविद्यालयांना मैदाने नाहीत. खेळांसाठी लागणारी प्राथमिक साधने नाहीत. अभ्यासाचा वेळ वाढत असल्याने त्यांना खेळण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. पालक आणि शिक्षकांनी याकडे लक्ष द्यायला हवे. खेळ हा केवळ करिअरच नाही, तर आरोग्यदायी जीवनासाठीही आवश्यक आहे.

Back to top button