एक जिवलग हरपला…! | पुढारी

एक जिवलग हरपला...!

डॉ. प्रतापसिंह ग. जाधव मुख्य संपादक, दै. ‘पुढारी’

आमदार पी. एन. पाटील अकस्मात आपल्यातून निघून गेले. अनपेक्षितपणे निघून गेले. ते गेलेत यावर विश्वास ठेवणे कठीण आहे; पण हा नियतीचा खेळ आपल्याला मान्य करावाच लागेल. त्यांचा व माझा गेल्या पन्नास वर्षांतील मैत्रीचा जिव्हाळा होता. आमचे मैत्र दिवसेंदिवस वाढतच गेले होते. त्यांच्या अकाली आणि अकस्मात जाण्याने माझे वैयक्तिक कधीही न भरून निघणारे नुकसान झालेले आहे. मी, पी. एन. पाटील, शाहू महाराज, यशवंतराव थोरात आणि व्ही. बी. पाटील अशी आमची पाच जणांची एक अतूट मैत्री होती, अतूट नाते होते. आम्ही महिन्यातून एकदा तरी गप्पांसाठी भेटत असू. राजकारणासह सर्व विषयांवर गप्पांची मैफल रंगायची. आजही आम्हा कोणाला पी. एन. नाहीत, हे पटतच नाही.

पी. एन. पाटील हे मूळचे सडोली खालसा गावचे असले, तरी त्यांचे बालपण हे कोल्हापूर शहरातच गेले. शुक्रवार पेठेत त्यांचा व आमचा स्नेह जुळला. आम्ही दोघे एकाच गल्लीत राहत होतो. त्यांचे मोठ बंधू आर. डी. पाटील व एस. डी. पाटील तसेच पी. एन. पाटील आमचे अगदी कौटुंबिक व घरगुती संबंध होते. एक स्पष्टवक्ता व सच्चा मित्र ही त्यांची ओळख होती. बर्‍याचदा आमची गप्पांची मैफल रंगत असे. कधी ते माझ्याकडे येत, तर मीही त्यांच्याकडे जात असे. प्रत्येक कौटुंबिक कार्यक्रमात आम्ही एकत्रच असायचो. आमच्या गप्पांचा फड चांगलाच रंगत असे. त्यामुळे पी. एन. यांच्या स्वभावाची व कर्तृत्वाची मला चांगली ओळख होती. त्यांना कधीही गर्व नसायचा. काँग्रेस पक्षावर अपार निष्ठा असणारे देशातील एक निष्ठावंत म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. काँग्रेस पक्ष आणि गांधी, नेहरू घराणे यांच्याशिवाय त्यांनी दुसरा विचार कधीही केला नाही. कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे (आय) अध्यक्ष म्हणून सलग वीस वर्षे केलेले काम ही त्यांच्या निष्ठेची पोचपावती आहे. 1999 च्या दरम्यान जिल्ह्यात कमकुवत होत असलेल्या काँग्रेस पक्षाला नवी उभारी व बळ देण्याचे काम पी. एन. यांनी केले. देशाचे तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर त्यांचे अपार प्रेम व निष्ठा होती. राजीव गांधी यांचा कोल्हापुरात उभा केलेला पूर्णाकृती पुतळा व सलग तीस वर्षे सुरू असलेली सद्भावना दौड हेही त्यांच्या निष्ठेचेच प्रतीक आहे.

पी. एन. यांचे मूळ घराणे हे राजकीय विचारसरणी असलेले. त्यांनी त्यांचे वडील निवृत्ती रामजी पाटील, चुलते दत्तात्रय रामजी पाटील यांच्याकडून त्यांनी राजकारण व समाजकारणाचा वसा घेतला होता. अगदी युवावस्थेत असताना त्यांची जी समाजातील कामासाठी तळमळ, जिद्द व उर्मी होती, तीच कायम होती. त्यांच्या पत्नी जयादेवी या राज्याचे माजी कृषी राज्यमंत्री श्रीपतराव बोंद्रे यांच्या सुकन्या. त्यांच्या घराण्याचाही राजकीय वारसा होता. दोन्ही घराण्यांचा राजकीय वारसा सांभाळत असताना समाजकारणात त्यांनी मोठी आघाडी घेतली. ग्रामीण राजकारणाचे अनेक रंगढंग त्यांनी अनुभवले. या अनुभवातूनच त्यांच्यातला एक निष्ठावंत नेता घडला. पाच दशके त्यांनी कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणावर, समाजकारणावर आणि सहकारावर आपल्या नेतृत्व कौशल्याचा ठसा उमटवलेला आहे.

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत गेली चार दशके शेतकर्‍यांचे प्रतिनिधित्व करताना त्यांनी शेतकर्‍यांना न्याय द्यायचे काम खर्‍याअर्थाने केले. या जिल्ह्यातील शिखर बँकेचे अध्यक्ष म्हणून सलग पाच वर्षे त्यांनी केलेले काम संपूर्ण राज्याच्या सहकार क्षेत्राला दिशादर्शक असे ठरले. गोरगरीब, सर्वसामान्य शेतकरी, अल्प व अत्यल्पभूधारक शेतकरी यांच्या हिताची तळमळ त्यांच्या प्रत्येक कृतीतून दिसत असेे. शेतकरी हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे, तो सक्षम झाला, तर ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम होईल, हे ओळखून त्यांनी जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकर्‍यांसाठी विविध योजना राबवल्या. शेतकर्‍यांच्या मुला-मुलींच्या लग्नासाठी कर्ज योजना, घरबांधणीसाठी कर्ज योजना, शेतातील पाईपलाईनसाठी कर्ज योजना, बैलजोडी, दुभती जनावरे खरेदीसाठी कर्ज योजना, टी.व्ही., मोटारसायकल व मोठ्या वाहनांसाठी कर्ज योजना अशा विविध योजना राबवून त्यांनी सामान्य माणूस उभा करायचा केलेला प्रयत्न कौतुकास्पद आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील जवळपास पाच लाख शेतकर्‍यांना कर्जावरील व्याजदरात दोन टक्के सवलत देऊन त्यांनी संपूर्ण देशातील बँकिंग क्षेत्राला एक वेगळा आदर्श घालून दिला आहे.

सर्वसामान्य शेतकरी, बेरोजगार तरुण, लघुउद्योग कुटिरोद्योग करणारे तरुण यांच्या हाताला स्वयंरोजगार मिळवून देण्यासाठी त्यांनी श्रीपतरावदादा सहकारी बँकेची स्थापना केली. आज ही बँक राज्यातील अग्रगण्य व प्रगतिशील बँकांमध्ये गणली जाते. हे पी. एन. यांचे सहकारातील मोठे यश आहे. या बँकेची 4 हजार कोटी रुपयांची उलाढाल पी. एन. यांच्यावरील विश्वासाचे निदर्शक आहे. राज्यातील सूतगिरण्या अनेक अडचणींशी सामना करत असतानाही त्यांनी स्थापन केलेली राजीवजी सहकारी सूतगिरणी सुरळीतपणे चाललेली आहे. या सूतगिरणीतून शेकडो लोकांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगार मिळाला असून, येथे उत्पादित होणारे सूत परदेशातही निर्यात होते. यात पी. एन. यांचे व्यवस्थापन कौशल्य दिसून येते. अडचणीतील सहकारी संस्था चालवण्याचे वादातीत कौशल्य त्यांच्याकडे होते. हे त्यांनी भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून दाखवून दिलेले आहे.

शेतकर्‍यांना न्याय दिला, तरच अर्थव्यवस्था सक्षम होईल, सामाजिक उन्नती होईल, या हेतूने त्यांनी गावोगावी विकास सेवा संस्था, दूध संस्था, पतसंस्था, पाणीपुरवठा संस्था व अनेक शिक्षण संस्था उभारणीत मोलाची भूमिका बजावली आहे. स्वतःची खासगी संस्था काढण्याऐवजी सहकारी तत्त्वावरील संस्था काढून सामाजिक विकासाचे ध्येय त्यांनी गाठले.

जुने सांगरूळ व सध्याच्या करवीर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करताना त्यांनी या मतदार संघाचा चेहरामोहरा बदलण्याचे काम केले. अगदी लघू व मध्यम पाटबंधारे प्रकल्पापासून वेगवेगळ्या विकास कामांबाबत निधी उपलब्ध केला. त्यांनी केलेल्या विकासकामांची यादी खूपच मोठी आहे. धामणी प्रकल्पासारख्या अनेक वर्षे जटिल झालेल्या प्रकल्पाचा तिढा सोडवून तो प्रकल्प मार्गी लावण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत. गोरगरीब, कष्टकरी, शेतकरी व शेतमजुरांप्रती त्यांची असणारी निष्ठा वादातीत होती. राज्याच्या विधिमंडळात त्यांनी शेतकर्‍यांच्या विविध प्रश्नांवर सातत्याने आग्रही मागण्या मांडल्या व शासनाकडून मान्य करून घेतल्या. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना देशातील शेतकर्‍यांसाठी मोठी कर्जमाफी योजना जाहीर करण्यात आली. त्याचवेळी महाराष्ट्र शासनानेही कर्जमाफी योजना जाहीर केली होती. त्यापूर्वी सर्वसामान्य शेतकर्‍यांचे कर्ज माफ करण्यात यावे, ही आग्रही मागणी सर्वप्रथम करणारे पी. एन. हे एकमेव आमदार होते.

मध्यंतरीच्या काळात राज्य शासनाने राज्यातील कर्जबाजारी शेतकर्‍यांची कर्जे माफ करण्याचा निर्णय घेतला होता; मात्र दरवर्षी प्रामाणिकपणे कर्जफेड करणार्‍या शेतकर्‍यांना याचा काहीच लाभ झाला नव्हता. या प्रश्नावर पी. एन. यांनी विधानसभेत अतिशय अभ्यासपूर्ण व आक्रमकपणे आपले मत मांडले. या शेतकर्‍यांना प्रत्येकी एक लाख रुपये सानुग्रह अनुदान द्यावे, अशी आग्रही मागणी केली होती. या मागणीची दखल घेत राज्य शासनाने राज्यातील शेतकर्‍यांना प्रत्येकी 50 हजार रुपयांप्रमाणे सानुग्रह अनुदान जाहीर केले. या निर्णयामध्ये पी. एन. यांच्या पाठपुराव्याचा मोठा वाटा होता. या निर्णयामुळे राज्यातील प्रामाणिक शेतकर्‍यांना दहा हजार कोटी रुपयांचा, तर कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकर्‍यांना 425 कोटी रुपयांचा फायदा झाला. शेतकरी व शेतीवरील अविचल निष्ठेमुळे पी. एन. यांनी त्यांचे अनेक प्रश्न मार्गी लावले. विलासराव देशमुख आणि मी पुण्याला लॉ कॉलेजला एकत्र शिकत होतो. त्यावेळी हॉस्टेललादेखील एकत्र राहत होतो. विलासराव देशमुख हे आम्हा दोघांचेही मित्र. त्यांनी मुख्यमंत्री असताना पी. एन. यांना मंत्रिपद देणे आवश्यक होते, असे माझे ठाम मत आजही आहे.

राजकारण करत असताना समाजकारणाचा त्यांनी कधीही विसर पडू दिलेला नव्हता. निष्ठावंत कार्यकर्त्यांची फौज हे पी. एन. यांच्या यशाचे गमक होते. ते स्वतःही निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांची बाजू सातत्याने उचलून धरत. सामान्यातील सामान्य कार्यकर्त्याच्या प्रपंचाची काळजी करणारा व प्रसंगी कार्यकर्त्यासाठी पदरमोड करणारा नेता, अशी पी. एन. यांची ओळख अधोरेखित झालेली होती. राजकीय जीवनात यश, अपयश आले, तरी कधीही त्यांनी खोटी आश्वासने दिली नाहीत. कोणत्याही पदाचा गर्व बाळगला नाही, अथवा टेंभा मिरवला नाही. कामासाठी आलेल्या कार्यकर्त्याचा पक्ष, गट-तट, जात-पात न पाहता समोरासमोर कामाची निर्गत करण्याचा त्यांचा आवाका खूप मोठा होता. कोणत्याही प्रकारचे खोटे आश्वासन न देता जे काम होणार तेच करायचे व जे होणार नाही ते स्पष्टपणे सांगायचे, हा त्यांचा रोखठोक स्वभाव होता. शेकडो कार्यकर्त्यांना नोकर्‍या देऊन त्यांना आधार द्यायचे काम पी. एन. यांनी केले.

कोल्हापुरात मराठा आरक्षण व टोल आंदोलनासारख्या ज्या अनेक चळवळी झाल्या, त्यात ते नेहमीच अग्रभागी व आग्रही राहिलेले होते. आजच्या राजकारणात कोणत्याही प्रकारचे खोटे आश्वासन न देता दिलेला शब्द पाळणारे नेतृत्व अशी त्यांची ओळख संपूर्ण राज्याला होती. केवळ राजकारणासाठी किंवा सत्तेसाठी आणि पदासाठी राजकारण न करता सामाजिक उन्नतीसाठी राजकारण करताना पी. एन. यांनी केलेली कृतिशील वाटचाल जिल्ह्याच्या विकासात मैलाचा दगड ठरली. त्यांच्या या वाटचालीतूनच समाजाच्या तळागाळातील कार्यकर्ते, शेतकरी, शेतमजूर व कष्टकर्‍यांनी त्यांच्या नेतृत्वावर अगदी निर्धास्तपणे विश्वास टाकलेला होता. कोल्हापूरचा पुरोगामी वारसा त्यांनी प्रामाणिकपणे व निष्ठेने जोपासलेला होता. आजच्या धावपळीच्या व कामाच्या व्यस्त युगातही पी. एन. व माझा मैत्रीचा धागा कायम राहिला. बर्‍याचदा ते माझ्याकडे चर्चेसाठी येत. मीही त्यांच्याकडे जात असे. जिल्ह्याच्या विकासाच्या प्रश्नावर ते माझ्याकडे आग्रही भूमिका मांडत. सामाजिक विकासाचा ध्यास व अपार विश्वास हाच आमच्या मैत्रीत समान धागा होता. राजकारण व समाजकारण यांची गल्लत न करता दोन्हीची सांगड घालून विकासासाठी पी. एन. यांनी दिलेले योगदान खरोखरच गौरवास्पद व नव्याने राजकारणात येणार्‍या पिढीला मार्गदर्शक ठरेल. त्यांच्या निधनाने कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारणात, समाजकारणात आणि सहकारात कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झालेली आहे. त्यांना माझी विनम्र आदरांजली!

Back to top button