तडका : लेक लाडकी या घरची..! | पुढारी

तडका : लेक लाडकी या घरची..!

सध्या महाराष्ट्रामध्ये विविध प्रकारचे नाट्यमय प्रसंग जवळपास प्रत्येक मतदारसंघात सुरू आहेत. कोण घरचा, कोण बाहेरचा, यावरूनही जोरात वाद सुरू आहे. नाटकांची नावे घ्यायची झाली, तर ‘वाहतो ही दुर्वांची जुडी’ म्हणून कोणी कोणाच्या पायाशी काहीतरी ठेवून शरण जात आहे. काही झोपलेले बंडखोर जागे होतात आणि ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ या नाटकाची आठवण करून देतात. बारामती मतदारसंघामध्ये ‘लेक लाडकी या घरची’चा नाट्यप्रयोग जोरात सुरू आहे. सहसा मुलीचे लग्न झाले की, ती सासरी नांदायला जाते आणि तिथून पुढे सासरचे आडनाव तेच तिचे आडनाव होते. बर्‍याच वेळेला लेकी माहेरी राहून तिथून कारभारावर लक्ष ठेवत असतात. त्याच घरामध्ये कुठून तरी एक सून आलेली असते. तिचे मूळचे आडनाव सोडून तिने सासरचे नवीन आडनाव धारण केलेले असते. मग अशा ठिकाणी असा प्रश्न उभा राहतो की, या घरातील मूळ व्यक्ती कोण? लेक की सून? यावरून रंगात आलेला भाऊबंदकीचा प्रयोग सध्या बारामतीमध्ये जोमात सुरू आहे.

इथे ताईंचे लग्न झालेले आणि आडनाव बदलून झालेले असले, तरी ताई माहेरीच तळ ठोकून आहेत. एरवी ताईंचा जास्त वावर सासरपेक्षा माहेरीच असायचा. शिवाय एकुलती एक कन्या असल्यामुळे आई-वडिलांना लाडकी, त्यामुळे जरा जास्तच लाड झाले. त्यात वडील राष्ट्रीय वगैरे पातळीवरील नेते असले, तर मग बघायलाच नको. दरम्यान, ताईंचे लग्न झाल्यानंतर दादांचेपण लग्न झाले आणि एक सून घरामध्ये आली, ती स्वतःचे मूळचे आडनाव सोडून सासरचे आडनाव लावून सासरच्या घरी राहू लागली. याचा अर्थ नणंद-भावजय एकाच घरात राहत होत्या; परंतु कालांतराने राजकारणाच्या पटलावर सोंगट्या फिरतात त्याप्रमाणे खेळ रंगत असतो. दादा आणि बाबा वेगवेगळे झाले. त्याबरोबर ताई आणि सूनबाई याही वेगळ्या झाल्या. सूनबाई आणि ताई यांच्यामध्ये बारामतीमध्ये लढत रंगात आलेली आहे. लोकसभेचे इलेक्शन लागल्यानंतर ताई विद्यमान खासदार असल्याने साहजिकच त्यांनी त्या मतदारसंघावर दावा ठोकला. दरम्यान, आधारवड काका आणि छत्रछायेमध्ये मोठे झालेले दादा यांच्यामध्ये वैरभाव उत्पन्न झाला आणि एकाच घराण्यातील हे दोन पुरुष एकमेकांच्या विरुद्ध उभे ठाकले.

आता या बारामती मतदारसंघामध्ये ताईपण आहेत आणि विरुद्ध वहिनी उमेदवार आहेत. या दोघी एकमेकींच्या कट्टर प्रतिस्पर्धी आहेत. लाडक्या लेकीसाठी बाबांना प्रचार करणे भाग आहे आणि पत्नीसाठी दादांना बाहेर पडणे आवश्यक आहे. आपल्या सर्वच मतदारांना काकांनी एक आवाहन केले आहे. मूळ घराण्यातील स्त्री असणार्‍या व्यक्तीला मतदान करावे, असे त्यांनी आवाहन केले आहे. आता इथे प्रश्न असा उभा राहिला की, सासरी गेलेल्या ताई या मूळ घराण्याच्या आहेत की बाहेरून आलेली लेक म्हणजेच झालेली सून मूळ घराण्याच्या वारस आहेत? हा एक नवीनच वाद महाराष्ट्र राज्यामध्ये उत्पन्न झाला आहे. आजकाल विवाहित महिला या सासरचे आणि माहेरचे अशी दोन्ही आडनावे लावत असतात. त्यामुळे ताईंच्या आडनावामध्ये माहेरचे आडनाव आहे आणि सूनबाईंचे आडनाव मात्र आपल्या पतीच्या घराण्याचे एकमेव असे आहे. मूळ पवार कोण आणि मतदारसंघामध्ये पावर कोणाची, यावर सध्या रणकंदन सुरू आहे.

संबंधित बातम्या
Back to top button