पश्चिम आशियातील अशांतता | पुढारी

पश्चिम आशियातील अशांतता

इराण-इस्रायलमध्ये निर्माण झालेल्या संघर्षाने पुन्हा एकदा जगाचे लक्ष वेधले आहे. 1979 मध्ये इराणचे इस्रायलच्या बाजूने असलेले प्रमुख मोहम्मद रेझा शहा यांची सत्ता उलथवून टाकली गेली. अयातुल्ला खोमेनी यांच्या नेतृत्वाखालील ‘इस्लामिक रेव्होल्यूशन’ने इस्रायलला शत्रू नंबर एक ठरवले. 1979 च्या इराणमधील या क्रांतीनंतर तीनच वर्षांनी इस्रायलने लेबाननमध्ये आक्रमण केले. त्यानंतर इराणच्या रेव्होल्यूशनरी गार्डस्ने ‘हेजबुल्ला’ संघटनेची स्थापना केली. इस्रायल हा अमेरिकेचा निकटतम मित्रदेश आहे. तसेच अमेरिका हे पाश्चात्त्य विचारांचे प्रतीक असल्यामुळे, हे दोन्ही देश इराणच्या शत्रुस्थानी आहेत.

1983 मध्ये हेजबुल्लाने लेबाननमधून पाश्चात्त्य तसेच इस्रायली फौजा बाहेर हाकलण्यासाठी आत्मघातकी पथकांमार्फत बाँब वर्षाव केला. या शतकाच्या सुरुवातीला युरेनियमचे गुप्तपणे समृद्धीकरण करणार्‍या इराणविरोधात जागतिक संघटनांनी कारवाई करावी, अशी मागणी इस्रायलने केली होती. 2006 मध्ये इस्रायलने लेबाननमध्ये घुसून हेजबुल्लाला चिरडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. मग इस्रायल हा धोकादायक आणि प्राणघातक असा कॅन्सर असल्याची शापवाणी इराणचे सुप्रीम नेते अयातुल्ला खामेनी यांनी उच्चारली; मात्र सहा वर्षांपूर्वी अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणशी असलेला अणुकरार अचानकपणे रद्द केला.

वास्तविक इराणला नीट वळणावर आणण्यासाठी अमेरिकेचे पूर्वाध्यक्ष बराक ओबामा यांनी हा करार केला होता. त्यामुळे इराण दहशतवादी मार्गावरून मागे फिरेल, अशी आशा होती; परंतु अमेरिका-इराण करार रद्द झाल्यामुळे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांना हर्षवायू झाला. चार वर्षांपूर्वी अमेरिकेने इराणी लष्कराचे जनरल कासिम सोलेमनी यांची हत्या घडवून आणली, तेव्हा इस्रायलने जल्लोष केला होता. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि इस्रायलचे माजी पंतप्रधान याइर लापिड यांनी दोन वर्षांपूर्वी इराणला अण्वस्त्रे न देण्याविषयी करार केला. हा सर्व इतिहास लक्षात घेता, इराण व इस्रायल या देशांतील वैमनस्य किती जुने आणि तीव्र आहे, हे लक्षात येते. अलीकडेच, 1 एप्रिल रोजी सीरियाची राजधानी दमास्कस येथील इराणी वकिलातीवर इस्रायलने हवाई हल्ला केला. हल्ल्याचा बदला घेण्याची गर्जना इराणने केली होती. रेव्होल्युशनरी गार्डस्ने शनिवारी संयुक्त अरब अमिरातीहून भारताकडे येणार्‍या एका मालवाहू जहाजाचा ताबा घेतला. हे जहाज इस्रायलशी संबंधित असून, या जहाजावर 17 भारतीय कर्मचारी आहेत.

वास्तविक इराण-इस्रायल या संघर्षात सामान्य भारतीय प्रवाशांना त्रास दण्याचे कोणतेही कारण नव्हते; परंतु इराण हा माथेफिरू देश असून, त्याने नेहमीच दहशतवाद्यांना प्रोत्साहन दिले. मालवाहू जहाज ताब्यात घेतल्याच्या घटनेचे भयंकर परिणाम भोगावे लागतील, असा दम इस्रायलने दिला. इराणचे समर्थन असेलल्या येमेनच्या हुती बंडखोरांनी काही महिन्यांपूर्वी लाल समुद्रातील जहाजावर हल्ला करून जागतिक व्यापार विस्कळीत केला होता. इराणने केवळ जहाजच ताब्यात घेतले नाही, तर तीनशेपेक्षा जास्त ड्रोन आणि क्षेपणास्त्रे इस्रायलवर डागली. सुदैवाने इराणचे हल्ले रोखण्यात आणि ड्रोन व क्षेपणास्त्रे नष्ट करण्यात इस्रायलला यश आले. त्यामुळे सामान्य लोक त्यापासून बचावले; परंतु केवळ स्वतःचा बचाव करून थांबणारा इस्रायल हा देश नाही. तोही इराणच्या कृत्याचा बदला घेईल, अशी शक्यता असून, त्यामुळे अ‍ॅक्शन-रिअ‍ॅक्शनचा हा संघर्ष सुरूच राहण्याची शक्यता आहे.

अलीकडेच गाझा पट्टीत युद्धग्रस्तांसाठी अन्नधान्याची मदत सामग्री पोहोचविणार्‍या ‘वर्ल्ड किचन सेंटर’ या स्वयंसेवी संस्थेच्या मदत कार्यकर्त्यांच्या वाहनावर ड्रोनहल्ला केल्याप्रकरणी इस्रायलवर ठपका आला होता. हे युद्ध नियमांचे थेट उल्लंघन होते. आता इराणच्या या भ्याड हल्ल्याला एकत्रितपणे राजनैतिक प्रत्युत्तर देण्यासाठी जी-7 राष्ट्रांची बैठक बोलावण्यात येईल, असे बायडेन यांनी जाहीर केले आहे. इराणला अद्दल घडविण्यासाठी आम्ही इस्रायलच्या पाठीशी राहणार नाही, हे अमेरिकेने सूचित केले आहे. याचे कारण, उद्या अमेरिका या संघर्षात उतरली, तर रशिया व चीनही काही स्वस्थ बसणार नाहीत आणि त्यामुळे जग युद्धाच्या खाईत लोटले जाण्याचा धोका आहे. गेल्या ऑक्टोबरमध्ये इस्रायल-हमास युद्ध सुरू झाल्यानंतर, पश्चिम आशियात आगीच्या ज्वाला फैलावू लागल्या. त्यामुळे लाखो पॅलेस्टिनींना निर्वासित व्हावे लागले आणि शेकडो लोकांचा मृत्यू झाला.

इराणवर थेट हल्ला चढवावा, असे आज इस्रायलमधील जहाल गटास वाटते, तर तेथील अन्य काहींच्या मते, विभागातील देशांची मोट बांधून इराणला वठणीवर आणले पाहिजे. गेल्या 7 ऑक्टोबरच्या हमासच्या हल्ल्यात इस्रायलचे संरक्षक कवच अभेद्य नसल्याचे दिसून आले होते. त्यामुळे नेतान्याहू यांना देशांतर्गत रोषाला सामोरे जावे लागले. आता मात्र ते इराणचा हल्ला आम्ही यशस्वीपणे परतवून लावला, अशी शेखी मिरवत आहेत. उलट, इस्रायलने केलेल्या आगळिकीस आम्ही कसे उत्तर दिले, असा दावा करून इराणमधील सत्ताधीश जनतेवर प्रभाव टाकू पाहत आहेत. या छोट्या युद्धाच्या परिणामी, इस्रायल, लेबानन आणि इराकने त्यांच्या हवाई सीमा बंद केल्या. एअर इंडियाने तेलअवीवच्या दिशेने जाणारी उड्डाणे तात्पुरती स्थगित ठेवली.

भारत सरकार प्रवाशांच्या सुटकेसाठी प्रयत्नांची शिकस्त करत आहे; परंतु कोरोनानंतर सर्व काही सुरळीत झाल्यावर, रशिया-युक्रेन युद्ध, इस्रायल-हमास धुमश्चक्री आणि त्यामागोमाग इस्रायल-इराण हल्ले-प्रतिहल्ले यामुळे कच्च्या तेलाचेच नव्हे, तर विविध कमोडिटींचे भाव वधारले आहेत व ते अजूनही वाढू शकतात. सोमवारी शेअर बाजार तर कोसळलाच. जग मंदीच्या खाईतून बाहेर आले असतानाच, पुन्हा काही युद्धखोर देश समरांगणी उतरले आहेत. वास्तविक अफगाणिस्तानात हात पोळल्यानंतर अमेरिकेने तेथून अंग काढून घेतले होते; परंतु पुतीन, खोमेनी, शी. जिनपिंग, नेतान्याहू यासारखे नेते हे मुळातच युद्धखोर आहेत. यंदाच्या अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षीय निवडणुकीत ट्रम्प यांचा विजय झाल्यास, त्यांच्या रूपाने या युद्धखोर नेत्यांना जणू एक नेताच मिळेल. ती वेळ येऊ नये, अशीच जगातील सामान्य जनांची इच्छा राहील.

Back to top button