महागाई अचानक का वाढली? | पुढारी

महागाई अचानक का वाढली?

कोरोना महामारीचा परिणाम उत्पादनावर पडला आहे. त्याचप्रमाणे जागतिक तापमानवाढ आणि जल-वायू परिवर्तन या संकटांनी यावर्षी पिकांची हानी केली आहे. लॉकडाऊन उठविल्यामुळे मागणी वाढत आहे. त्यामुळेच महागाई वाढत आहे.

काही आठवड्यांपूर्वीची गोष्ट. लाखो टन माल असलेली जहाजे विक्रमी संख्येने अमेरिकेच्या सर्वांत जास्त वर्दळ असलेल्या बंदरासमोर ओळीने उभी होती. एकीकडे अशा प्रकारे माल उतरवून घेण्यासाठी बंदरासमोर जहाजे एका पाठोपाठ एक उभी राहून अनेक आठवडे वाट पाहत होती, तर दुसरीकडे अमेरिकेतील दुकानांमध्ये मालाचा तुटवडा जाणवत होता. अनेक देशांमध्ये हीच परिस्थिती होती. या आठवड्यात जगातील अनेक देशांना हाच प्रश्न पडला आहे तो असा की, संपूर्ण जगात एकाच प्रकारची टंचाई का जाणवत आहे? परिस्थिती रुळावर येण्यास आणखी किती काळ जाईल? काही तज्ज्ञांनी त्यांची मते मांडून या परिस्थितीचे विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला.

बर्नस्टीन रिसर्च संस्थेत व्यवस्थापकीय संचालक आणि वरिष्ठ विश्लेषक म्हणून काम करणारे स्टेसी रॅसगन हे अमेरिकेतील सेमी कंडक्टरच्या बाजारपेठेवर नजर ठेवतात. त्यांच्या म्हणण्यानुसार, जागतिक स्तरावर एक वेगळ्याच प्रकारचा ट्रेंड दिसून येत आहे. उत्पादनासाठी आवश्यक असणार्‍या वस्तूंची कमतरता आहे आणि त्यामुळेच नव्याने तयार झालेला माल बाजारात येत नाही आणि दर वाढत जातात. याचा मोठा परिणाम मोटारींच्या बाजारपेठेत पाहावयास मिळत आहे. एक मायक्रोकंट्रोल चिप केवळ 50 पैशांना मिळते; मात्र 50 हजार डॉलर किंमत असलेली मोटार या चिपशिवाय तयार होऊ शकत नाही. यावर्षी सेमी कंडक्टरच्या टंचाईमुळे 10 लाखांहून अधिक मोटारी तयारच होऊ शकल्या नाहीत आणि वाहन उद्योगाला 200 अब्ज डॉलर एवढे नुकसान सहन करावे लागले.

स्टेसी यांच्या म्हणण्यानुसार, कोरोना काळात ‘वर्क फ्रॉम होम’ आणि ‘स्टडी फ्रॉम होम’चे प्रमाण वाढत गेले. त्यामुळे बाजारपेठेत पर्सनल कम्प्युटर्सची मागणी अचानक वाढली. संपूर्ण यंत्रणेसाठी हा मोठा झटका होता. 2020 मध्ये सुमारे 30 कोटी पर्सनल कॉम्प्युटर्स विकले गेले. 2022 पर्यंत 34 कोटी पर्सनल कॉम्प्युटर्सची विक्री होईल आणि हाच ट्रेंड 2025 पर्यंत कायम राहील, असा अंदाज आहे. दहा वर्षांपासून पर्सनल कॉम्प्युटर्सची बाजारपेठ रोडावत चालली होती. परंतु, महामारीमुळे या बाजाराने अचानक उसळी घेतली. एका बुडत चाललेल्या व्यवसायात अचानक एवढी तेजी येईल, याचा अंदाज सेमी कंडक्टर उत्पादकांना नव्हता. ते या उद्योगासाठी उत्पादन वाढविण्याचा प्रयत्न करीत आहेत. काही कंपन्या महामारीपासून धडा घेऊन आधीपासूनच चिप्सचा साठा करून ठेवत आहेत. स्टेसी म्हणतात की, महामारीच्या प्रारंभापासूनच उत्पादनावर परिणाम जाणवू लागला आणि अजूनही परिस्थिती पूर्वपदावर आली नाही. अनेक कंपन्यांना चिप्सच्या ऑर्डर दिल्यानंतर जवळजवळ वर्षभर वाट पाहावी लागत आहे. परिस्थिती सुधारण्यासाठी एक वर्षापेक्षा अधिक कालावधी लागण्याचीही शक्यता आहे.

संपूर्ण जगभरात मालाची टंचाई का जाणवू लागली आहे, या मूळ प्रश्नाकडे आता वळूया! कोविड महामारीचा परिणाम उत्पादनावर पडला. त्याचप्रमाणे जागतिक तापमानवाढ आणि जल-वायू परिवर्तन या संकटांनी यावर्षी पिकांची हानी केली. डॉ. नेला रिचर्डसन या एडीपी रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये मुख्य अर्थतज्ज्ञ आहेत. त्या म्हणतात की, महामारी काळात किराणा मालाच्या दुकानांत मालाची कमतरता होती. दुकानदार मर्यादित स्वरूपातच माल खरेदी करीत होते. आता लॉकडाऊन मागे घेतला आणि लोक घराबाहेर पडू लागले. त्यांची मागणी वाढू लागली. परंतु, आता कामगारांची कमतरता आहे. उत्पादनापासून पुरवठा आणि वाहतूक अशा सर्वच क्षेत्रांत कामगारांची मोठ्या प्रमाणावर चणचण आहे. श्रमबाजार ही सध्याची मोठी समस्या आहे, असे म्हणता येते.

गेल्या वर्षी तसेच यावर्षीही संपूर्ण जगाने महामारीबरोबरच जल-वायू परिवर्तनाचे दुष्परिणामही सहन केले. अतिवृष्टी आणि वादळांनी भारतात भाज्यांचे नुकसान केले, तर अमेरिकेत चक्रीवादळाने कपाशीची शेती नष्ट केली. ब्राझीलमध्ये हिमवृष्टीमुळे कॉफीच्या शेतीचे अपरिमित नुकसान झाले. गेल्या वर्षी ब्राझीलमधील कॉफी पिकविणार्‍या भागात भीषण दुष्काळ पडला आणि 30 टक्के पीक नष्ट झाले. दुष्काळामुळे तर किमती वाढल्याच; परंतु हिमवृष्टीने परिस्थिती आणखी गंभीर बनली. वाहतूक व्यवस्थेत मनुष्यबळाचा असलेला अभाव हाही सध्याच्या जागतिक महागाईला कारणीभूत ठरला आहे.

– अमोल पवार, कॅलिफोर्निया

Back to top button