राज आत्मसमर्पण करतील? | पुढारी

राज आत्मसमर्पण करतील?

मुंबई वार्तापत्र : विवेक गिरधारी

महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिंदे सेनेत विलीन करा आणि शिंदे सेनेचे प्रमुख व्हा असा प्रस्ताव म्हणे दिल्ली दरबाराने राज ठाकरे यांच्यासमोर ठेवला, अशी एक मोठी बातमी गेल्या आठवड्यात पेरली गेली. हा विलीनीकरणाचा प्रस्ताव जुना; पण तो भाजपचा नाही. तुम्ही आमच्यात या, सेनेचे प्रमुख व्हा, बाकी सारे मी सांभाळतो, हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रस्ताव राज यांनी मागेच धुडकावला. आता दिल्ली दरबाराचा प्रस्ताव कोणत्याही विलीनीकरणाचा नाही. तो आत्मसमर्पणाचा आहे, असे म्हणतात.

दिल्लीहून मुंबईत दाखल होऊन आता पंधरवडा उलटला, तरी राज ठाकरे काही बोलत नाहीत. राज यांनी मराठीच्या मुद्द्यावर कुठेही तुतारी वाजवू नये, भाजपच्या दुश्मनांसाठी एकही सभा घेऊ नये. आपला मराठी बाणा दिल्ली दरबारच्या चरणी अर्पण करावा आणि निश्चिंत राहावे, असा तर प्रस्ताव भाजप श्रेष्ठींनी राज यांच्यासमोर ठेवला नाही ना? ‘प्रस्ताव’ हा शब्द सभ्यतेचा भाग झाला. भाजपने तसा हुकूमच सोडला असेल. आता मराठी हक्क सोडायचा, तर बोलायचे कशावर, हा प्रश्न घेऊन राज बुचकळ्यात पडले असू शकतात. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत राज यांनी 10 सभा घेतल्या; पण त्यांचा काही फायदा झाला नाही, असे दोन्ही काँग्रेसने तेव्हा म्हटले. गंमत अशी की, त्याच ‘राज’सभांची पुनरावृत्ती यावेळी नको म्हणून भाजप राज यांना वळचणीला आणून बांधू पाहत आहे. भाजप एखाद्याला उघडपणे शत्रू मानत असेल, तर तो शत्रू नशीबवान! कारण, त्याला भाजपला उघडपणे विरोध करण्याचे स्वातंत्र्य तरी मिळते. भाजप ज्यांना गुपचूप शत्रू मानतो, त्यांच्याशीच उघडपणे मैत्री करतो आणि हा शत्रू कसा वाढणार नाही, यासाठी हरतर्‍हेचे प्रयत्न मग भाजपकडून केले जातात. राज यांना अचानक दिल्ली भेटीचे निमंत्रण येणे, हा याच प्रयत्नाचा भाग होय. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत घेतलेल्या ‘राज’सभा पुन्हा भरवल्या गेल्या, तर हा राज थेट राष्ट्रीय स्तरावर पोहोचेल आणि मग त्याला आवरणे कठीण होऊन बसेल हे भाजपच्या ‘थिंक टँक’ने आधीच नोंदवून ठेवले होते. सुधींद्र कुलकर्णी हे भाजपच्या सत्ताधीशांच्या गोटातले नाहीत. ते तसे वाजपेयी-अडवाणी पंथाचे. अटलबिहारी वाजपेयी यांचे सहायक राहिलेले. गत लोकसभा निवडणुकांत ‘राज’सभांचे पर्व उभे राहू लागताच सुधींद्र कुलकर्णींनी केलेली ही नोंद सध्याच्या भाजप सत्ताधीशांनी नीट लक्षात ठेवलेली दिसते.

सुधींद्र यांची ही नोंद 24 एप्रिल 2019 रोजीची आहे. ते लिहितात, ‘राज ही संसदीय निवडणूक लढवत नाहीयेत, तरीही काहीच आठवड्यांत ते या निवडणूक प्रचाराचे स्टार बनले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एकही उमेदवार लोकसभा रिंगणात उतरवलेला नाही, तरीही या निवडणूक हंगामातल्या सर्वात टोलेजंग सभा या राज यांच्याच होत आहेत. राज यांचे राजकारण आतापर्यंत महाराष्ट्रापुरते मर्यादित राहिले, तरीही आज राज जे काही बोलतात, ज्या तर्‍हेने बोलतात ते आज देशभर ऐकले जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि भाजपला थेट टार्गेट करण्याचे अपूर्व धाडस दाखवणारा असा स्टार प्रचारक महाराष्ट्रातच नव्हे, महाराष्ट्राबाहेरही नाही.’ या नोंदीचा शेवट सुधींद्र एक सल्ला देऊन करतात. ते म्हणतात, राज यांना आता एक राष्ट्रीय नेता म्हणून शोध घेण्याची वेळ आली आहे. या देशाची श्रीमंत अशी विविधता आपल्यात सामावून घेत एक सर्वसमावेशक राष्ट्रीय नेता म्हणून त्यांनी पुढे यावे. याचे कारण, राज यांची ‘राज’सभांतली भाषणे सोशल मीडियावर लोकप्रिय ठरली आहेत. ही भाषणे मोदीविरोधी, भाजपविरोधी असूनही ती मराठीप्रमाणेच अमराठी जनतेतही ऐकली-पाहिली जात आहेत. लोकसभेचा हा प्रचार संपल्यानंतर आमच्याकडेही अशा ‘राज’सभा घ्या अशी निमंत्रणे राज यांना उत्तरेतल्या राज्यांमधून येत आहेत. तेव्हा ‘राज, प्रवाहाविरुद्ध निघा’ अशाच एका ‘राज’सभेला तेव्हा यूट्यूबवर मिळालेल्या प्रतिक्रिया पाहिल्या, तर काश्मीर ते कन्याकुमारी आणि मणिपूर ते मुंबई अशा चारही मार्गांनी कुठून कुठून लोक राज यांच्या मुद्द्यांच्या बाजूने उभे दिसतात. नोकर्‍यांवर भूमिपुत्रांचा हक्क पहिला, या राज यांच्या भूमिकेचे समर्थन उत्तर प्रदेश, बिहारसारख्या राज्यांतूनही होताना दिसते.

या 2019 च्याच ‘राज’पर्वातील एका मुलाखतीवर कृणाल वासवा म्हणतो, ‘मैं गुजरात से हूं. मेरे यहां यूपी, बिहार और राजस्थानी लोगोने गव्हर्न्मेंट जॉब में परेशान करके रखा हैं. राज साब की बात बिलकुल सही हैं.’ बीबीसीच्या एका मुलाखतीवर थेट ओडिशातून आलेली प्रतिक्रिया बोलकी आहे. हा कुणी अब्दुल बारी लिहितो, ‘इथे ओडिशातही 80 टक्के नोकर्‍या गुजराती, राजस्थानी मारवाडींच्या हाती गेल्या आहेत. उद्योग-धंदे, मोठे प्रकल्पही परप्रांतीयांकडे जात आहेत. परप्रांतीयांचे लोंढे महाराष्ट्राने जसे झेलले तशीच स्थिती आता ओडिशातही उद्भवेल.’ याचा अर्थ असा की, प्रत्येक प्रांतात भूमिपुत्रांच्या हक्काची लढाई आहेच आणि म्हणून प्रत्येक राज्याला राज यांचा मुद्दा आपला मुद्दा वाटतो. यातून एक राष्ट्रीय प्रवाह निर्माण करण्याची संधी असताना राज प्रवाहपतीत होण्याच्या मार्गावर दिसतात. मराठी हक्कांसाठी लढणारे राजसोबत घेतले, तर परप्रांतीय मते जातील म्हणून राष्ट्रवादीने त्यांच्याशी युती करण्यास नकार दिला. काँग्रेसने तर त्यांना राजकीय अस्पृश्यच ठरवले. म्हणजे राज यांच्या भाजपविरोधी सभा चालतात, राजकीय मित्र म्हणून मात्र राज नको, असे मराठीविरोधी धोरण दोन्ही काँग्रेसने पत्करले. भाजपलाही तशी राज यांच्या मराठी मुद्द्याची अडचणच आहे. ती दूर करण्यासाठी मग अयोध्येचे महंत शिवतीर्थावर येऊन राज यांना भगवी शाल देऊन गेले. राज यांना हिंदू जननायक ठरवले गेले. एका कडवट मराठी नेत्याचे हे तसे राजकीय धर्मांतरच म्हणायचे! हे धर्मांतर मराठी माणसासमोर पेच निर्माण करणारे आहे. मराठीचा एकच धर्म-राजधर्म आणि तोच महाराष्ट्रधर्म! तो बाटवून कुणी राजकीय धर्मविस्तार करू पाहत असेल, तर मराठीलाही राजधर्म सोडून चालणार नाही.

उणा हि आपुला धर्म पर-धर्माहुनी बरा । स्व-धर्मात भला मृत्यु पर-धर्म भयंकरें।
ही विनोबांची गीताई कुणीतरी शिवतीर्थावर पोहोचवावी, असे मुंबई इलाख्याला फार वाटते.

Back to top button