सेला बोगदा का महत्त्वाचा?

सेला बोगदा का महत्त्वाचा?

अलीकडील काळात भारताने चीनच्या सीमेलगतच्या भागात पायाभूत सुविधांचा विकास मोठ्या प्रमाणावर आणि गतिमानतेने करण्यावर भर दिला आहे. अलीकडेच लोकार्पण करण्यात आलेला सेला बोगदा हा जगातील सर्वांत लांब दुहेरी लेनचा बोगदा याद़ृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. हा बोगदा भारतीय सैन्याला चीन-भारत सीमेवर सैन्य, शस्त्रे आणि यंत्रसामग्री जलद हलवण्यास मदत करणारा असल्याने भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी हा बोगदा महत्त्वाचा ठरणार आहे.

स्वातंत्र्योत्तर काळात भारत-चीन संबंधांमध्ये चढ-उतार होत राहिले असले तरी गेल्या 75 वर्षांत चीनचा कावेबाजपणा किंवा भारताला गाफील ठेवून पाठीत वार करण्याची त्यांची रणनीती लपून राहिलेली नाही. मुळात चीन हा भारताबरोबर विविध पद्धतींची युद्धनीती अवलंबत आला आहे. सायकॉलॉजिक वॉरफेअर, इन्फर्मेशन वॉर, सायबर वॉरफेअर अशा अनेक पद्धतींचा वापर करून भारताच्या प्रगतीच्या-विकासाच्या मार्गावर सतत अडथळे आणत राहणे हा चीनचा सुनियोजित अजेंडा आहे. यामध्ये भारताचा अविभाज्य भाग असणार्‍या विविध भूभागांवर दावा करणे, सुरुवातीला तेथे सैन्याची घुसखोरी करणे, ते ताब्यात घेण्याचा प्रयत्न करणे, यासारख्या अनेक कुरघोड्या चीन करत आला आहे. अशा आगळिकींचे रूपांतर संघर्षामध्ये झाल्यानंतर चीन अचानक भूमिका काहीशी मवाळ करतो आणि भारतासोबत चर्चेचे नाटक करतो. यामध्ये भारताला गाफील ठेवून चीन सीमेवरील सज्जता वाढवतो. या कुटील रणनीतीचा अनेकदा अनुभव घेतल्यानंतर चीनला शह देण्यासाठी गेल्या 10 वर्षांच्या कालखंडात भारतानेही चीनलगतच्या सीमेवर पायाभूत सुविधांचा मोठ्या प्रमाणावर विकास करण्यास प्रारंभ केला आहे. तसेच हे सर्व प्रकल्प जलदगतीने पूर्ण करण्यावर भारताचा भर आहे. अलीकडेच लोकार्पण केलेला 'सेला बोगदा' हा याचे एक उत्तम उदाहरण म्हणता येईल.

न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग ही अत्याधुनिक पद्धत वापरून बांधलेला सेला बोगदा बर्फाच्या रेषेच्या खूपच खाली आहे. यामुळे हिवाळ्यात बर्फ पडूनही या बोगद्यातील रस्ता बंद होणार नाही. त्यामुळे वास्तविक नियंत्रण रेषेच्या भारताच्या विरुद्ध असलेल्या चीनच्या वेस्टर्न थिएटर कमांडबरोबर मुकाबला करण्यासाठी भारतीय सैन्याची क्षमता वाढणार आहे. या भागात भारतीय लष्कर वेगाने पुढे पोहोचेल आणि चीनला चोख प्रत्युत्तर देऊ शकेल.

भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी हा बोगदा महत्त्वाचा ठरणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 9 मार्च, 2024 रोजी इटानगर येथून दूरद़ृश्य प्रणालीद्वारे सेला बोगद्याचे लोकार्पण केले आणि तवांगला जोडणारा सेला बोगदा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. बॉॅर्डर रोड ऑर्गनायझेशनने (बीआरओ) बांधलेला हा बोगदा संरक्षण दलाची सज्जता वाढवण्यात मोलाचे योगदान देणारा आहे. तसेच यामुळे सीमावर्ती भागाच्या सामाजिक, आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे. हा बोगदा तवांगला सर्व ऋतूंमध्ये कनेक्टिव्हिटी प्रदान करेल आणि लोकांसाठी प्रवास सुखकर करेल. 'बीआरओ'ने हा बोगदा अरुणाचल प्रदेशातील पश्चिम कानेंग जिल्ह्यातील तवांगला आसामच्या तेजपूरशी जोडणार्‍या रस्त्यावर फूट उंचीवर बांधला आहे. एकूण 825 कोटी रुपये खर्चून बांधलेला हा बोगदा बलिपारा-चरिदुआर तवांग रोडवरील सेला खिंड ओलांडून तवांगला सर्व ऋतूंमध्ये कनेक्टिव्हिटी प्रदान करेल. सेला बोगदा नवीन ऑस्ट्रियन टनेलिंग पद्धती वापरून बांधला आहे आणि त्यात सर्वोच्च मानकांची सुरक्षा वैशिष्ट्ये समाविष्ट आहेत. हा प्रकल्प या प्रदेशात केवळ जलद आणि अधिक कार्यक्षम वाहतूक मार्गच प्रदान करणार नाही, तर देशासाठी सामरिकद़ृष्ट्याही महत्त्वाचा आहे.

1962 च्या चीन-भारत युद्धादरम्यान महावीर चक्र पुरस्कार विजेते जसवंतसिंग रावत यांनी सेला आणि मुरा नावाच्या दोन स्थानिक मोनपा मुलींच्या मदतीने या पर्वतीय खिंडीत चिनी सैन्याला रोखले होते. युद्धानंतर सेला मारली गेली आणि मुरा पकडली गेली. रावत यांनी शत्रूला 72 तास रोखून धरले होते. तीन दिवसांनी चीनला कळले की, ते केवळ एका शूर लढाऊ भारतीय सैनिकाबरोबर सामना करत आहेत. त्यानंतर चिनी सैन्याने केलेल्या हल्ल्यात रावत शहीद झाले. भारतीय सैन्याने जसवंतसिंग यांचे जसवंतगढ युद्ध स्मारक बांधले आणि खिंड, बोगदा आणि तलावाला सेला मुलीच्या बलिदानासाठी 'सेला' नाव दिले. सेला बोगद्याच्या उत्तरेस आणि जंगच्या पूर्वेस 2 कि.मी. अंतरावर असलेल्या नुरानांग धबधब्याला 'मुरा' हे नाव दिले आहे. सेला बोगदा हा जगातील सर्वात लांब दुहेरी मार्ग असणारा बोगदा आहे.

सेला पासच्या 400 मीटर खाली स्थित सेला बोगदा हिवाळ्याच्या हंगामातही एक महत्त्वाचा रस्ता सुरू ठेवतो. हा बोगदा भारतीय सैन्याला भारत-चीन सीमेवर सैन्य, शस्त्रे आणि यंत्रसामग्री जलद हलवण्यास मदत करतो. सेला एनएच-13 शी एका नवीन 12.4 कि.मी. रस्त्याने जोडलेला आहे. यामुळे दिरांग आणि तवांगमधील अंतर 10 किलोमीटरने कमी केले आहे. 'बीआरओ'ने दोन बोगदे बनवले आहेत. समुद्रसपाटीपासून सुमारे 13 हजार 800 फूट उंचीवरील सेला पासच्या खाली दोन बोगदे बनवले गेले. एक बोगदा 1790 मीटर लांबीचा, तर दुसरा 475 मीटर लांबीचा असून, 980 मीटर लांबीचा आपत्कालीन मार्गही या बोगद्याच्या ठिकाणी बांधला जात आहे. दोन बोगदे एकत्रितपणे सेला खिंडीच्या खालून जातात.

भूतान आणि तिबेटच्या (चीन) सीमेवरील एक मोठे शहर आणि लष्करीद़ृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण म्हणून तवांगची ओळख आहे. हिवाळ्यात काही महिने तवांगला रस्तेमार्गाने पोहोचणे अशक्य होते. बर्फ पडल्यामुळे तवांगकडे जाणारा सेला पास काही महिने बंद असायचा. आता दररोज सुमारे 4 हजार सैन्य आणि नागरी वाहने या बोगद्याचा वापर करू शकणार आहेत. बोफोर्स तोफांसह सर्व प्रकारची जड लष्करी वाहने आणि लष्करी हार्डवेअरच्या हालचालींना बोगद्याचे परिमाण सपोर्ट करेल. हिवाळ्यातील अतिवृष्टीमुळे सेला खिंडीत प्रचंड बर्फ साचतो, त्यामुळे रस्ता पूर्णपणे बंद होतो. आता सेला बोगद्यामुळे तवांगकडे जाणारा रस्ते प्रवास अधिक सुरक्षित होईल.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news