सुरक्षा कडक करण्याची गरज | पुढारी

सुरक्षा कडक करण्याची गरज

कमलेश गिरी

भारताची सिलिकॉन व्हॅली असणार्‍या बंगळूरमधील नामांकित रामेश्वरम कॅफेमध्ये अलीकडेच झालेल्या स्फोटामुळे देशभरात खळबळ उडाली आहे. या परिसरात आयबीएम, एसएपीसारख्या आयटी कंपन्या आणि स्टार्टअप कंपन्या आहेत. देशातील तंत्रज्ञानाचे हे केंद्र आहे. बहुराष्ट्रीय कंपन्यांना व्यवसाय करण्याची ही लोकप्रिय जागा आहे. स्फोटामुळे बंगळूरसारख्या टेकसिटी राष्ट्रविघातक शक्तींच्या हिटलिस्टवर असल्याचे दिसते.

कर्नाटकच्या विधानसभेत पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्याने राज्यातील वातावरण तापलेले असतानाच 1 मार्च रोजी दुपारी एकच्या सुमारास भारताची सिलिकॉन व्हॅली बंगळूरमधील नामांकित रामेश्वरम कॅफे स्फोटाने हादरले. आयटी हब असलेल्या भागात स्फोट झाला. याठिकाणी आयटीत काम करणार्‍या युवकांची वर्दळ असते. या स्फोटामुळे आग लागली नाही; मात्र कॅफेतील वॉशबेसिन असलेल्या भागात प्रचंड धूर पसरला. तेथे खिळे आणि नट-बोल्ट विखुरलेल्या स्थितीत आढळून आले. बंगळूरमधील या कॅफेत नेहमीच गर्दी असते.

या स्फोटात नऊ जण जखमी झाले. बंगळूरमधील एका कॅफेमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाने सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे. या घटनेनंतर प्रशासन तत्काळ सक्रिय झाले आणि गुन्हेगाराला पकडण्यासाठी सापळा रचला. सुदैवाने हे स्फोटक सौम्य तीव्रतेचे असल्याने जास्त नुकसान झाले नाही. शुक्रवारी दुपारी एक तरुण बॅग घेऊन कॅफेमध्ये घुसला आणि जेवणाची ऑर्डर दिल्यानंतर बॅग तिथेच टाकून निघून गेल्याची माहिती आहे. त्यानंतर काही वेळातच स्फोट झाला. त्या तरुणाचे छायाचित्र सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाले आहे. या घटनेला दहशतवादी कारस्थान मानण्यास पोलीस अजूनही नकार देत आहेत. बेकायदेशीर कृती कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

नोव्हेंबर 2022 मध्ये मंगळूर येथील स्फोटानंतर तपास आणि शोध पथकाने अनेक धक्कादायक खुलासे केले होते. आताच्या स्फोटानंतर तपास यंत्रणांनी अनेक बाजूंनी तपास सुरू केला आहे. यामध्ये शहरातील हॉटेल, रेस्टॉरंट आणि लोकप्रिय ठिकाणी सुरक्षेत अनेक उणिवा दिसून आल्या. त्याचवेळी अशा प्रकारची ठिकाणे ही दहशतवाद्यांसाठी ‘सॉफ्ट टार्गेट’ असतात. या तपास कामात सुमारे 8 पथके काम करत आहेत. मंगळूर येथे नोव्हेंबर 2022 मध्ये एका ऑटो रिक्षात एक व्यक्ती प्रेशर कुकरमध्ये आयईडी स्फोटके लपवून नेत होती; मात्र वाटेत स्फोट झाला. या स्फोटाचा सखोल तपास केला असता आयईडी स्फोटके ही कादरी मंजुनाथ मंदिर येथे नेण्यात येणार असल्याचे निष्पन्न झाले.

तपासकर्त्यांच्या मते, मंगळूर येथील प्रेशर कुकर स्फोट हा इसिसने घडवून आणला आणि यात लष्कर-ए-तय्यबाच्या एका दहशतवाद्याचा समावेश होता.

रामेश्वरम कॅफेतील स्फोट हा झोप उडवणारा आहे; कारण बंगळूर ही कर्नाटकची राजधानी आहे आणि अनेक देशी आणि विदेशी सॉफ्टवेअर कंपन्या आणि शैक्षणिक संस्थांचे मुख्यालयही येथे आहे. या परिसरात आयबीएम, एसएपीसारख्या आयटी कंपन्या आणि स्टार्टअप कंपन्या आहेत. देशातील तंत्रज्ञानाचे हे केंद्र आहे. बहुराष्ट्रीय कंपन्यांना व्यवसाय करण्याची ही लोकप्रिय जागा आहे. हा कॅफे आहारासाठी आणि खाद्यपदार्थांसाठी प्रसिद्ध आहे. तेथे अनेक उद्योजक, तरुण इंजिनिअर नियमितपणे दुपारचे भोजन करतात. नेमकी हीच वेळ साधून स्फोट घडवून आणला.

व्यापारी शहरात अशा स्फोटांच्या घटनांमुळे तेथील व्यावसायिकांच्या मनोधैर्यावर विपरीत परिणाम होतो. विशेषतः परदेशी कंपन्या अशा असुरक्षित ठिकाणी आपला व्यवसाय चालवणे योग्य मानत नाहीत. त्यामुळेच हा स्फोट कर्नाटक सरकारसाठी आव्हान बनला आहे. या स्फोटानंतर बंगळूरच्या हॉटेलमालकांनी हॉटेलच्या प्रवेशद्वारावर मेटल डिटेक्टर बसविण्याचा निर्णय घेतला. तसेच मेटल डिटेक्टरमध्ये स्फोटके स्कॅन झाल्यास सायरन वाजवणारे तंत्रदेखील काहींनी बसविले आहे. आपली तपास यंत्रणा पुरेशी सक्षम आहे. त्यामुळे हळूहळू का होईना, परंतु या स्फोटाचे धागेदोरे शोधले जात आहेत. त्यांना सर्वांनी सहकार्य केले पाहिजे.

Back to top button