तडका : जा बिबट्यांनो… परत फिरा रे! | पुढारी

तडका : जा बिबट्यांनो... परत फिरा रे!

गेल्या काही वर्षांत संपूर्ण राज्यभर बिबट्या किंवा ज्याला बिबळ्या असेही म्हटले जाते, त्यांनी जो धुमाकूळ घातला आहे, त्यामुळे ‘जा बिबट्यांनो, परत फिरा रे घराकडे’ म्हणजेच जंगलाकडे आपुल्या असे म्हणण्याची वेळ आली आहे. बिबट्या हा ‘स्मार्ट’ प्राणी आहे. मांजर कुळातील असल्यामुळे अजिबात आवाज न करता वावरणे आणि जसे जमेल तसे भक्ष्य पकडून त्याचा फडशा पाडणे यात त्याचा क्रमांक सर्वात वरचा आहे. सध्या भारतामध्ये बिबट्यांचा वंश विस्तार मात्र झपाट्याने होत आहे. त्याचा अधिवास म्हणजे जंगल किंवा उसाचे फड सोडून तो बाहेर पडला तर गावाच्या आसपास वावरत असलेली पाळीव भटकी कुत्री, गुरे, शेळ्या, कोंबड्या यांवर तो आपली गुजराण सहज करतो. वन्यजीव आणि मानव संघर्षामध्ये बिबटे, वाघ, अस्वल हे प्राणी माणसांवर हल्ले करतात.

शेतकर्‍यांच्या घराबाहेर किंवा शेतात बांधलेली गुरे, आजूबाजूला असणारे कुत्रे हे बिबट्याचे मुख्य भक्ष्य होत चालले आहेत. इतर वन्यप्राण्यांमुळे होणारा विध्वंसही काही कमी नाही. शेकडो एकरांतील पीक हरिणांचे कळप रातोरात ओरबडून खातात. रानडुकरांसारखे प्राणी केळीपासून हरभर्‍यापर्यंत सर्व पिकांचा नायनाट करतात. नीलगायी किंवा ज्याला राज्याच्या काही भागात रोही असे म्हणतात, हासुद्धा एक हरीणवर्गीय प्राणी शेतकर्‍यांसाठी त्रासदायक होऊन बसला आहे. आता या सर्व वन्यप्राण्यांचे करायचे काय, असा प्रश्न उभा राहिल्यावर त्या सर्वांनाच ‘परत फिरा,’ अशी विनंती करण्याची वेळ आली आहे. आता तरी आमचे नुकसान थांबवा, असे म्हणावे लागत आहे.

या वन्यप्राण्यांना पळवून लावण्याचा तूर्त असलेला एकमेव उपाय म्हणजे शेतकर्‍याला शेतात रात्रभर जागत थोड्या-थोड्या वेळाने फटाके फोडावे लागतात. या फटाक्यांच्या आवाजाने हे वन्यप्राणी पळून जातात. याचा अर्थ हा वन्यजीवांचा धुमाकूळ शेतकर्‍यांच्या संसारावरही नांगर फिरवत आहे की काय, असे वाटते. दिवसभर शेतीची कामे करायची आणि रात्रभर शेतात राखण करायची, हे सोपे काम नाही. शेती करताना शेतकर्‍याला असंख्य अडचणी येतात, त्यात या नवीन समस्येने भर घातली आहे. वन्यजीव कायदे इतके कडक आहेत की, त्यांना मारणे शक्य नाही. बिबट्या हा प्राणी वाघाइतका मोठा नसला तरी अंदाजे 80 ते 100 किलो वजनाचा असतो आणि तो रात्रीच्या वेळेला सक्रिय होतो. विशेषतः आजकाल तरुण मुले-मुलीसुद्धा संध्याकाळच्या वेळी बाहेर पडून पहाटे-पहाटे घरी परततात, तेव्हा साहजिकच त्यांची तुलना या निशाचर प्राण्यांसोबत करण्याचा मोह होतो.

जे काय असेल ते असो, परंतु ऊस उत्पादन असलेल्या भागात आणि जंगलांच्या आजूबाजूच्या परिसरात माणूस आणि वन्यजीव यांच्यातला संघर्ष आता टोकाला पोहोचला आहे. लोक आता या वन्यजीवांना मारण्याची परवानगी द्या, अशी आर्त साद शासनाकडे घालत आहेत. बिबटे आणि वन्यजीव प्राणी जंगलांतच राहिले पाहिजेत यासाठी काही ना काही उपाययोजना करावीच लागणार आहे. हरीण, रानडुक्कर, नीलगाय, अस्वल, वाघ आणि विशेषत्वाने बिबटे यांना ‘जा, आता परत फिरा,’ अशी विनंती करण्याची वेळ महाराष्ट्रातील जनतेवर व वन खात्यावर आली आहे, हे निश्चित.

Back to top button