Marathi Bhasha Gaurav Din | मराठी राज भाषा गौरव दिन : मराठी भाषेसमोरील ‘ही’ आहेत आव्हाने! | पुढारी

Marathi Bhasha Gaurav Din | मराठी राज भाषा गौरव दिन : मराठी भाषेसमोरील 'ही' आहेत आव्हाने!

डॉ. अरुण शिंदे

जी भाषा, ती बोलणार्‍या समाजास रोजगार देऊ शकत नाही, ती भाषा तो समाज सोडून देण्याचा प्रयत्न करतो, असे अमेरिकन गणिती तज्ज्ञ डॅनिअल एब्राम यांनी म्हटले आहे. मराठी राज भाषा गौरव दिनानिमित्ताने मराठीच्या सद्य:स्थितीची व मराठीपुढील आव्हानांची चर्चा चिकित्सा करणे आवश्यक आहे. (Marathi Bhasha Gaurav Din)

मराठीपुढील सर्वात मोठे आव्हान शिक्षणाच्या क्षेत्रात आहे. मराठी माध्यमातून आणि मराठी भाषा विषय घेऊन शिकणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. अकरावी कला शाखेला मंजूर विद्यार्थी संख्येच्या निम्म्याही जागा भरल्या जात नाहीत. महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची जमवाजमव करताना शिक्षकांच्या नाकी नऊ येत आहेत. विद्यार्थ्यांना संपर्क करून, त्यांना प्रलोभने दाखवून कशी तरी किमान विद्यार्थी संख्या गाठण्यासाठी शिक्षक धडपडताना आढळून येतात. वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये मराठी विषयातून बी.ए., एम.ए. करणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली आहे. पुरेसे विद्यार्थी कागदोपत्री दाखवून विषय टिकवून ठेवण्यात शिक्षक धन्यता मानतात. पदवी व पदव्युत्तर मराठी विभागाच्या वर्गात हाताच्या बोटांवर मोजण्याइतकी विद्यार्थ्यांची उपस्थिती असते. बहुसंख्य विद्यार्थ्यांना मराठी भाषा, साहित्य व एकूण शिक्षणाची आस्था नसते. केवळ परीक्षा देणे आणि पदवी  मिळवणे एवढाच त्यांचा उद्देश असतो. पदवीधर होऊनही त्यांना मुद्देसूदपणे विचार व्यक्त करता येत नाहीत. (Pudhari Editorial)

याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे मराठी विषय घेऊन पदवी मिळवल्यानंतर पुढे त्याला स्वत:च्या भवितव्याची कोणतीही संधी दिसत नाही. मराठीतून शिक्षण घेतल्यावर रोजगार मिळवण्याची कुठलीही शाश्वती नाही. त्यामुळे जोपर्यंत रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणारी भाषा म्हणून मराठी पुढे येत नाही, तोपर्यंत मराठीतून शिक्षण घेण्यास विद्यार्थी तयार होणार नाहीत आणि जी भाषा शिक्षणातून बाजूला जाते, ती भाषा हळूहळू लोकव्यवहारातूनही बाजूला जाऊ शकते आणि हाच मराठीपुढे मोठा धोका आहे. याचा राज्यकर्त्यांनी आणि मराठी समाजाने गंभीर विचार केला पाहिजे.

इंग्रजीचे मराठीवरील आक्रमण हा चिंतेचा विषय आहे. मध्यमवर्गीय नागरिक, उच्चभ्रू वर्ग यापूर्वीच इंग्रजीधार्जिणा होऊन नव्या संधी, रोजगार, पदे यांचे लाभ भोगत होता. आता निमशहरी, ग्रामीण भागातील जनसमूहही इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे आकर्षित होत आहे. मराठी माध्यमातून शिकून काय उपयोग, हा प्रश्न टोकदारपणे, सार्वजनिकरीत्या विचारला जात आहे. याचे समाधानकारक उत्तर राज्यकर्ते व धोरणकर्त्यांकडे नाही. सध्या सेमी इंग्रजीच्या नावाखाली पहिलीपासून गणित व विज्ञान विषयांचे शिक्षण इंग्रजीमधून दिले जाऊ लागले आहे. मानव्यविद्या, सामाजिकशास्त्रे, वाणिज्य या क्षेत्रांतही मराठी माध्यम कालबाह्य ठरत असून, पालकांचा, विद्यार्थ्यांचा इंग्रजी माध्यमाकडे कल वाढला आहे. मातृभाषेपासून मुलांना दूर नेणे म्हणजे त्यांची सामाजिक पाळेमुळे खणून काढणे आहे.

ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान ज्या भाषेतून प्रकटते, ती भाषा जगावर अधिराज्य गाजविणार. म्हणून विज्ञान तंत्रज्ञानातील नवनव्या संकल्पना, शोध, नवनिर्मित वस्तूंशी निगडित शब्दांना सामावून घेण्यासाठी मराठीचा शास्त्रीय पारिभाषिक परीघ तातडीने विस्तारला पाहिजे. आधुनिक विज्ञान आपल्या भाषेत येत राहिलेे की, वैज्ञानिक प्रश्नांचा आपल्या भाषेत विचार करण्याची सवय लोकांना लागेल. विज्ञाननिष्ठ समाजनिर्मितीची ही पहिली पायरी असेल. विज्ञानासाठी मराठी बलिष्ठ होणे सर्वात गरजेचे आहे. विज्ञानाच्या पाठ्यपुस्तकांमधील वैज्ञानिक परिभाषा व विज्ञानविषयक लेखन विद्यार्थी व सर्वसामान्य नागरिक यांना समजेल, त्यांच्यात विज्ञानविषयक आस्था व अभिरुची निर्माण होईल अशा सोप्या भाषेत केले पाहिजे.

महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार पुस्तके तयार करण्याच्या हेतूने विद्यापीठ पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ अस्तित्वात आले. सामाजिक शास्त्रांची पदवी पातळीवरची अनेक चांगली पुस्तके या मंडळाने प्रसिद्ध केली; परंतु पुढे शासनाने हे मंडळ बंद केले. मराठीत विविध ज्ञानशाखांतील विषयांची ग्रंथसंपदा, दर्जेदार पाठ्यपुस्तके, संदर्भग्रंथ नाहीत. ज्ञानकोश, परिभाषाकोश आणि शब्दकोश हे पुरेशा प्रमाणात निर्माण करू शकलो नाही. मराठीच्या शब्दसंग्रहात लक्षणीय स्वरूपाची भरही टाकता आलेली नाही. नव्या ज्ञानशाखा, नवी संज्ञापन तंत्रे यावर हुकूमत प्राप्त करण्यासाठी मातृभाषेत ज्ञानाची निर्मिती करत ती जगाच्या प्रांगणात धाडली पाहिजे. कृषी संस्कृतीतील पारंपरिक कारागिरी, अवजारे, हत्यारे, भांडी, दागिने, पदार्थ, वाद्ये, कपडे, वनस्पती, औषधे, लोकखेळ यांसारख्या अनेक जुन्या गोष्टी कालबाह्य होत आहेत. यामुळे बोलीभाषेतील शेकडो शब्द, ज्ञानपरंपरा व एक संस्कृतीच नामशेष होत आहे. एकंदरीत वर्तमान मराठी बोली आपल्या अमूल्य भाषिक, सांस्कृतिक संचितासह हरवत चालल्या आहेत, तर काही नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. (Pudhari Editorial)

गेल्या साठ वर्षांत मराठीचा विकास करण्याचे प्रयत्न गांभीर्याने झालेले नाहीत. एखादी भाषा केवळ शिक्षणाचे माध्यम बनल्याने ज्ञानभाषा होत नसते. जेव्हा त्या भाषेत ज्ञाननिर्मिती होते, ज्ञान प्रसवू लागते, तेव्हा ती ज्ञानभाषा होते. मराठी ज्ञानभाषा होण्यासाठी ज्या मराठीत बालपणापासून आपल्या संकल्पनांची घडण होते, त्याच मराठीत शिक्षण झाले पाहिजे आणि त्याच मराठीत आपले सामाजिक, आर्थिक, औद्योगिक, राजकीय, शैक्षणिक, दैनंदिन व्यवहार झाले पाहिजेत, तरच जीवनाच्या सर्व क्षेत्रांत व व्यवहारात आपल्याला ज्ञानाचे नीट उपयोजन करता येईल. कला, विद्या, ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान या क्षेत्रात मूलभूत निर्मिती करता येईल. मराठी भाषेच्या अस्मितेच्या आणि प्रतीकांच्या, उत्सवीकरणाच्या राजकारणापलीकडे जाऊन मराठीला ज्ञानभाषा, रोजगारभाषा, व्यापार उदिमाची भाषा बनवण्यासाठी प्रत्येकाने झटले पाहिजे. त्यासाठी मुळात आपल्या भाषेवर पुरेसे प्रेम असले पाहिजे. (Marathi Bhasha Gaurav Din)

Back to top button