रेडिओच्या दुनियेचे जादूगार आणि सर्वसामान्यांमध्ये हे माध्यम लोकप्रिय करणारे अमीन सयानी यांच्या जाण्याने एका पर्वाचा अस्त झाला आहे. संवादक्रांती, माहितीचा प्रस्फोट आणि इंटरनेटचे युग इतकेच या सर्वांपासून कोसो दूर असणार्या काळाच्या आठवणी ज्यांच्या मनात आजही रुंजी घालतात, त्या साधारणतः पन्नाशीच्या पुढच्या पिढीला सयानी यांचे नाव कायमच स्मरणात असेल. माहिती तंत्रज्ञान आणि मोबाईल तर दूरच, आज ज्याला इडियट बॉक्स म्हटले जाते तो दूरचित्रवाणी संच म्हणजेच टेलिव्हिजनही मोजक्या घरांमध्ये असणार्या काळात रेडिओ हे सर्वांत प्रभावी श्राव्यमाध्यम होते. देशातील सर्वांचीच रोजची सकाळ ही रेडिओवरील बातम्या आणि गाणी ऐकण्याने व्हायची. त्या काळात म्हणजे 1950 च्या दशकात रेडिओवरील सिलोन या वाहिनीवर सयानी यांनी 'बिनाका गीतमाला' हा हिंदी चित्रपटांमधील आघाडीच्या गीतांचा कार्यक्रम सुरू केला. 1952 ते 1988 अशी सुमारे 36 वर्षे हा कार्यक्रम सिलोनवरून प्रसारित केला जात असे आणि लक्षावधी लोक त्याचा मनमुराद आनंद घेत असत. भारतीय चित्रपटगीतांचा हा पहिला रेडिओ शो होता आणि भारतातील सर्वांत लोकप्रिय कार्यक्रम म्हणून बिनाका गीतमालाची नोंद इतिहासात आहे. नव्वदीच्या दशकात ऑल इंडिया रेडिओच्या विविध भारती सेवेतून हा कार्यक्रम प्रसारित होऊ लागला. त्याकाळच्या नोंदी असे दर्शवतात की, या कार्यक्रमाच्या श्रोत्यांची संख्या 20 लाखांहून अधिक होती. या संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन सयानी यांच्यामार्फत केले जात असे. या कार्यक्रमामुळे सिलोन ही रेडिओ वाहिनी खूपच लोकप्रिय झाली आणि सयानी हे घराघरांमध्ये पोहोचले.