भाजपचे लक्ष्य | पुढारी

भाजपचे लक्ष्य

अटलबिहारी वाजपेयी एकदा जनसंघाचे संस्थापक पंडित श्यामाप्रसाद मुखर्जींसह रेल्वेने मुंबईला चालले होते. काश्मीरचा प्रश्न उपस्थित करून त्यावेळी मुखर्जींनी देशव्यापी दौरा सुरू केला होता. त्या काळात राजस्थानात कोटा येथे लालकृष्ण अडवाणी प्रचारक म्हणून काम करत होते. त्या सुमारास आपल्या या दौर्‍यात मुखर्जींनी वाजपेयी आणि अडवाणी यांची भेट घालून दिली. त्यावेळी त्यांची झालेली ही मैत्री पुढे इतकी घट्ट झाली की, त्याचा उपयोग त्यांना भारतीय जनता पक्षाची स्थापना आणि विस्ताराच्या वेळीही झाला.

आणीबाणीमुळे इंदिरा गांधी यांच्याविरोधात विरोधी पक्षांनी मिळून ज्या जनता पक्षाची स्थापना केली, त्यात जनसंघही होता. परंतु, जनता पक्षाचे हे सरकार अल्पायुषी ठरले. संघाच्या उदरातून जन्मलेला जनसंघ आणि जनता पक्षातील अंतर्गत घुसळणार्‍या समीकरणातून भाजपचा जन्म झाला. जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीनंतर 6 एप्रिल 1980 रोजी वाजपेयी आणि अडवाणींच्या नेतृत्वात दिल्लीतील फिरोजशहा कोटला मैदानावर एक राष्ट्रीय संमेलन झाले. त्यावेळी ‘भारतीय जनता पक्ष’ या नव्या पक्षाच्या स्थापनेची घोषणा करण्यात आली. जनसंघ किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी थेट संबंध जोडता येणार नाही आणि जनता पक्षाचाही त्यात अंश असेल, अशा दुहेरी द़ृष्टिकोनातून पक्षाचे हे नामकरण झाले.

या दोन नेत्यांसमवेत नानाजी देशमुख, सुंदरसिंह भंडारी, के. आर. मलकानी, विजयकुमार मल्होत्रा, कुशाभाऊ ठाकरे, मुरलीमनोहर जोशी, केदारनाथ सहानी, जे. पी. माथुर, भैरोसिंह शेखावत, सुंदरलाल पटवा, शांताकुमार, विजयाराजे शिंदे, जगन्नाथराव जोशी यांच्यासारख्या नेत्यांचा भाजपच्या संस्थापकांमध्ये समावेश होता. भारताचा राज्यशकट चालवण्याची ताकद विरोधी पक्षांमध्ये नाही, असा सर्वसाधारण समज देशात होता. मोरारजी देसाई, चरणसिंह, व्ही. पी. सिंग, चंद्रशेखर, देवेगौडा, गुजराल हे फार काळ सरकार चालवू शकले नाहीत. परंतु, वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार देऊन भाजपने काँग्रेसचा हा दंभ मोडून दाखवला. एवढेच नव्हे, तर 2014 आणि 2019 असे सलग दोनदा स्थिर सरकार देऊन, यापुढे दीर्घकाळ आम्हीच देशावर राज्य करणार आहोत, असे चित्र भाजपने निर्माण केले. नुकत्याच नवी दिल्लीत पार पडलेल्या राष्ट्रीय अधिवेशनातही भाजपचा हाच आत्मविश्वास ठळकपणे दिसून आला.

कमळाचे फूल हाच भाजपचा उमेदवार असून, कार्यकर्त्यांनी पुढील शंभर दिवस मेहनत घेऊन आगामी लोकसभा निवडणुकीत पक्षाला 370 जागा मिळवून द्याव्यात, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यावेळी केले. इतक्या जागा तुम्ही मिळवून दाखवल्या, तर ती जनसंघाचे संस्थापक व भाजपचा वैचारिक आधार ठरलेले श्यामाप्रसाद मुखर्जी यांना आदरांजली ठरेल, असा संदेश त्यांनी दिला. श्यामाप्रसाद यांनी अनुच्छेद 370 च्या माध्यमातून जम्मू-काश्मीरला विशेषाधिकार देण्याला विरोध केला होता. मोदी सरकारने ऑगस्ट 2019 मध्ये हा विशेषाधिकार रद्द केला. या अर्थाने ‘370’ या आकड्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले असून, त्यामुळे आपल्या प्रचाराला राष्ट्रवादाची भावनात्मक डूब देण्याचा पक्षाचा प्रयत्न असावा, असे दिसते.

मागच्या दहा वर्षांमध्ये भाजप सरकारने गरिबांसाठी विविध योजना राबवल्या. जागतिक अर्थकारणाशी जोडणारे आर्थिक धोरण लागू करून देशाला पुन्हा विकासाच्या मार्गावर आणले आणि जागतिकस्तरावर देशाचा सन्मान वाढवला. या त्रिसूत्रीभोवती पक्षाचा प्रचार केंद्रित राहणार, हे स्पष्ट आहे. थोडक्यात, विकसित भारत, मोदींची गॅरंटी आणि तिसर्‍यांदा मोदी सरकार, यावर भर असणार आहे. इंग्रजीत ज्याला प्रभावी ‘मेसेजिंग’ म्हणतात, त्याचेच हे उदाहरण. आपल्या कार्यकर्त्यांना सतत कार्यक्रम देऊन सक्रिय ठेवणे, सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवणे आणि कार्यकर्त्यांत उत्साह जागवणे हेच भाजपच्या यशाचे इंगित आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप भरघोस मतांनी तिसर्‍यांदा केंद्रात सत्ता स्थापन करेल आणि हा भाजपचा आतापर्यंतचा सर्वात निर्णायक विजय असेल, असा आत्मविश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला आहे. मात्र, तरीही पुढील शंभर दिवस कार्यकर्त्यांनी तनामनाने बूथस्तरावर काम केले पाहिजे. पहिल्यांदाच मतदान करणार्‍या युवकांपर्यंत पोहोचा, असे आवाहनही मोदी यांनी केले. थोडक्यात, आत्मविश्वासाच्या नशेत मश्गूल राहून पक्षाने बेफिकीर राहू नये, असेच ते सुचवत आहेत.

2004 मध्ये भाजपला पुन्हा आपलीच सत्ता येणार, असा विश्वास वाटत होता. तेजस्वी भारत, फीलगुड आणि इंडिया शायनिंगच्या घोषणा सुरू होत्या. दिवंगत नेते प्रमोद महाजन हे अत्यंत आक्रमकपणे प्रचार करत होते. परंतु, मतदारांनी त्यावेळी भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला नाकारले. हा सारा पूर्वानुभव असल्यामुळेच विजयासाठी जागरूक राहण्याची तयारी पक्षाने केली आहे. निवडणुका तोंडावर आल्या तरी ‘इंडिया’ आघाडीत एकजुटीऐवजी फूट आणि पडझडीच्या घडामोडी सुरू आहेत. महाराष्ट्रात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेसला मोठा धक्का बसला. त्यामुळे महाराष्ट्रात महाविकास आघाडीसमोर नव्याने मोट बांधण्याचे आव्हान आहे. नॅशनल कॉन्फरन्सचे सर्वेसर्वा फारूख अब्दुल्ला यांनीही स्वतंत्र निशाण फडकावून इंडिया आघाडी ढासळत असल्याचे संकेत दिले आहेत.

पश्चिम उत्तर प्रदेशात वर्चस्व असलेल्या जयंत चौधरींच्या राष्ट्रीय लोक दलाने ‘एनडीए’ आघाडीत सामील होण्याचे ठरवले आहे. दिल्ली आणि पंजाबमध्ये ‘आप’ व काँग्रेस यांच्यात ताळमेळ नाही. नितीशकुमार यांनी कोलांटउडी मारल्यामुळे बिहारमध्ये भाजप सत्तेत आला आहे. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस अध्यक्ष ममता बॅनर्जी आणि काँग्रेसचे लोकसभेतील नेते अधीररंजन चौधरी यांच्यात सतत जाहीर वाद होत असतात. भाजपने राष्ट्रीय अधिवेशनाच्या निमित्ताने संघटनेत नव्या दमाने आत्मविश्वास भरला, हे वास्तव आहे. आता गतिमान झालेल्या राजकीय घडामोडींत ‘इंडिया’ आघाडीतील प्रादेशिक पक्ष कसे टिकून राहतात, कोणती राजकीय भूमिका घेतात, त्यावरच राजकारणाची दिशा अवलंबून आहे. भाजपचा आत्मविश्वास वाढला असल्याचेच सध्याचे वातावरण आहे.

Back to top button