उत्तर प्रदेशातील पेच | पुढारी

उत्तर प्रदेशातील पेच

अमित शुक्ल, राजकीय अभ्यासक

लोकसभा निवडणुकीसाठी उत्तर प्रदेशात जागावाटपावरून समाजवादी पक्ष आणि काँग्रेस यांच्यात ताणाताणी सुरू आहे. दोन दिवसांपूर्वीच्या बैठकीत उभय पक्षांत जागावाटपावरून कोणताही ठोस निर्णय निघाला नाही. समाजवादी पक्षाचे सरचिटणीस प्रा. रामगोपाल यादव यांनी दोन्ही पक्षांंनी जागावाटपाचे निम्मे अंतर पार केले असून निम्मा रस्ता अजून बाकी आहे, असे सांगितले.

काँग्रेस नेते सलमान खुर्शिद यांनी जागावाटपात उभय पक्षांच्या नेत्यांत आणखी एक बैठक होणार असल्याचे सांगितले. या बैठकीतूनही तोडगा निघाला नाही तर काँग्रेस नेते राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे हे समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांच्याशी चर्चा करतील, असे त्यांनी सांगितले. राजकीय तज्ज्ञांच्या मते, उत्तर प्रदेशात अनेक जागांवर दोन्ही पक्षांचे मतैक्य नाही. काँग्रेसकडून अधिक जागा मागितल्या जात असून समाजवादी पक्षाकडून मात्र त्यास खोडा घातला जात आहे. त्यामुळे जागावाटपाचा पेच हा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. जागावाटपाचा तिढा मिटवण्यासाठी आणखी एक लवकरच बैठक होईल, अशी शक्यताही वर्तविली आहे.

सपा नेते रामगोपाल यादव म्हणाले, काँग्रेसच्या निवडणूक समितीसमवेत एका एका जागेवर सविस्तर चर्चा झाली. प्रबळ उमेदवार देण्यावरूनही दोन्ही पक्षात सखोल चर्चा झाली. जागावाटपाचे निम्मे अंतर पार केले असून तेवढेच अंतर आता राहिले आहे. या वक्तव्यावरून दोन्ही पक्षांत अजूनही 80 लोकसभा मतदारसंघांवरून एकमत झालेले नाही, हे स्पष्ट होते. काँग्रेसच्या निवडणूक समितीचे संयोजक मुकुल वासनिक यांच्या घरी झालेल्या बैठकीनंतर खुर्शिद म्हणाले, एका एका जागेवर दोन्ही पक्षांच्या नेत्यांत चर्चा झाली. दोन्ही पक्षांनी आपापली बाजू मांडली आणि लवकरच पुन्हा चर्चा होणार आहे.

संबंधित बातम्या

भाजपविरुद्ध लढण्यासाठी दोघांनी एकत्र येऊन लढण्याची तयारी केली आहे. मात्र जागावाटपाचा मुद्दा अजूनही मार्गी लागलेला नाही. वास्तविक काँग्रेसकडून राज्यात किमान 25 जागा मागितल्या जात आहेत तर समाजवादी पक्ष केवळ 12 ते 15 जागा देण्यास राजी आहे. यावरून सपा त्यांच्या मागणीनुसार जागा देण्यास तयार नाही, हे स्पष्ट होते. दुसरीकडे काँग्रेस नेत्यांच्या मते, राज्यात भाजप विरुद्ध ‘इंडिया’ आघाडी असे चित्र दिसायला हवे. भाजप विरुद्ध सपा असे नको. अशावेळी काँग्रेसला मागणीनुसार जागा मिळायला हव्यात. दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी आपापली बाजू मांडली. मात्र दोन्ही बाजूंच्या नेत्यांचे समाधान झाले नाही.

बैठकीदरम्यान काँग्रेसकडून 28 जागांवर हक्क सांगितला जात आहे आणि त्याचवेळी प्रबळ उमेदवारांची नावेही सादर केली गेली. काँग्रेसच्या मते सपानेही आपल्या उमेदवारांची नावे जाहीर करायला हवीत, जेणेकरून निष्कर्षाप्रत पोहोचू शकू. राज्यातील अनेक लोकसभा मतदारसंघांवर दोन्ही बाजूंनी दावा केला जात आहे. त्यामुळे जागावाटपाचे घोडे अडलेले आहे. काँग्रेसच्या मते, पक्षाला सन्मानजनक जागा मिळायला हव्यात. उत्तर प्रदेशात लोकसभा निवडणुकीत ‘इंडिया’ आघाडीत समाजवादी पक्ष आणि काँग्रेस व्यतिरिक्त राष्ट्रीय लोकदल देखील आहे. पश्चिम उत्तर प्रदेशात राष्ट्रीय लोकदलाची चांगली पकड आहे. अशावेळी लोकदलासाठी जागांची संख्या निश्चित करण्याचे काम अजूनही बाकी आहे.

उत्तर प्रदेशात आतापर्यंत जागावाटप प्रक्रियेत बहुजन समाज पक्षावरून पेच होता. मात्र स्वबळावर निवडणूक लढविणार असल्याचे मायावती यांनी जाहीर केल्याने हा मुद्दा बाजूला पडला. काँग्रेसकडून बसपला ‘इंडिया’ आघाडीत सामील करून घेण्याबाबत आग्रह केला जात होता. मात्र बसपने आपली भूमिका स्पष्ट केली. दुसरीकडे ममता बॅनर्जी यांनीही पश्चिम बंगालमध्ये ‘एकला चलो रे’चा नारा देत स्वबळावर निवडणुका लढण्याचा निर्णय जाहीर केला आहे. बिहारमध्ये नितीशकुमार कोणत्याही क्षणी रालोआमध्ये सहभागी होणार असल्याची घोषणा करतील अशी स्थिती आहे. अशा स्थितीत समाजवादी पक्षाशी जुळवून घेणे काँग्रेससाठी अपरिहार्य आहे.

Back to top button