राम मंदिर हा केवळ पहिला टप्पा..! | पुढारी

राम मंदिर हा केवळ पहिला टप्पा..!

अजय बुवा

पुन्हा भारत जोडो यात्रेवर निघालेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी राम मंदिर सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदीकेंद्रित राजकीय कार्यक्रम असल्याची टीकाही केली. मंदिर कार्यक्रमाचा उदोउदो लोकसभा निवडणूक समोर ठेवून झाल्याचे विरोधी पक्षांच्या बहुतांश नेत्यांनी बोलून दाखवले. पण, अयोध्येत राम मंदिर बांधून, लोकसभा निवडणुकीपूर्वी मंदिराचे उद्घाटन करून भाजपला, नरेंद्र मोदींना लोकसभा निवडणुका जिंकायच्या आहेत अशीही टीका होते. कारण भाजपने आणि संघ परिवाराने सांस्कृतिक राष्ट्रवादाची घोषणा केली होती. राम मंदिर हे त्याच घोषणेचा एक टप्पा आहे. काशी, मथुरा हेदेखील पुढचे टप्पे आहेत. परंतु, आधी बर्‍याच लहान-मोठ्या मंदिरांच्या उभारणीतून भाजपने, संघ परिवाराने सांस्कृतिक राष्ट्रवादाची योजनाबद्धरीतीने मांडणी चालविली होती. त्यात, केवळ काशी विश्वनाथ कॉरिडोर, केदारनाथ मंदिर, उज्जैनमधील महाकाल मंदिरांचाच विकास झाला असे नव्हे; तर लोकदैवत आणि ग्रामदैवतांची मंदिरे बांधण्यात आली. त्यातून वंचित, दलित, मागासवर्गीय समुदायांना जोडण्याचाही आणि आपणही कोणी तरी आहोत या ओळखीकडून आपण हिंदू आहोत, अशी ओळख ठसविण्याचा प्रयत्न झालेला दिसतो आहे.

कोणत्याही समुदायाच्या भावनिक श्रद्धाकेंद्रांचा आदर केल्यास त्या समुदायाला जोडणे सोपे जाते, या न्यायाने वंचितांच्या श्रद्धास्थानांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले. दलित, आदिवासी, अतिमागास जातींच्या वस्त्यांमध्ये स्थानिक दैवतांची मंदिरे लोकवर्गणीतून बांधण्यात आली आहेत. अर्थातच, त्यामध्ये पुढाकार संघ परिवारातील संघटनांचाच असला, तरी प्रत्येकाचे थोडेथोडे योगदान यातून त्यांना या मंदिरांशी जोडण्याचा प्रकार म्हणजे त्यांना नवी ओळख प्रस्थापित करण्याचा आहे. पंतप्रधान मोदींचे मागील 10 वर्षांतील धार्मिक स्थळांचे दौरे आणि त्यांच्या भाषणांमधून झालेला लोकदैवतांचा उल्लेख हा देखील त्याचाच एक भाग म्हणता येईल.

उदाहरणार्थ, पंतप्रधान मोदींनी उत्तर प्रदेशातील मागासवर्गीय समुदायाचे ग्रामदैवत असलेल्या मोरी माईबद्दल उल्लेख केला होता. तर, वाराणसीतून लोकसभा खासदार झाल्यानंतर मोदींनी ‘संसद आदर्श ग्राम योजने’मध्ये जयपुरा गाव ‘दत्तक’ घेतले. त्या गावातील अटलनगर ही दलित मुसहर समुदायाची वस्ती आहे. मुसहर समुदाय हा उंदीर पकडणारा. हा समुदाय स्वतःला शबरीचे वंशज मानणारा आहे. या वस्तीमध्ये संघातर्फे शबरीचे आणि शंकराचे मंदिर बांधण्यात आले. दलित मुसहर समुदायासाठी पूर्वी कोणतेही मंदिर संपूर्ण पंचक्रोशीत नव्हते. आता तिथे आपल्याच वस्तीत लोकवर्गणीतून बांधलेले मंदिर ही गोष्ट त्यांच्यासाठी अभिमान वाढविणारी ठरली. आता तिथे पन्नास हजार लोक जमा होतात. या शबरीच्या मंदिराच्या निमित्ताने ते अयोध्येतील राम मंदिराशी जोडले गेले आहेत. केवळ मुसहर हेच शबरीशी संबंध सांगणारे नाहीत, तर इतर आदिवासीदेखील शबरीशी नाते सांगणारे आहेत. रामायणातील जटायू व्यक्तिरेखा ही इतरांसाठी एक पात्र असेल, परंतु जटायूशी वांशिक नाते सांगणारेदेखील आदिवासी समूह आहेत. ते जटायूची पूजा करणारे आहेत.

असेच एक उदाहरण निषाद समुदायाचेही सांगता येईल. काही महिन्यांपूर्वी गृहमंत्री अमित शहा यांची लखनौमध्ये सभा झाली होती. त्यात अमित शहा यांनी रामायणातील राम आणि निषाद राजाच्या मैत्रीची गोष्ट सांगितली. वनवासाला निघालेल्या रामाला, सीतेला आणि लक्ष्मणाला निषाद राजाने आपल्या नावेतून गंगा नदीच्या पैलतीरी नेले होते. त्या मैत्रीचे स्मरण म्हणून वनवास संपल्यानंतर राम निषाद राजाकडे आला होता. ही गोष्ट सांगितल्यानंतर शहा यांचे सांगणे होते, की आता रामाचे भव्य मंदिर उभारले जाणार आहे. त्यांचा हा प्रयत्न रामकथेच्या निमित्ताने निषाद समुदायाचे लक्ष राम मंदिराकडे वेधणारा होता. तर, अलीकडच्या काळात भाजप आणि निषाद पक्षाच्या संयुक्त जाहीर सभेला निषाद, गोंड, माळी, मल्लाह, केवट या समुदायांची उपस्थिती लक्षणीय होती आणि तेवढाच लक्षणीय या समुदायांकडून होणारा ‘जय श्री राम!’ हा जयघोषही होता. आता अयोध्येतील राम मंदिरामध्ये राम, लक्ष्मण, सीता, हनुमान यांच्या मूर्ती आहेतच; परंतु मंदिर संकुलामध्ये महर्षी वाल्मीकी, माता शबरी, जटायू, निषादराज या रामायणातील व्यक्तिरेखांचीही मंदिरे आहेत. साहजिकच, या मंदिरांसोबत मुख्य राम मंदिरही या समुदायांसाठी आकर्षण केंद्र राहणार असेल, तर मंदिर मोहिमेचा हा पद्धतशीर विस्तार म्हणावा लागेल.

गेल्या काही दिवसांतील राम मंदिराच्या उद्घाटनासाठी निमंत्रण देण्याची, घरोघरी जाऊन राम मंदिराचे चित्र आणि अक्षता पोहोचविण्याची मोहीमदेखील याच योजनेचा भाग राहिली. सोशल मीडियावरून त्याचा झालेला प्रभावी प्रचारदेखील मंदिर मोहिमेशी तरुणांना जोडण्यासाठीच होता. आता राम मंदिराच्या दर्शनाला देशभरातून लोकांना नेण्याची नवी मोहीमही येत्या काळात असेल. अर्थातच, अन्य समाज घटकांसोबतच दलित, आदिवासी, मागासवर्गीयांचाही त्यात सहभाग असावा, याची काळजी संघ परिवारातील संघटनांकडून घेतली जाईल. राम मंदिर हे आता केवळ साधे मंदिर उरलेले नाही, तर सांस्कृतिक राष्ट्रवादाचे प्रतीक बनविण्याचा आणि त्याच्याशी उच्चवर्णीयांपासून ते दलित, आदिवासी, मागासवर्गीयांच्याही भावना जोडण्याचा म्हणजेच हिंदुत्वाचा विस्तार करण्याचाही योजनाबद्ध प्रयत्न केला जात आहे. वस्तुस्थिती अशी आहे, की लोकसभा निवडणुकीतील विजय-पराजय यापलीकडे भाजप-संघाने देशात धर्मकेंद्रित राष्ट्रवादाची बीजे पेरली आहेत.

Back to top button