नव्या इतिहासाची नांदी! | पुढारी

नव्या इतिहासाची नांदी!

केशव उपाध्ये

अयोध्येतील राम मंदिर भारताच्या संपन्न इतिहासाचे व वैभवशाली परंपरांचे आधुनिक मानचिन्ह ठरले आहे. जगभरातून भारतात येणारे पर्यटक देशातील अनेक प्रेक्षणीय स्थळांना भेटी देऊन अयोध्येत आले की, प्रभू रामचंद्रांच्या जन्मस्थाळाशी भक्तिभावाने विनम्र होतील. भारतीय संस्कृतीचे सन्मानचिन्ह ठरणारे राम मंदिर आता जागतिक तीर्थक्षेत्र झाले आहे.

देशातील कोणत्याही विवादास्पद मुद्द्याचे कायद्याच्या आणि न्यायालयाच्या मार्गाने शांततापूर्ण निराकरण करता येते, हे अयोध्येच्या प्रश्नावरील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने दाखवून दिले. केवळ एवढेच नव्हे, तर आपली न्यायव्यवस्था स्वतंत्र, निष्पक्ष, पारदर्शक आणि दूरदर्शी आहे हेदेखील या निर्णयातून सिद्ध झाले आहे. कायद्यासमोर सारे समान आहेत, हे तत्त्व या निर्णयाने अधोरेखित झाले आहे. म्हणूनच अयोध्येच्या वादग्रस्त मुद्द्यावरील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे कोणाचा विजय किंवा कोणाचा पराभव या द़ृष्टीने न पाहता शांतता आणि सद्भावपूर्ण वातावरणात या निर्णयाचे स्वागत करा..! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 9 नोव्हेंबर 2029 या दिवशी देशाला दिलेल्या या संदेशात त्यांच्या संयमी सामंजस्याचे रूप उमटते.

1949 मध्ये देशात सुरू झालेल्या एका संघर्षाची या दिवशी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने आनंदी अखेर झाली, आणि 1526 मध्ये मुघल बादशहा बाबराच्या भारतावरील आक्रमणापासून सुरू झालेली भारतीय संस्कृतीच्या अस्मितारक्षणाची एक लढाई सुमारे पाचशे वर्षांनी या देशातील बहुसंख्य हिंदूच्या आराध्य दैवताच्या शांततामय मुक्तिसोहळ्याने संपुष्टात आली. स्वातंत्र्यानंतर दीर्घकाळ सत्तेवर राहिलेल्या काँग्रेस सरकारच्या काळातही अयोध्येतील राम जन्मभूमी मुक्तीच्या मागणीसाठी प्रखर आंदोलने झाली. जनभावनांचा क्षोभ काँग्रेसलाही अनुभवावा लागला; पण इच्छाशक्तीचा अभाव आणि तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे हा प्रश्न अधांतरी राहिला. स्वातंत्र्योत्तर भारतात सत्तर वर्षांनंतर अयोध्येतील वादग्रस्त जागी बंदिवान अवस्थेतील प्रभू रामचंद्रांच्या जन्मभूमी मुक्तीचा इतिहास रचला गेला.

2014 मध्ये देशात राजकीय परिवर्तनाचा इतिहास घडला. काँग्रेसप्रणीत संपुआ सरकारची सद्दी संपली. जनतेने प्रचंड विश्वासाने मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या हाती सत्तेची सूत्रे सोपवली. 2014 च्या लोकसभा निवडणुकीआधीच भाजपने देशाला ही आश्वासने दिली होती. तात्त्विकद़ृष्ट्या राम जन्मभूमीवरील राम मंदिराची उभारणी हा प्राधान्याचा मुद्दा असूनही, देशाला दिलेल्या आश्वासनांची क्रमवारी लावण्याचा व त्यानुसार प्राधान्यक्रम ठरवण्याचे भाजपचे धोरण राहिले, आणि आर्थिक स्थैर्याला सर्वोच्च प्राधान्य देऊन मोदी सरकारने देशाला आश्वस्त केले.

ऑगस्ट 2020 मध्ये पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते या संकल्पाची पायाभरणी झाली. प्रभू रामचंद्रांचा जयघोष, भारतमाता की जय अशा उत्साही घोषणांच्या गजरात पंतप्रधान मोदी यांनी राम मंदिराच्या संकल्पित वास्तूच्या जागेचे भूमिपूजन केले आणि अनेक वर्षे एका तंबूत वास्तव्य करून राहिलेल्या प्रभू श्रीरामांच्या मंदिर उभारणीचे काम सुरू झाले. पंतप्रधान मोदी यांच्याच शब्दांत सांगायचे झाले, तर अयोध्येतील प्रभू रामचंद्रांच्या जन्मभूमीवरील त्या जागी उभे राहिलेले हे मंदिर म्हणजे भारताच्या संपन्न इतिहासाचे व वैभवशाली परंपरांचे आधुनिक मानचिन्ह ठरले आहे.

Back to top button