रस्ते अपघात : कडक तरतुदी कशासाठी? | पुढारी

रस्ते अपघात : कडक तरतुदी कशासाठी?

योगेश मिश्र, ज्येष्ठ विश्लेषक

राष्ट्रीय गुन्हे नोंदणी ब्यूरो (एनसीआरबी) च्या मते, 2022 मध्ये भारतात हिट अँड रनची एकूण 47,806 प्रकरणे घडली असून त्यात 50,615 जणांचा मृत्यू झाला. याचाच अर्थ दर तासाला ‘हिट अँड रन’ प्रकरणात सुमारे सहाजणांचा मृत्यू झाला आणि दरदिवशी 140 जणांचा मृत्यू झाला. 2021 मध्ये 47,530 घटना घडल्या आणि त्यात 43,499 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळेच केंद्र सरकारने हिट अँड रन प्रकरणातील दोषीला कडक शिक्षा देण्याची तरतूद केली आहे.

रस्ते अपघातात आणि अन्य दुर्घटनेत मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण भारतात गंभीर आहे. 2022 मध्ये भारतात दर तासाला ‘हिट अँड रन’ प्रकरणात सुमारे सहाजणांचा मृत्यू झाला आणि दररोज 140 जणांच्या मृत्यूची नोंद झाली. बहुतांश प्रकरणात मारेकरी, चालक हे पीडित व्यक्तीला रस्त्यात सोडून पळून जातात. अशा प्रकरणात दोषीला कडक शिक्षा देण्यासाठी तरतूद करण्यात आली आहे. मात्र देशभरात या तरतुदीवरून गदारोळ माजला आहे. वाहतूकदार, बस, ट्रकचालक, टॅक्सीचालकांनी नव्या कायद्याला काळा कायदा असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे या कायद्यावर पुनर्विचार करण्याची मागणी केली जात आहे.

देशातील अनेक भागांत बस आणि ट्रकचालक हे नव्या भारतीय न्याय संहितेला विरोध करत आहेत. त्यात ‘हिट अँड रन’ प्रकरणातील दोषीला कडक शिक्षा देण्याची तरतूद आहे. नव्या कायद्यानुसार रस्ते अपघात प्रकरणातील दंडात वाढ केली असून शिक्षाही 10 वर्षांची केली आहे. जुन्या कायद्यानुसार वाहन अपघाताच्या गुन्ह्यात कमाल दोन वर्षांची शिक्षेची तरतूद होती.

भारतीय न्याय संहितेनुसार एखाद्या व्यक्तीच्या निष्काळजीपणामुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होत असेल आणि त्याचा उद्देश हत्येच्या श्रेणीत मोडत नसेल तर त्याला 7 वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते आणि दंडही भरावा लागेल. गुन्हेगार पळून जात असेल आणि तत्काळ माहिती देण्यास हलगर्जीपणा करत असेल तर सात लाख रुपये दंड आणि कमाल 10 वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा.

नव्या कायद्यानुसार ‘हिट अँड रन’ हा अजामीनपात्र गुन्हा आहे. नवा कायदा एप्रिल 2024 पासून लागू होण्याची शक्यता आहे. नव्या नियमांवर वाहतूकदार आणि ट्रक चालकांनी टीका केली आहे. अवजड वाहनांच्या चालकांविषयी भेदभावाची वागणूक असल्याचे चालकांचे म्हणणे आहे. संपात भाग घेणार्‍या चालकांत ट्रकचालक, खासगी बसचालक आणि काही ठिकाणी सरकारी बस चालकही सामील आहेत. काहीजणांनी सोशल मीडियावर म्हटले की, काही राज्यांतील टॅक्सीचालकही या तरतुदींचा विरोध करत आहेत.

भारतात दरवर्षी किमान एक लाख 68 हजार जणांचा रस्ते अपघातात मृत्यू होतो. देशातील रस्ते सुरक्षित नसल्याचा हा पुरावा आहे. काही दिवसांपूर्वी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने रस्ते अपघातासंदर्भात चिंता व्यक्त करणारी आकडेवारी जारी केली. त्यानुसार भारतात 2022 मध्ये 4 लाख 61 हजार अपघात झाले. यात 1.68 लाख जणांचा मृत्यू झाला तर 4.43 लाख जखमी झाले. मृत्युमुखी पडणार्‍या 66.5 टक्के लोकांचा वयोगट 18 ते 45 दरम्यानचा होता.

देशात वाहनांची संख्या प्रचंड वाढत आहे. चालक परवानाही सहजपणे मिळत आहे. रस्त्यांची स्थितीही कमी-अधिक प्रमाणात चांगली आहे. वाहतूक कायदेही कडक आहेत. परंतु नियमांची आणि कायद्यांची अंमलबजावणी प्रभावीपणे होताना दिसत नाही. गाडी चालवताना मोबाईल वापरणे चुकीचे आहे, बेकायदा आहे. मात्र या नियमांकडे कोणीही लक्ष देत नाही. वाहतूक नियमांना हरताळ फासला जातो. सर्वात म्हणजे काहीजण वाहतूक नियमांना महत्त्वच देत नाहीत. यामागचे कारण म्हणजे नेते, पोलिस, मोठे अधिकारी यांच्याकडूनच नियमांचे काटेकोरपणे पालन होत नाही. त्यामुळे बड्या लोकांना, मोठ्या गाड्यांना नियम नसतो, असा समज निर्माण झाला आहे. हेच समस्येचे मूळ कारण आहे.

Back to top button