तृणमूलमध्ये ज्येष्ठ विरुद्ध तरुण! | पुढारी

तृणमूलमध्ये ज्येष्ठ विरुद्ध तरुण!

कमलेश गिरी, राजकीय अभ्यासक

तृणमूलमध्ये आजघडीला मातब्बर नेत्यांचे वय 70 पेक्षा अधिक आहे. दुसरीकडे पक्षाचे सरचिटणीस आणि ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक बॅनजी मात्र तरुणांना पक्षात पुढे आणण्यासाठी पुढाकार घेत आहेत. त्यांच्या मते, पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी राजकारणातून आता निवृत्ती घ्यायला हवी आणि तरुण पिढीला पुढे येण्यासाठी मार्ग मोकळा करून द्यावा.

तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा मात्र निवृत्तीबाबत वेगळा द़ृष्टिकोन आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी एका ठिकाणी बोलताना पक्षातील ज्येष्ठ नेत्यांचा आदर करायला हवा, असा सल्ला दिला. त्यांच्या मते, अनुभवी नेते पक्षात सक्रिय राहिल्याने पक्षाला आणखी बळकटी मिळते. एकंदरीतच पक्षातील ज्येष्ठ नेत्यांचा दबदबा हा पुढेही राहू शकतो, असे मानले जात आहे. परंतु त्यांच्याच भाच्याची वेगळी भूमिका काही प्रमाणात दिसत आहे. अभिषेक बॅनर्जी यांनी अनेक ज्येष्ठ नेत्यांमुळे पक्षातील कार्यक्षमतेत आणि कार्यप्रणालीत शिथिलता येत असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे नोकरीप्रमाणेच राजकारणातही निवृत्तीचे वय निश्चित असायला हवे, अशी बाजू मांडत आहेत. अशा पद्धतीमळे राजकारणात इच्छुक असलेल्या तरुणांचा मार्ग मोकळा होईल आणि त्याचरोबर पक्षासाठी नव्या विचारांचा लाभ होईल, असे अभिषेक बॅनर्जी म्हणतात.

बॅनर्जी यांचे निकटवर्तीय टीएमसीचे प्रवक्ते कुणाल घोष यांच्या मते, पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी तरुण पिढीला मार्ग मोकळा करून देण्यासंदर्भातील जाणीव ठेवायला हवी आणि वेळीच निर्णय घ्यायला हवा. यासाठी पक्षातील तरुण पिढीने पुढे येण्याची गरज आहे. परंतु सध्या पक्षात कोणत्याही प्रकारे ज्येष्ठ नेते अणि तरुण नेते यांच्यात ओढाताण सुरू नसल्याचेही स्पष्ट केले. एकूणच पक्षात ज्येष्ठ की तरुण असा वाद नसल्याचे सांगितले जात असले तरी बॅनर्जी यांची भूमिका आणि घोष यांचे मत पाहता ज्येष्ठ नेते की तरुण या चर्चेला वेग आला आहे, हे निश्चित. पक्षातील अनेक खासदार, मंत्री अणि अन्य महत्त्वाचे नेते हे 70 पेक्षा अधिक वयोगटातील असून त्यांच्याकडून या वक्तव्यावर तीव्र आक्षेप घेतला जात आहे.

लोकसभेतील तृणमूल काँग्रेसचे नेते सुदीप बंदोपाध्याय यांच्या मते, ममता बॅनर्जी या तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आहेत आणि त्यांचा निर्णय अंतिम असेल. त्यांना वाटत असेल की, एखाद्या नेत्याने निवृत्ती घ्यायला हवी तर तो निवृत्त होईल. त्याचवेळी त्यांना असेही काही वाटत नसेल तर ते नेते पुढेही पक्षाला मजबुती देण्याचे काम करत राहतील.

74 वर्षीय ज्येष्ठ नेते बंदोपाध्याय यांनी या चर्चेला काहीच अर्थ नसल्याचे म्हटले आहे. कारण पक्षाला पुढे नेण्यासाठी ज्येष्ठ आणि तरुण नेत्यांची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. पक्षाचे आणखी एक ज्येष्ठ नेते सौगत राय म्हणाले की, पक्षात वयावरून कोणतीही समस्या नाही. 76 वर्षीय नेते रॉय यांनी म्हटले की, पक्षातील ज्येष्ठ अणि तरुण नेत्यांच्या भूमिकेवरचा अंतिम निर्णय हा ममता बॅनर्जी यांना घ्यायचा आहे. तिकीट कोणाला द्यायचे, याबाबत त्या निर्णय घेणार आहेत. तसेच पक्षात कोणता नेता कोणती जबाबदारी पार पाडेल, हेही त्यांनाच ठरवायचे आहे.

बंदोपाध्याय आणि सौगत रॉय हे पक्षातील ज्येष्ठ नेते असून वयाची मर्यादा लागू केली तर त्यांना निवृत्ती घेण्याची वेळ येऊ शकते. मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय मानले जाणारे वरिष्ठ मंत्री फिरहाद हकीम यांच्या मते, वयाची मर्यादा आणि एक व्यक्ती एक पद याबाबत ममता बॅनर्जी यांनाच निर्णय घ्यायचा आहे. यादरम्यान, पक्ष सूत्रांच्या मते, ज्येष्ठ नेत्यांना तृणमूल काँग्रेसमधून बाहेर काढण्याची चर्चा जोरात सुरू आहे. अभिषेक बॅनर्जी हे सतत तरुण पिढीला पुढे आणण्याचा पुरस्कार करत आहेत. अशा स्थितीमुळे लोकसभा निवडणुकीच्या काळात तृणमूल काँग्रेसच्या निवड प्रक्रियेवर देखील परिणाम होऊ शकतो, अशी शंका आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष ममता बॅनर्जी यांच्याकडे लागले आहे. तसेच ममता बॅनर्जी या आपल्या जवळच्या ज्येष्ठ नेत्यांना महत्त्वाची जबाबदारी देतात की आगामी काळात तरुण पिढीतील नेत्यांना पुढे करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Back to top button