तडका : फटाके आणि पेढे

तडका : फटाके आणि पेढे

आपल्या राज्यात कोणतीही घटना किंवा आपल्या बाजूने लागलेला निकाल साजरा करण्याची राजमान्य पद्धत म्हणजे फटाके वाजवणे आणि पेढे वाटणे. दोन पक्षांमधील किंवा दोन गटांमधील कोणत्याही प्रकारची लढाई असो, त्यात एकजण जिंकत असतो आणि एकजण हरत असतो. मग ही लढाई ग्रामपंचायत ते लोकसभा या सर्व प्रकारच्या निवडणुकांमध्ये असते. याशिवाय एखादा ऐतिहासिक निर्णय एका बाजूने लागतो आणि ती बाजू राज्यभर फटाके वाजवून आणि एकमेकांना पेढे भरवून साजरा करीत असते.

नुकत्याच लागलेल्या एका निकालानंतर पराभूत गटाने काही ठिकाणी रास्ता रोको केला. भारतात सर्वात सोपे जर काय असेल तर ते म्हणजे रस्ते रोखणे आणि रस्ते रोखण्यासाठी मुख्यत्वे टायरचा वापर केला जातो. निषेध करण्यासाठी किंवा आंदोलन करण्यासाठी ज्या कुणा व्यक्तीने पहिल्यांदा टायर जाळले असेल, त्याला शोधून त्याचा सत्कार केला पाहिजे. कपडे जाळणे सोपे असते. कारण ते काही वेळात जळून खाक होतात. लाकडे जाळणे त्याहीपेक्षा सोपे असते. जुने टायर अगदी भंगारच्या भावात, म्हणजे दोन-तीनशे रुपयांत सहज कुठेही मिळतात आणि असे टायर रस्त्यावर पेटवून टाकले की ते रबराचे असल्यामुळे निवांत दहा-बारा तास जळत असतात. घडल्या प्रकाराविषयी काहीही माहिती नसणारे प्रवासी विविध वाहनांमधून सहकुटुंब प्रवास करत असतात आणि अचानक झालेला रास्ता रोको समोर येतो. लहान मुलेबाळे सोबत असतील तर भुकेने त्यांचा जीव व्याकुळ होतो. आई-वडिलांना काही सुचेनासे होते आणि मग हे प्रवासी मनातल्या मनात रास्ता रोको करणार्‍यांना शिव्यांची लाखोली वाहत असतात. पण लक्षात कोण घेतो?

एखादा निकाल आपल्या पक्षाच्या विरोधात गेल्याबरोबर कोणाही कार्यकर्त्याने आपल्या घरचा टीव्ही फोडला किंवा फर्निचरची नासधूस केली, अशी बातमी अद्याप आपल्या पाहण्यात आलेली नसेल. राग आला की बाहेर पडायचे आणि रास्ता रोको करायचा, सार्वजनिक मालमत्तेची नासधूस करायची हे ठरलेले असते. आजकाल जोडे मारो आंदोलन किंवा रास्ता रोको करण्यापूर्वी व्हिडीओ पत्रकारांना आधी बोलावले जाते आणि ते आल्यानंतरच विरोधी पार्टीच्या नेत्याच्या पुतळ्याचा यथासांग अंत्यविधी केला जातो. हे सगळे करायचे कशासाठी, तर वरिष्ठ लोकांना खूश करण्यासाठी. इतके राजकारण खालच्या स्तराला गेलेले आहे हे कोणीही मान्य करेल.

काय करायचे असेल ते करा रे बाबांनो; पण काही झाले तरी रस्ते मात्र रोखू नका. उद्या सगळेच लोक असे रस्ते रोखायला लागले तर राज्याचा आणि देशाचा गाडा चालणार तरी कसा, याचा कोणी विचार करणार आहे की नाही? फटाके फोडा, पेढे वाटा, टीव्हीवरच्या बातम्यांमध्ये पण झळका. पण जाळपोळ आणि रास्ता रोको करून आपला राग घराबाहेर येऊन व्यक्त करण्यापेक्षा जी काय तोडफोड करायची असेल ते आपल्याच घरी करा, अशी सर्वांना विनंती केली पाहिजे. निकाल येणार आहे म्हणल्यावर कोणीतरी जिंकणार आणि कोणीतरी हरणार हे निश्चित असते. जिंकल्यानंतर संयत स्वरूपात आनंद व्यक्त करणे आणि हरल्यानंतर तो पराभव पचवणे हे ज्या दिवशी भारतीय राजकारणी लोकांना कळेल, तो सुदिन समजला जाईल.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news