विमान कंपन्यांची नफ्याची उड्डाणे | पुढारी

विमान कंपन्यांची नफ्याची उड्डाणे

संतोष घारे, सीए

जगभरातील विमान उद्योग कोरोनाकाळातील तीव्र पडझडीनंतर 2023 मध्ये फिनिक्स पक्ष्याप्रमाणे भरारी घेताना दिसून आला आहे. सलग तीन वर्षे नुकसानीचा सामना केल्यानंतर या उद्योगाने दमदार नफा कमावला आहे. इंटरनॅशनल एअर ट्रान्स्पोर्ट असोसिएशनच्या माहितीनुसार, विमान उद्योगाचा गतवर्षीचा एकूण नफा 23.3 अब्ज डॉलर्स इतका आहे. गतवर्षी या उद्योगाला 3.8 अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले होते. गेल्या वर्ष -दीड वर्षामध्ये भारतीय पर्यटकांच्या भटकंतीला उधाण आल्यामुळे विमान कंपन्यांचे उत्पन्न लक्षणीयरीत्या वाढले आहे.

जगभरातील विमान कंपन्या कोरोना काळात तावून सुलाखून निघाल्या. 2023 मध्ये आर्थिक संकटातून बाहेर पडल्या. सलग तीन वर्षे प्रचंड नुकसान सहन करत आता या हवाई उद्योगाने नफा कमावण्यास सुरुवात केली आहे. इंटरनॅशनल एअर ट्रान्स्पोर्ट असोसिएशनने म्हटले, विमान उद्योग 2023-24 या आर्थिक वर्षात एकूण 23.3 अब्ज डॉलरचा नफा कमवू शकतो. गेल्यावर्षी विमान उद्योगाला 3.8 अब्ज डॉलरचा फटका बसला आणि तो अंदाजापेक्षा अधिक होता. डिसेंबर 2022 मध्ये विमान उद्योगाच्या आर्थिक उन्नतीबाबत मत मांडताना आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेने 2023 पासून फारशा अपेक्षा नसल्याचे म्हटले होते.

उद्योगाला नाममात्र फायदा होईल, असे भाकीत केले होते. त्यावेळी 4.7 अब्ज डॉलरच्या फायद्याचा अंदाज वर्तविला होता. पण विमान उद्योगाने आश्चर्यकारकपणे उत्पन्नात वाढ केली. यादरम्यान ‘आयएटीए’चे संचालक विली वॉल्श यांनी विमान कंपन्यांच्या संयमाचे कौतुक केले. कोरोनामुळे विमान उद्योग सुमारे चार वर्षे मागे गेल्याचे म्हटले होते. परिणामी 2023 मध्ये झालेला फायदा हा खूपच कमी असल्याचे त्यांनी सांगितले. पुढच्या वर्षी विमान उद्योगाला 964 अब्ज डॉलरची ऐतिहासिक कमाई होण्याची अपेक्षा असून ही कमाई सुमारे 24 अब्ज डॉलरचा फायदा मिळवून देणारी आहे. मात्र हे केवळ सुरुवातीचे अंदाज आहे. विमान उद्योगातील तज्ज्ञांच्या मते, 2024 मध्ये चार कोटीपेक्षा अधिक उड्डाणे होतील, असा कयास आहे.

यादरम्यान, भारतीय पर्यटक उद्योगाची भरभराट होत आहे. भारतीय नागरिक हे प्रामुख्याने ईशान्य देशांचा प्रवास करत असून चीनमधील मंदीची भरपाई करण्याचे काम करत आहेत. भारतीय पर्यटकांकडून कमाई होण्याची अपेक्षा थायलंड, श्रीलंका, मलेशियासारख्या देशांना असून त्यांनी भारतीय पर्यटकांसाठी व्हिसा फ्री प्रवेशाची घोषणा केली. आजकाल ईशान्य देश, जसे थायलंडमध्ये भारतीय पर्यटकांची वर्दळ वाढली आहे. व्हिसा फ्री प्रवेशाशिवाय इंडिगो अणि थाय एअरवेजसारख्या विमान कंपन्यांनी माफक दरात हॉटेल उपलब्ध करून दिले असून विशेष ऑफरचादेखील मारा केला जात आहे. नवनव्या कंपन्या भारताच्या पर्यटन व्यवसायात आपला सहभाग वाढविण्याचा प्रयत्न करत आहेत.

विमान उद्योगातील तज्ज्ञ ब—ॅडन सोबी म्हणतात, ईशान्य आशिया पर्यटनाच्या आघाडीवर विकासाला वाव असणारे ठिकाण असून तेथे भारतीय पर्यटकांच्या माध्यमातूनच समृद्धी पोहोचणार आहे. अनेक ईशान्य आशियाई देशांसाठी पर्यटन उद्योग हा अर्थव्यवस्थेच्या प्रमुख आधारस्तंभापैकी एक आहे. कोरोना काळापूर्वी या क्षेत्राने एकूण जीडीपीचा 12 टक्के वाटा उचलला आहे. ऑर्गनायझेशन ऑफ इकॉनॉमिक कॉर्पोरेशन डेव्हलपमेंट (ओईसीडी) च्या मते, या विमान उद्योगात चार कोटींपेक्षा अधिक नागरिक काम करत आहेत. गेल्या एक दशकापर्यंत या उद्योगाला चीनकडून मोठे पाठबळ मिळायचे. चीनचे नागरिक फिरण्यासाठी ईशान्य देशांकडे जाण्यास उत्सुक असत आणि परिणामी विमान उद्योगांची चांदी व्हायची. मात्र या क्षेत्रातील चार देशांचे आकडे पाहिले तर मे 2019 म्हणजेच कोरोना लॉकडाऊनच्या तुलनेत 2023 च्या मे महिन्यात चिनी पर्यटकांची संख्या ही 60 टक्क्यांनी कमीच राहिली आहे. याउलट भारतीय पर्यटकांची संख्या ही दीर्घकाळापर्यंत वाढतच राहिली तर अनेक विमान आणि पर्यटन उद्योगात व्यापके बदल पाहावयास मिळतील.

Back to top button