‘आप’ विरुद्ध काँग्रेस | पुढारी

‘आप’ विरुद्ध काँग्रेस

विरोधी पक्षांच्या एकजुटीची खिल्ली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच ‘मिलावटी ऐक्य’ या शब्दांत उडवली होती, तर ‘इंडिया’ आघाडीच्या सरकारला दरदिवशी नवीन पंतप्रधान आणावा लागेल, असा उपरोधिक सूर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लावला होता. लोकसभा निवडणूक तोंडावर असल्याने टीकेचा जोर विरोधकांपेक्षा सत्ताधार्‍यांकडूनच अधिक आहे. विरोधी आघाडी त्यापासून कोणता धडा घेणार, हा प्रश्न आहे. सत्ताधार्‍यांकडून होणारी ही टीका खरी ठरवण्यासाठीच ‘इंडिया’ आघाडी जणू प्रयत्नांची शिकस्त करत असल्याचे दिसते! बिहारचे मुख्यमंत्री आणि ‘जदयू’चे प्रमुख नितीशकुमार आघाडीवर नाराज असल्याच्या चर्चेने राजकारण तापते आहे.

बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव आणि नितीशकुमार यांच्यातही अंतर निर्माण झाले असून, तेजस्वी यांना अचानकपणे नवीन राजकीय घडामोडींपायी आपला ऑस्ट्रेलियाचा दौरा रद्द करावा लागला. जदयू आणि लालू-तेजस्वी यांचा ‘राजद’ हे ‘इंडिया’ आघाडीचे घटकपक्ष. आघाडीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून कोणाचेही नाव निश्चित करण्याची गरज नाही, असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. तर आघाडीच्या नेत्याचे नाव लवकरात लवकर ठरवायला हवे, अशी भूमिका शिवसेना गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनी आघाडीचे नेते म्हणून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे नाव सुचवले. पण स्वतः खर्गे यांनीच या सूचनेला कोणताही प्रतिसाद दिलेला नाही. महाराष्ट्रात आम्हाला 23 जागा लढवायच्या आहेत, असे शिवसेना ‘उबाठा’ गटाचे खासदार संजय राऊत यांनी जाहीर केल्याबरोबर, काँग्रेसचे माजी खासदार संजय निरुपम यांनी, मग आम्हाला किती जागा उरणार, असा सवाल उपस्थित केला आहे. राऊत यांनी तर, आमची काँग्रेस पक्षश्रेष्ठींशी दिल्लीत चर्चा सुरू असल्याचे सांगून, एक प्रकारे आम्ही राज्यातील काँग्रेस नेत्यांना काही किंमत देत नाही, असेच सूचित केले आहे . वंचित आघाडीला ‘इंडिया’ आघाडीत घ्यायचे की नाही, याबद्दलही निर्णय होत नसून, आघाडीतील घटकपक्षांच्या उलटसुलट प्रतिक्रिया ऐकू येत आहेत. मागील विधानसभा निवडणुकांपूर्वी पंजाबमध्ये काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नीविरुद्ध तत्कालीन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांच्यातील मतभेद उघड झाले. आज हे चन्नी कुठे आहेत? त्यांच्याच नेतृत्वाखाली काँग्रेसचा खुर्दा उडाला आणि मग भगवंत मान यांच्या नेतृत्वाखालील ‘आप’चे सरकार सत्तेवर आले. सिद्धू यांनी 2022च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि ‘आप’चे प्रमुख अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली होती. नवज्योतसिंग यांनी पंजाबचे नेतृत्व करावे, अशी केजरीवाल यांची इच्छा होती, असे ट्विट नवज्योतसिंग सिद्धू यांच्या पत्नीने केले होते. तुम्ही ज्या मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसला आहात, ती खुर्ची तुम्हाला सिद्धू यांच्यामुळेच मिळाली आहे, असे त्यांनी म्हटले होते. त्यानंतर या दोन नेत्यांमध्ये चकमक झडली आणि परस्परांची संभावना ‘विदूषक’ या शब्दात केली गेली.

तिकडे काही महिन्यांपूर्वी दिल्ली सरकारचे अधिकार मर्यादित करणारे विधेयक केंद्र सरकारने आणले होते. त्या विधेयकाविरोधात काँग्रेसने ‘आप’ला पाठिंबा द्यावा, ही मागणी केजरीवाल यांनी ‘इंडिया’ आघाडीच्या पाटणा येथील बैठकीत केली होती. पुढे काँग्रसेने ‘आप’ची ही मागणी मान्यही केली व त्याप्रमाणे मतदानही केले. आज ‘इंडिया’ आघाडीत काँग्रेस व ‘आप’ हे दोन्ही पक्ष असूनही लोकसभा निवडणुकांत पंजाबमध्ये आम्ही काँग्रेसशी आघाडी करणार नाही, अशी भूमिका मान यांनी घेतली होती. मुळात पंजाब काँग्रेसचाही अशी आघाडी करण्यास विरोध असून, त्याचा काडीचा फायदा होणार नाही, असे काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांचे मत आहे. मात्र, काँग्रेसच्या या पवित्र्यासंबंधी प्रश्न विचारला असता, काँग्रेसचे अजून नुकसान व्हायचे म्हणजे काय, असा उपरोधिक शेरा मारताना दिल्ली आणि पंजाबमधील आया आता आपल्या मुलांना ‘एक थी काँग्रेस’ अशी लघुकथा ऐकवू शकतील, अशी शेलकी प्रतिक्रियाही मान यांनी व्यक्त केली होती. 2022 मध्ये ‘आप’ने स्वतंत्रपणे निवडणुका लढवून पंजाब विधानसभेच्या 117 पैकी 92 जागा जिंकून तेथे सरकार स्थापन केले.

‘आप’ने दिल्ली विधानसभा निवडणुकांत तीनवेळा विजय मिळवला, तर गुजरातेत स्वबळावर निवडणूक लढवून 13 टक्के मते मिळवली. पंजाबमधील विरोधी पक्षनेते प्रतापसिंग बाजवा हे काँग्रेसचे आहेत. त्यांनी, तसेच काँग्रेसचे माजी मंत्री परगतसिंग यांनीही जाहीरपणे ‘आप’शी युती करण्यास विरोध दर्शवला आहे. मात्र, ‘आप’ आणि काँग्रेस यांनी जागांबाबत समझोता केला पाहिजे, अशी ठाम भूमिका केजरीवाल यांनी मांडली आहे. आता देश वाचवण्याची युक्ती त्यांनी दाखवली आहे! अलीकडे पाच राज्यांत झालेल्या निवडणुकांपैकी काही राज्यांत ‘आप’ने स्वतंत्रपणे उमेदवार उभे केले होते. त्यापूर्वी गोवा विधानसभेतही मुख्यमंत्रिपदाचा उमेदवारही ‘आप’ने प्रोजेक्ट केला; पण तेथे काँग्रेस व ‘आप’ दोघांचाही पूर्णपणे बोर्‍या वाजला. गुजरातमध्येही विधानसभा निवडणुकीच्या वेळी ‘आप’ आणि काँग्रेस यांच्यात चकमक झडली होती आणि दिल्लीतही दोन्ही पक्षांमधून विस्तव जात नाही. मुळात दिल्लीत शीला दीक्षित मुख्यमंत्री असताना, त्यांच्याविरुद्ध रान उठवूनच ‘आप’ने प्रथम सत्ता चाखली. काँग्रेसप्रणीत ‘यूपीए’च्या भ—ष्ट सरकारविरोधात अण्णा हजारेंच्या नेतृत्वाखाली जे आंदोलन झाले, त्याचे दिग्दर्शक केजरीवालच होते. काँग्रेसने देशात भ—ष्टाचाराचा बाजार मांडला आणि तो नष्ट करण्यासाठी ज्यांनी ‘आप’ हा राजकीय पक्ष स्थापन केला, तेच ‘इंडिया’ आघाडीत काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत. गंमत म्हणजे, काँग्रेस व ‘आप’ या दोन्ही पक्षांत एकमेकांशी सहकार्य करण्यास स्थानिक नेत्यांचा विरोध आहे. तरीही आघाडीची भेसळ जनतेने गोड मानून घ्यावी, असा ‘इंडिया’ आघाडीच्या नेत्यांना आग्रह दिसतो. परंतु, भारतीय मतदार सुज्ञ आहे.

Back to top button