जुने जाऊ द्या...! | पुढारी

जुने जाऊ द्या...!

डिसेंबर महिन्याचा शेवटचा आठवडा जसा लागतो, तसे उत्साही लोकांना 31 डिसेंबरचे वेध लागतात. गेले बारा महिने कॅलेंडरचे पान उलटत असतो. डिसेंबर संपला की, कॅलेंडरच बाजूला ठेवून नवे कॅलेंडर लावण्याची वेळ येते. अर्थात, नवीन वर्षाचे आगमन होते. आजकाल प्रत्येक गोष्टीचा उत्सव केला जात असल्यामुळे सरत्या वर्षाला निरोप देण्याची हौस खूपच वाढलेली आहे. 31 डिसेंबरच्या मध्यरात्री म्हणजेच एक जानेवारीच्या पहाटेच्या सांध्यावर केवळ आपल्या देशातच नाही, तर जगभर सर्वत्र जल्लोष साजरा केला जात असतो. गेल्या वर्षभरात असे कोणते दिवे लावलेले असतात म्हणून येणार्‍या वर्षात आणखी भव्य दिव्य कामगिरी केली जाईल ते देवच जाणे! पण उत्साह असतो हे नक्की. आयुष्य म्हणजे असतेच काय, तर सरत जाणार्‍या काळाचा लेखाजोखा. काय गमावले आणि काय कमावले याचा हिशोब करताना, आयुष्य जसे काही झाडाच्या पानावरून दवबिंदूचा थेंब गळावा तसे निसटून जात असते.

आता मोबाईल नावाचा नवीन प्रकार हातामध्ये आल्यापासून पूर्वीसारखे नवीन वर्षाच्या शुभेच्छा देणारे फोन येत नाहीत. त्याऐवजी शुभेच्छा फुलांचा भडिमार केला जातो. इकडची फुले उचलायची आणि तिकडे टाकायची आणि तिकडची फुले उचलायची आणि इकडे टाकायची, हा खेळ दिवसभर खेळणारे अनेक जण 31 डिसेंबरला व्यस्त असतात. 31 डिसेंबरला सरलेल्या वर्षाला निरोप आणि एक जानेवारीला नवीन येणार्‍या वर्षाचे स्वागत सर्वत्र उत्साहाने केले जाते. 31 डिसेंबरच्या संध्याकाळपासूनच या उत्सवाला सुरुवात होते. ज्यांना घरी बसणे शक्य नसते ते समुद्रकिनारी हॉटेल्स आणि रिसॉर्टस्मध्ये डेरा टाकून बसलेले असतात. अर्थात, तिथेही खूप गर्दी असल्यामुळे त्याची बुकिंग आधी करावी लागते. ऐन वेळेला जाऊन असे काही होईल अशी भारतात शक्यता अजिबात उरलेली नाही. पूर्वी मित्र-मित्र, मैत्रिणी-मैत्रिणी बाहेरगावी जाऊन नवीन वर्षाचे आगमन साजरे करत असत. आजकाल पूर्ण कुटुंबाच्या कुटुंब फिरायला जाते आणि 31 डिसेंबरची पार्टी जल्लोषात साजरी करते.

येणारे तीन-चार दिवस सोशल मीडियावर लोकांनी नवीन वर्षाचे कसे स्वागत केले, याच्या पोस्ट आणि रिल्स यांचा भडिमार असणार आहे. नवीन वर्षाच्या स्वागताचा उत्सव हा आणखी एका द़ृष्टीने वैशिष्ट्यपूर्ण आहे. अर्थव्यवस्थेच्या बाबतीत आपण जगामध्ये पाचव्या क्रमांकावर असलो तरी, जर लोकसंख्येच्या प्रमाणात 31 डिसेंबर जास्त कुठे साजरा केला जातो याची माहिती घेतली, तर आपला भारत देश प्रथम क्रमांकावर असेल.

संबंधित बातम्या

इतक्या मोठ्या संख्येने जर वर्षाचा शेवटचा दिवस आणि नवीन वर्षाचा पहिला दिवस साजरा केला जात असेल, तर यावरून हा निष्कर्ष काढता येईल की, भारतातील लोक येणार्‍या काळासाठी मोठी उमेद बाळगून आहेत. त्याचबरोबर सरत्या काळाप्रती कृतज्ञ आहेत. या दोन गोष्टी हे दर्शवतात की, भारतीय लोकांचा हॅप्पीनेस इंडेक्स खूप चांगला आहे. ‘जुने जाऊ द्या मरणालागुनी, जाळून किंवा पुरूनी टाका,’ या उक्तीला अनुसरून गतकाळातील घडलेल्या दु:खद घटना, सहन कराव्या लागलेल्या वेदना, कटू स्मृती या सर्वांना तिलांजली देऊन येणार्‍या नवीन वर्षाचे स्वागत करूयात!

Back to top button