भारतीय चलनाला बळकटी! | पुढारी

भारतीय चलनाला बळकटी!

संतोष घारे, सीए

गेल्या काही काळात भारतीय चलनाचे महत्त्व जागतिक स्तरावर अधोरेखित होत आहे. संयुक्त अरब अमिरातीकडून भारताने कच्चे तेल खरेदी करताना यासाठीच्या देयकाची रक्कम डॉलरऐवजी रुपयात अदा केली. ही एक ऐतिहासिक घटना म्हणावी लागेल. यापूर्वीही भारताने रशियाकडून स्थानिक चलनातच तेलाची खरेदी केली आणि श्रीलंकाही भारतीय रुपयाला जागतिक महत्त्व यावे, अशी अपेक्षा व्यक्त करत आहे. एकंदरीतच, आगामी काळात भारताची अर्थव्यवस्था ही तिसर्‍या क्रमाकांची होण्याची शक्यता वर्तविली जात असताना, जागतिक पातळीवर रुपयाला मिळणारी बळकटी महत्त्वाची ठरणार आहे.

भारतीय चलनाचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे. संयुक्त अरब अमिरातीकडून आयात केलेल्या कच्च्या तेलाचा भरणा रुपयाद्वारे केल्याने आपले चलन जागतिक चलन म्हणून नावारूपास येण्याच्या द़ृष्टीने वाटचाल करत आहे. रशिया-युक्रेन युद्ध आणि इस्रायल-हमास संघर्षामुळे सध्या जागतिक व्यापारात बरीच उलथापालथ सुरू असताना, भारताने प्रथमच संयुक्त अरब अमिरातीकडून खरेदी केलेल्या तेलाचे बिल रुपये चलनांतून भरले. एकुणातच, रुपया जागतिक चलनाच्या दिशेने जात आहे. या निर्णयामुळे भारत-यूएई यांच्यात केवळ आर्थिक संबंध वृद्धिंगत झाले नाहीत, तर आंतरराष्ट्रीय आर्थिक आघाडीवरही भारतीय रुपयाचे महत्त्व वाढले आहे. अशा प्रकारचा ऐतिहासिक व्यवहार हा भारत-यूएई यांच्यात झालेल्या एका व्यापारी कराराचा परिणाम आहे.

भारताने जुलैमध्ये संयुक्त अरब अमिरातीशी रुपयांमध्ये सेटलमेंट करण्यासाठी औपचारिक करार केला होता. यानंतर इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने अबूधाबी नॅशनल ऑईल कंपनीकडून भारतीय रुपयात 10 लाख बॅरल कच्चे तेल खरेदी करण्यासाठी पैसे दिले आहेत. याशिवाय भारताने काही रशियन आयातीचे पैसेही रुपयात दिले आहेत. त्याचवेळी 35 हून अधिक देशांनी रुपयात व्यापार सेटलमेंटसाठी स्वारस्य दाखवले आहे. या करारानुसारच भारताने कच्च्या तेलाच्या एका खेपेची रक्कम आपल्या चलनातून भरली. यापूर्वी पारंपरिकरित्या त्याचा भरणा हा अमेरिकी डॉलरने केला जात असे. अर्थात, आतापर्यंतच्या पारंपरिक निकषांनुसार होणार्‍या व्यवहारात जाणीवपूर्वक केलेला बदल हे एक धाडसी पाऊल मानले जात आहे. त्याचे जागतिक व्यापाराच्या घडामोडींवर व्यापक परिणाम होणार आहेत.

रुपयात बिल भरण्याचा भारत सरकारचा निर्णय हा चलनसाठ्यात वैविध्यपणा आणण्याच्या व्यापक राष्ट्रीय रणनीतीचा एक भाग आहे. ऐतिहासिक रूपाने अमेरिकी डॉलर हा आंतराष्ट्रीय व्यापारात नेहमीच प्रभावशाली राहिलेला आहे. त्यामुळे रुपयाचा पर्याय निवडत भारताने डॉलरवरची असणारी अवलंबिता कमी करणे आणि आपल्या चलनाचा वापर वाढविणे, या द़ृष्टीने ऐतिहासिक पाऊल टाकले. यूएईशी रुपयांत व्यवहार करण्याची व्यवस्था विकसित करत भारताने जागतिक पातळीवर आघाडी घेतली. सध्याच्या काळात अनेक देश केवळ नवीन आर्थिकसत्ता म्हणून भारताकडे पाहत नाहीत, तर रुपया चलनाबाबतही पाठिंबा देण्यासाठी पुढे येत आहेत.

रुपयांतील व्यवहारामुळे त्याचा केवळ आर्थिक प्रभाव जाणवणार नाही, तर भारत आणि यूएई यांच्यातील आर्थिक आणि सामरिक संबंधही मजबूत होतील. अशा कृतीतून एकमेकांवरच्या अर्थव्यवस्थेचा विश्वास व्यक्त होतो आणि हे देश पर्यायी चलनाचे उदाहरण म्हणून अन्य देशांसमोर येऊ शकतात. अर्थात, या व्यवहारामुळे भारताचा रुपया हा डॉलरजवळ पोचला, असा अर्थ निघत नाही. दुसरीकडे, अमेरिकी डॉलरने दीर्घकाळापासून जागतिक व्यापारावर प्रभाव टाकलेला आहे आणि सर्वांच्या परकीय चलन साठ्यात ‘फॉरेक्स’मध्ये डॉलरचा वाटा हा सुमारे 60 टक्के आणि जागतिक फॉरेक्स व्यवहारात 80 टक्क्यांपेक्षा अधिक वाटा डॉलरचाच आहे.

Back to top button