संक्रमण काळातील वास्तव | पुढारी

संक्रमण काळातील वास्तव

- विश्वास सरदेशमुख, ज्येष्ठ विश्लेषक

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना 28 डिसेंबर 1885 रोजी अ‍ॅलन ऑक्टेव्हियन ह्यूम यांनी केली. यामध्ये दादाभाई नौरोजी व दिनशा वाचा यांचाही सहभाग होता. स्वातंत्र्योत्तर काळ आणि स्वातंत्र्योत्तर काळातील अनेक वर्षे भारतीय जनमानसावर असणारा काँग्रेसच्या विचारधारेचा प्रभाव ऐंशीच्या दशकानंतर उत्तरोत्तर घसरत गेला. परिणामी, एके काळी लोकसभेच्या 414 जागांवर विजय मिळवणार्‍या देशातील या सर्वात जुन्या पक्षाला विरोधी पक्षनेतेपद मिळणेही दुरापास्त झाले. पक्षासाठी आगामी लोकसभा निवडणुका अस्तित्वाची लढाई असणार आहे.

स्वातंत्र्यपूर्व काळ आणि स्वातंत्र्योत्तर भारताच्या जडणघडणीमध्ये, पायाभरणीमध्ये काँग्रेस पक्षाचे योगदान अनन्यसाधारण आहे, हा न पुसला जाणारा इतिहास आहे. ब्रि-टिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झाल्यानंतर जातीपातींमध्ये, धर्माधर्मांमध्ये विभागलेल्या या खंडप्राय देशाची उभारणी करण्याचे आणि देशात लोकशाही कार्यपद्धती प्रस्थापित करण्याचे आव्हान प्रचंड मोठे होते. परंतु, पंडित नेहरूंच्या नेतृत्वाने भारतात लोकशाहीचा पाया रचला गेला. पंडित नेहरू परदेश दौर्‍यावर जाताना ते इंदिरा गांधींना घेऊन जात असत. वडिलांच्या छत्रछायेखाली त्यांना आंतरराष्ट्रीय राजकारणाचे धडे मिळाले. त्यांची राजकीय सुरुवात भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतून झाली असली प्रत्यक्ष राजकारणाचा प्रवास आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरू झाला. म्हणून देशाच्या राजकारणामध्ये उतरताच त्यांनी काही सिद्धांत आणि तत्त्वे यांचा भक्कम आधार घेतला. नेहरूंचे निधन झाले तेव्हा त्या मंत्रिपदावर होत्या; पण वय लहान असल्यामुळे त्यांना पंतप्रधानपद मिळाले नाही. नेहरूंच्या निधनानंतर लाल बहादूर शास्त्री पंतप्रधान झाले. शास्त्रीजींचे आकस्मिक निधन झाले आणि तेथून काँग्रेसमधील इंदिरापर्वाची सुरुवात झाली. पण 1964 मध्ये नेहरूंच्या निधनानंतरच काँग्रेसमध्ये अंतर्गत मतभेद उफाळून येऊ लागले होते.

इंदिरा गांधी यांनी सत्ता हाती घेतल्यानंतर काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी आपापले स्वतंत्र पक्ष स्थापन केले. ओडिशा जनकाँग्रेस, बांग्ला काँग्रेस, भारतीय क्रांतिदल, उत्कल काँग्रेस आणि केरळ काँग्रेस अशी या पक्षांची नावे होती. 1969 मध्ये इंदिरा गांधी यांना इंडियन नॅशनल काँग्रेसमधून बाहेर काढण्यात आले. त्यांनी काँग्रेस (आर)ची स्थापना केली आणि 1971 ची निवडणूक लढविली. ‘आर’चा अर्थ रूलिंग असा होता. काँग्रेसच्या दुसर्‍या गटाचे नाव काँग्रेस (ओ) असे होते. ‘ओ’ म्हणजे ऑर्गनायझेशनल किंवा ओल्ड. या गटाचे नेते होते कामराज, निजलिंगप्पा, मोरारजी देसाई आणि एस. के. पाटील. काँग्रेस (आर) ने 1971 ची निवडणूक प्रचंड बहुमताने जिंकली. आणीबाणीनंतर 1977 च्या निवडणुकीत काँग्रेसचा मोठा पराभव झाला. 2 जानेवारी 1987 रोजी काँग्रेसमध्ये पुन्हा फूट पडली. इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस (आय)ची स्थापना झाली. 1984 मध्ये निवडणूक आयोगाने याच पक्षाला ‘खरी काँग्रेस’ म्हणून घोषित केले. परंतु, पक्षाच्या नावातून ‘आय’ हा शब्द खूप वर्षांनी म्हणजे 1996 मध्ये हटविला.

नरसिंहराव आणि सीताराम केसरी यांचा कार्यकाळ वगळता, काँग्रेस पक्षाचे नेतृत्व कायम गांधी-नेहरू कुटुंबाकडेच राहिले. काँग्रेसचा इतिहास पाहिल्यास, विद्यमान अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंच्या पूर्वीपर्यंत एकंदर 19 जण पक्षाध्यक्ष बनले. पहिले अध्यक्ष होते जे. बी. कृपलानी. काँग्रेसच्या निवडणुकीतील विजयाचा इतिहास पाहिल्यास, गेल्या 74 वर्षांत झालेल्या 17 सार्वत्रिक निवडणुकांमधील 7 वेळा गांधी-नेहरू कुटुंबाबाहेरील व्यक्तीने काँग्रेस अध्यक्ष म्हणून निवडणुकीत पक्षाचे नेतृत्व केले. त्यातील चार वेळा पक्षाला विजय प्राप्त झाला, तर गांधी-नेहरू कुटुंबातील पक्षाध्यक्ष असताना लढविलेल्या 10 निवडणुकांपैकी 4 निवडणुकांत काँग्रेसला पराभवास सामोरे जावे लागले.

1996 ची निवडणूक पी. व्ही. नरसिंहराव यांच्या नेतृत्वाखाली लढविली गेली होती. तीत काँग्रेसने 140 जागा जिंकल्या होत्या. गांधी कुटुंबापैकी राजीव गांधी, सोनिया गांधी आणि राहुल गांधी हेच असे नेते आहेत, ज्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला पराभवाला सामोरे जावे लागले. राजीव गांधी 1985 मध्ये पक्षाध्यक्ष बनले आणि 1989 मध्ये पक्ष निवडणुकीत पराभूत झाला. 1998 मध्ये सोनिया गांधी अध्यक्ष बनल्या आणि 1999 च्या निवडणुकीत पक्षाचा पराभव झाला. त्यानंतर 2014 च्या निवडणूकही सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखालीच झाली. या निवडणुकीत पक्षाच्या इतिहासातील सर्वात कमी म्हणजे अवघ्या 44 जागा जिंकण्यात यश आले. सोनिया यांच्यानंतर 2017 मध्ये राहुल गांधी अध्यक्ष बनले. त्यांच्या नेतृत्वाखाली पहिली निवडणूक 2019 मध्ये झाली. त्याहीवेळी काँग्रेसला अवघ्या 52 जागाच मिळाल्या.

गेल्या चार-साडेचार वर्षांमध्ये राहुल गांधी यांनी आपल्याभोवती विरोधकांनी निर्माण केलेला प्रतिमेचा कोश मोडून काढण्यासाठी अनेक प्रयत्न केले. ‘भारत जोडो यात्रे’च्या माध्यमातून त्यांनी पुन्हा तळागाळातील काँग्रेसजनांना साद घातली. याचे सकारात्मक परिणामही दिसून आले. याच दरम्यान काँग्रेस पक्षाने एक ऐतिहासिक पाऊल टाकत मल्लिकार्जुन खर्गे यांची अध्यक्षपदी निवड केली. त्यांच्या रूपाने काँग्रेस पक्षाला प्रदीर्घ काळानंतर गांधी कुटुंबाबाहेरचा अध्यक्ष लाभला. खर्गेंच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाला हिमाचल प्रदेश आणि कर्नाटकातील विधानसभा निवडणुकांमध्ये घवघवीत यश मिळाले आणि अलीकडेच झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीमध्ये तेलंगणातही विजय मिळाला. भाजपची राजकीय रणनीती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींभोवती असणारे लोकप्रियतेचे वलय यामुळे काँग्रेस पक्षाची गेल्या दशकभरात झालेली पडझड सावरणे खर्गेंपुढचे सर्वात मोठे आव्हान आहे. दुसरीकडे, ‘इंडिया आघाडी’ची स्थापना करण्यात आली असली तरी काँग्रेस पक्ष घटक पक्षांशी जुळवून घेण्याच्या मानसिकतेत नसल्याचे मध्य प्रदेशात दिसून आले आहे. 2024 ची लोकसभा निवडणूक ही काँग्रेस पक्षासाठी ‘करो या मरो’ची असणार आहे. यासाठी आता जेमतेम चार ते पाच महिन्यांचा कालावधी उरला आहे. स्थापना दिनाच्या निमित्ताने इतिहासातील चुका सुधारण्यावर विचारमंथनापेक्षाही समोरील आव्हानाला शह देण्यासाठी नवी मांडणी, नव्या भूमिका, नवे विचार घेऊन पक्षाला जनतेसमोर जावे लागेल.

Back to top button