एवढी लगबग कशासाठी?

एवढी लगबग कशासाठी?
Published on
Updated on

विकास नावाची काही गोष्ट असते की नाही? नागरिकांनी विकासामध्ये हातभार लावावा, अशी शासनाची इच्छा असेल, तर त्याला तुम्ही मान दिलाच पाहिजे. विकास करण्यासाठी कुठे बांधकामावर जाऊन राबण्याची किंवा एखादी कंपनी स्थापन करून शासनाच्या तिजोरीत पैसा टाकण्याची अजिबात गरज राहिली नाही. सगळे सोपे करून ठेवलेले आहे. फक्त त्यासाठी तुम्हाला भरपूर प्यावे लागणार आहे. काय प्यावे लागणार आहे म्हणून काय विचारता, तेच ते मेंदू बधिर करणारे द्रव प्यावे लागणार आहे. काय म्हणताय? निमित्त काय आहे? मोठे मोठे सण समोर येऊन उभे ठाकलेले आहेत. चला पटापट नियोजन करा.

25 डिसेंबर आणि 31 डिसेंबर जेवढी प्यायची तेवढी प्या, कमी पडणार नाही याची गॅरंटी शासनाने घेतलेली आहे. फारसे काही बदलत नसते वर्ष संपले की; पण मावळत्या वर्षाला निरोप दिलाच पाहिजे की नाही? तो निरोप देताना फुले उधळून चालणार नाही; टाटा बाय-बाय करून चालणार नाही. त्यासाठी भरपूर प्यावेच लागेल. मित्रांची पार्टी होईल. रात्रभर डान्स होईल. तुम्ही कितीही नियोजन केले असले, तरी मागवलेले मद्य कमी पडण्याची शक्यता आहे म्हणून खास तुमच्यासाठी यावर्षी सोय केलेली आहे. ती सोय म्हणजे पहाटे पाच वाजेपर्यंत तुम्हाला मद्य खरेदी करता येईल. संपले मद्य की, उठायचे आणि जाऊन पुन्हा आणायची आणि पुन्हा प्यायला लागायचे.

समजा तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये बसला आहात आणि तुम्हाला जास्त झाली, तर त्या हॉटेलच्या मालकावर तुम्हाला घरी सोडायची जबाबदारी पण लवकरच टाकणार आहेत म्हणे! पण, घराचा पत्ता तुम्हाला सांगता येईल किंवा सापडेल एवढे शुद्ध राहिली पाहिजे. जेवढे प्रगत देश आहेत त्या सर्व देशांमध्ये आतापासूनच नाताळच्या सुट्ट्या आणि 31 डिसेंबरचे नियोजन सुरू आहे. समुद्रकिनारी पार्ट्या होत आहेत. आपल्या राज्यात शेतामध्ये आणि गावाबाहेर पार्टीचे नियोजन आहे. मोठे मोठे डीजे लावले जातील. त्यावर मोठ्या आवाजात गाणी पण वाजवली जातील. तुम्ही नुसते नृत्य करून फारसा उपयोग होणार नाही. कारण, डान्स म्हणजे काय? आले वारे आणि गेले वारे. नृत्य करण्यापूर्वी मात्र भरपूर घेतली पाहिजे, याची काळजी घ्या म्हणजे आपोआपच तुमचा हातभार विकासकामाला लागेल.

काय म्हणताय? लक्षात येत नाही? अहो, सोपे आहे. जेवढी जास्त प्रमाणात घेतली जाईल तेवढा महसूल शासनाकडे गोळा होत राहील आणि गोळा झालेला महसूल काय शासन ठेवून घेते की काय? तो ते थेट विकासकामाला लावते. कितीतरी रस्त्यांची कामे रखडलेली आहेत, सिंचन प्रकल्प रखडले आहेत, बहुतांश एमआयडीसी निर्मनुष्य निरुद्योग झाल्या आहेत. या सर्व ठिकाणी आपल्याला हिरवळ आणायची आहे. विकासकामे करायची म्हटले की, पैसा लागतो आणि पैसा कमी असल्यानंतर शासनाने वेगवेगळ्या मार्गांनी महसूल उभा करावा, यासाठी ही नामी शक्कल काढली आहे.

या दोन दिवशी पहाटे पाच वाजेपर्यंत मुबलक दारू उपलब्ध असणार आहे. तुम्हाला फक्त एवढेच करायचे आहे की, तुमचे पैसे खर्च करून ती विकत घ्यायची आहे. तुम्ही खर्च करणार्‍या प्रत्येक पैशाचा काही एक वाटा शासनाच्या तिजोरी जात असतो आणि त्यातूनच विकासकामे होत असतात. त्यामुळे यावर्षी अजिबात हयगय करू नका. महिलावर्गाला विशेष विनंती आहे की, ख्रिसमस आणि 31 डिसेंबर साजरा करण्यासाठी आपले पतिराज घराबाहेर पडत असतील, तर तुम्ही नेहमी करता तसा त्यांना विरोध करू नका. त्यांना जाऊ द्या. फार जास्त झाली, तर कोणी ना कोणीतरी घरी आणून सोडेल आणि आपल्या पतीराजांना आपला पत्ता आठवत नसेल अशी परिस्थिती निर्माण झाली, तर त्यांच्या गळ्यामध्ये जसे ओळखपत्र असते तसे एक ओळखपत्र आणि तुमच्या घराचा फक्त अडकवून द्या. येतीलच ते सावकाश घरी!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news