तडका : सर्वेक्षणाचा अंदाज..!

तडका : सर्वेक्षणाचा अंदाज..!
Published on
Updated on

सध्या देशभरात रामनामाचा गजर सुरू आहे. उत्तर प्रदेशातील अयोध्या येथे रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होत आहे. या प्रतिष्ठापनेचे निमंत्रण देणार्‍या अक्षता घरोघर वाटल्या जात आहेत. एकंदरीत उत्सवी वातावरण आहे. त्या पाठोपाठ येतील लोकसभेच्या निवडणुका. त्याचेही वारे देशात वाहू लागलेले आहे. कोणत्याही निवडणुका जवळ आल्या की, सर्वेक्षण करणार्‍या संस्था हिरिरीने पुढे येतात आणि आज देशात निवडणुका झाल्या, तर कुणाला किती जागा मिळतील, त्याचे निष्कर्ष काढत असतात. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये निवडणूकपूर्व सर्व्हे पार पालथे पडलेले दिसले. असे का झाले असेल बरे?

आपल्यासारख्या सामान्य माणसांचे पण निष्कर्ष सहज चुकत असतात. कारण, एवढ्या मोठ्या जनसंख्येचा अंदाज काही हजार लोकांच्या मतांवरून घेता येणे अशक्य आहे. एक काल्पनिक उदाहरण पाहूया. आपला एखादा चुलत साडू किंवा एखादा नातेवाईक मध्य प्रदेशमधील इंदूरजवळ एखाद्या छोट्याशा गावात राहत असतो. आपण सहज त्याला फोन करून विचारतो की, राज्यामध्ये बीजेपीची काय परिस्थिती आहे? त्याचे बिचार्‍याचे आकलन त्याच्या गावापुरते, गल्लीपुरते फार फार तर जिल्ह्यापुरते असते. तिथे बीजेपीचे अवघड आहे, या त्याच्या त्या एका वाक्यावरून आपण आपल्या परिवारात सांगतो की, मध्य प्रदेशमध्ये भाजपचे अवघड आहे. सर्व्हे रिपोर्ट असेच काहीसे येतात आणि आपण म्हणायला लागतो की, आपला अंदाज किती बरोबर होता. त्या पाठोपाठ येणारे निकाल पाहताच आपल्या लक्षात येते की, सर्व अंदाजांना चकवा देऊन वेगळेच निकाल हाती आले आहेत. एकच सर्व्हेक्षण केवळ कोणता पक्ष निवडून येईल, यावर केले जात नाही. सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री कोण? गेल्या पाच वर्षांतील सरकारची कामगिरी कशी होती? सरकारच्या बाजूने असणारे मुद्दे कोणते होते? सरकारच्या विरोधी असणारे मुद्दे कोणते आहेत? अशा असंख्य गोष्टींची प्रश्नावली तयार असते आणि ही प्रश्नावली जेमतेम चार ते पाच हजार लोकांसमोर ठेवून भरली जाते. सांख्यिकीशास्त्र म्हणजेच स्टॅटिस्टिक्सचे नियम लावून त्याचे निष्कर्ष काढले जातात. असे गणित जुळवणे लोकसभेसाठी मात्र अत्यंत कठीण असते. कारण, एका खासदाराच्या निवडीसाठी मतदारांची संख्या दहा ते बारा लाखांपर्यंत असते. अशा तब्बल 500 पेक्षा जास्त आणि शंभर कोटींपेक्षा अधिक मतदार कव्हर करणारा सर्व्हे जेमतेम एक लाखभर लोकांना प्रश्न विचारून केला जातो आणि त्यामुळेच तो पालथा पडलेला दिसतो. जे राजकीय नेते धुरंधर असतात आणि ज्यांना पाच ते सहा निवडणुकांचा अनुभव असतो ते सर्व्हेचा काहीही रिपोर्ट आला, तरी निवांत बसलेले असतात. त्यांच्या त्यांच्या सूत्रांनी त्यांना आपल्या नेमक्या किती जागा येणार आहेत, याची खात्रीशीर संख्या सांगितलेली असते. पाच- पंचवीस जागा कमी पडण्याची शक्यता निर्माण झाली, तर लगेच निवडून येऊ शकत असलेल्या अपक्षांशी संपर्क साधला जातो. कारण, अपक्षांपैकी कोण निवडून येण्याची शक्यता आहे, याची पण त्यांना खात्रीशीर बातमी असते.

2024 मध्ये होणार्‍या लोकसभा निवडणुकीचे सर्व्हे आणि त्यांचे निष्कर्ष समोर यायला सुरुवात झाली आहे. कोणत्या पक्षाचे शासन येणार किंवा पंतप्रधान कोण होणार, याविषयी लोकांना उत्सुकता असणे, यात काहीही वावगे नाही. या सर्व्हे निष्कर्षाला भरपूर टीआरपी असतो. त्यामुळे अशा प्रकारचे सर्व्हे दाखवणे आणि त्यातील निष्कर्षावर चर्चा करण्यासाठी राजकीय तज्ज्ञांना बोलवणे यामुळे चॅनेलवाल्यांचे चार-पाच तास सहज वापरले जातात. टीव्ही न्यूज चॅनेलला सातत्याने खाद्य लागत असते. ते पुरवण्याचे काम असे सर्व्हे करत असतात.

– बोलबच्चन

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news