Bhagavad Gita | गीता : अध्यात्मसरितांचा मनोहारी संगम | पुढारी

Bhagavad Gita | गीता : अध्यात्मसरितांचा मनोहारी संगम

वैविध्य हे भौतिक जगताचे ठळक वैशिष्ट्य आहे. हा संसारपिंड भेदांनीच बनलेला आहे. त्यामध्ये सजातीय (उदा. एकाच प्रजातीच्या झाडांमधील भेद), विजातीय (उदा. वेगवेगळ्या प्रजातीच्या झाडांमधील भेद) आणि स्वगत (उदा. एकाच झाडामधील पाने, फुले, फांद्या असे भेद) अशा स्वरूपाच्या विविध भेदांचा समावेश होतो. आत्मतत्त्व मात्र अशा कोणत्याही भेदाने रहीत, अखंड, एकरस असते. भौतिक जगतच भेदांनी भरलेले असल्याने माणसांच्या बुद्धीमध्ये, रुचीमध्येही भेद असणे साहजिकच आहे. ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ असे म्हटले जात असतेच. त्यामुळे सर्वांचे गंतव्य स्थान असलेले सर्वव्यापी परमचैतन्य, परमात्मा एकच असला, तरी प्रत्येकाच्या रुचीनुसार मार्गभेद संभवतात. आधुनिक काळातच नव्हे, तर प्राचीन काळातही या एकाच ध्येयाकडे जाणारे अनेक मार्ग प्रचलित होते. त्यामध्ये कर्ममार्ग, योगमार्ग, भक्तिमार्ग आणि ज्ञानमार्गाचा समावेश होतो. शिवाय द्वैत, विशिष्टाद्वैत, शुद्धाद्वैत, द्वैताद्वैत, अद्वैत अशा मतांचाही समावेश होतो. अशा सर्व मार्गरूपी सरितांचा मनोहारी संगम श्रीमद् भगवद्गीतेत पाहायला मिळतो.

सर्वसमावेशकता असल्याने तसेच उपनिषदांचे सार असल्याने गीता कालौघात नेहमीच टिकून राहिली व नित्यनूतनही ठरली. खरे तर, हा एक स्वतंत्र ग्रंथ नाही. महाभारताच्या भीष्मपर्वात सातशे श्लोकांमध्ये समाविष्ट असलेला श्रीकृष्ण व अर्जुन यांचा संवादच ‘श्रीमद् भगवदगीता’ या नावाने जगद्विख्यात आहे; मात्र या संवादाला उपनिषदांचाही दर्जा मिळालेला आहे. गीतेच्या प्रत्येक अध्यायाच्या शेवटी ‘उपनिषत्सु’ असे म्हटलेले आहे. सातशे श्लोकांची आणि अठरा अध्यायांची ही गीता उपनिषदांचे सार असली किंवा उपनिषदांसारखीच मानली गेली असली, तरी तिचा समावेश स्मृती प्रस्थानामध्येच होतो. भारतीय अध्यात्म परंपरेत प्रस्थानत्रयीचे एक महत्त्व आहे. त्यामध्ये उपनिषदे हे श्रुती किंवा श्रौत प्रस्थान आहे व गीता ही महाभारतातील असल्याने तिला स्मृती किंवा स्मार्त प्रस्थान म्हटले जाते. तिसरे प्रस्थान ‘बह्मसूत्र’ हे दार्शनिक असून ते वेदव्यासप्रणीत आहे. या तिन्ही प्रस्थानांपैकी सर्वसामान्यांना सहज आकलन होऊ शकणारे प्रस्थान म्हणजे गीता. ‘गीता’ म्हणजे ‘भगवंताने गायिलेली’ स्वतः भगवान श्रीकृष्णांच्या मुखातून अवतरलेली ही गीता उपनिषदांमधील ब्रह्मविद्याच सोप्या व गोड भाषेत व्यक्त करणारी आहे. मुळातच उपनिषदांचे तत्त्वज्ञान हे ‘नेह नानास्ति किंचन’ (किंचितही भेद नाही) असे अभेद व ऐक्याचे ज्ञान देणारे आहे. त्यामुळेच गीताही बह्म व आत्म्याच्या ऐक्याबरोबरच सर्व प्रकारच्या अध्यात्म मार्गांच्याही ऐक्याचे साहजिकच वर्णन करते. सर्व प्रकारच्या दुःखांची आत्यंतिक निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती हे मोक्षाचे लक्षण आहे. हा मोक्ष बह्मात्मैक्य ज्ञानानेच मिळतो.

स्वस्वरूपाचे प्रत्यक्ष (अपरोक्ष) ज्ञान झाल्यावर मुक्त स्थिती प्राप्त होते. ‘ज्ञानादेव तु कैवल्यम’ असे म्हटले जाते. केवळ ज्ञानानेच मोक्षलाभ होत असला, तरी हे ज्ञान विविध शास्त्रसंमत मार्गाने उत्पन्न होऊ शकते. त्यामुळे गीतेत एकांगी मार्ग कुठेही सांगितलेला नाही. ज्याच्या त्याच्या क्षमतेनुसार, आवडीनुसार कोणत्याही मार्गाने गेले, तरी हे अपरोक्ष ज्ञान उत्पन्न होऊ शकते. त्यामुळेच गीतेत कर्ममार्ग, योगमार्ग, भक्तिमार्ग व ज्ञानमार्गरूपी अध्यात्मसरितांचा मनोहारी संगम पाहायला मिळतो. विविध मतांच्या आचार्यांनी ब्रह्मसूत्रे व गीतेवर भाष्य लिहून आपले मत स्थापन केले. द्वैत मताचे मध्वाचार्य, विशिष्टाद्वैत मताचे रामानुजाचार्य, शुद्धाद्वैत मताचे वल्लभाचार्य, द्वैताद्वैत मताचे निंबार्काचार्य आणि अद्वैत मताचे आद्य शंकराचार्य यांनी आपापल्या मतांनुसार गीतेवर भाष्य लिहिले आहे. या सर्व मतरूपी नद्यांनाही गीतारूपी सागराने सामावून घेतले. संत ज्ञानेश्वरांनी गीतेवरील मराठी ओवीबद्ध टीका असलेल्या ‘भावार्थ दीपिका’ म्हणजेच ज्ञानेश्वरीत चिद्विलासंवाद दर्शवला आहे. आधुुनिक काळातही योगी अरविंद, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी यांच्यासारख्या अनेक थोर पुरुषांनी आपापल्या मतानुसार गीतेचा भावार्थ समजून घेतला. कोणत्याही मताचा, मार्गाचा माणूस असला, तरी त्याला गीता आपलीच वाटते, हे गीतेचे ठळक वैशिष्ट्य आहे. अशा या अलौकिक ज्ञानग्रंथाची जयंतीही जगभर साजरी होते. त्यानिमित्ताने या ज्ञानग्रंथास व तो प्रकट करणार्‍या भगवान श्रीकृष्णास शतशः वंदन!
– सचिन बनछोडे

Back to top button