पाकिस्तानची बदमाशी

पाकिस्तानची बदमाशी

पाकिस्तान इज अ फेल्ड स्टेट म्हणजेच 'पाकिस्तान हे पूर्णतः अपयशी ठरलेले राष्ट्र आहे', असे जगातील अनेक नामवंत राजकीय इतिहासकारांनी नमूद करून ठेवले आहे. आज पाकिस्तानातील अर्थव्यवस्था कमालीच्या संकटात आहे. महागाईमुळे सामान्य माणसाचे जगणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे. प्रसिद्ध पाकिस्तानी अभिनेत्री आयेशा उमरने केवळ आपल्यालाच नव्हे, तर सर्वच महिलांना पाकिस्तानात सुरक्षित वाटत नसल्याचे जाहीर वक्तव्य केले. या देशाची 'खस्ता हालत' स्पष्ट व्हायला ते पुरेसे आहे. महिला सार्वजनिक ठिकाणी मोकळेपणाने वावरू शकत नसल्याची वेदना मांडताना 'मला कराचीत दोनदा लुटले गेले. पाकिस्तानात मी अपहरण, बलात्कार आणि चोरांच्या भीतीशिवाय निवांत जीवन कधी जगू शकेन' अशी भावनाही तिने व्यक्त केली आहे.

खुद्द पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान हे भ्रष्टाचाराच्या आरोपावरून तुरुंगात आहेत. तुरुंगात नेतानाही त्यांना मारहाण व धक्काबुक्की झाली. पाकिस्तानात लवकरच सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत, तरीही देशातील अस्थिरता संपण्याची चिन्हे नाहीत. आता पकिस्तानच्या आर्थिक संकटास भारत किंवा अमेरिका जबाबदार नाही, तर आम्हीच आमच्या पायावर कुर्‍हाड मारून घेतली. देशातली लष्कराच्या वर्तनामुळेच देश आर्थिकदृष्ट्या कंगाल झाला आहे, अशी तोफ माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान मुस्लीम लीग-नवाझ (पीएमएल-एन) प्रमुख नवाज शरीफ यांनी डागल्याने तेथील राज्यकर्त्यांना घरचा आहेर मिळाला. पाक लष्कराने 2018च्या निवडणुकीत गैरप्रकार करून, पंतप्रधानपदी इम्रान यांना 'निवडून आणले.' इम्रान यांच्या काळात देशाची आर्थिक धूळदाण उडाली, असा आरोप शरीफ यांनी केला. त्यात नक्कीच तथ्य आहे. लोकशाहीचे नाटक वठवण्यासाठी इम्रान नावाचे प्यादे उभारले गेले आणि ते लष्करालाच आव्हान देऊ लागल्यावर त्यांना न्यायालयाच्या मदतीने थेट जेलमध्येच टाकण्यात आले. अमेरिकेने षड्यंंत्र रचून आपल्याला पंतप्रधानपदावरून हाकलले, असा आरोप इम्रान यांनी केला होता, तरीही इम्रान यांच्याबद्दल पाकिस्तानात सहानुभूती असून अमेरिकाविरोधी धोरणामुळे त्यांची लोकप्रियता वाढूही शकते. तीन वर्षांपूर्वी नवाज शरीफ यांना लंडनमध्येच अटक करावी, असा फतवा पाक न्यायालयाने काढला होता. आता तेच शरीफ लष्कर तसेच न्यायालयाच्या आशीर्वादाने चार वर्षांनंतर मायदेशी परतले. पंतप्रधानपदी असताना त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाले आणि लष्कराच्या मनातूनही ते उतरले. त्यांना सत्तेतून बाहेर जावे लागले. सात वर्षांची शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर वैद्यकीय उपचारासाठी ते ब्रिटनमध्ये गेले. पाकिस्तानातील न्यायव्यवस्थाही अजब! सजा ठोठावली गेल्यानंतरही अतिमहत्त्वाची व्यक्ती आरोपी असेल, तर ती विदेशात जाऊन मजेत राहूही शकते, शिवाय लष्कराची मर्जी कधी कोणावर बसेल आणि कधी उतरेल, हेही सांगता येत नाही.

पाकिस्तानात सार्वत्रिक निवडणुका झाल्यास इम्रान व त्याच्या पक्षाला सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी लष्कर नवाज यांच्यामागे उभे राहण्याची शक्यता वर्तवली जाते. नवाज पंतप्रधान असताना पाकची प्रगती पाच टक्के गतीने होत होती, तर आज पाकिस्तानचे खायचे वांदे झालेले आहेत. काही वर्षांपूर्वी पनामा पेपर्स बाहेर आल्यानंतर नवाज यांनी परदेशात प्रचंड संपत्ती बनवली असून, लंडनमध्ये त्यांनी घरही खरेदी केल्याचे समोर आले. सर्वोच्च न्यायालयाने तर त्यांनी राजकारणात सक्रिय होण्यावरच कायमची बंदी घातली. त्यांना सरकारचे कोणतेही पद स्वीकारता येणार नाही, असे आदेशच न्यायालयाने दिले, तरीही पाकिस्तानात काहीही घडू शकते. नवाज यांनी नेहमीच भारताशी मैत्री असावी, अशी भूमिका घेतलेली आहे. परंतु, लष्कराचा त्यास विरोध होता. अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना त्यांनी लाहोर बसयात्रा केली तेव्हा नवाजच पंतप्रधान होते; मात्र त्यानंतर कारगिलमध्ये पाकिस्तानने घुसखोरी केली, तेव्हा परवेझ मुशर्रफ लष्करप्रमुख होते. मुशर्रफ यांनी यथावकाश बंड करून सत्ता हातात घेतली आणि शरीफ यांना तुरुंगात डांबले. त्यावेळी सौदी राजे फहाद यांच्या मदतीमुळे नवाज देशांतर करून जेद्दा येथे राहू शकले. पुढच्या टप्प्यात शरीफ पुन्हा एकदा पंतप्रधान झाले, तेव्हा पठाणकोट व उरी येथे पाक लष्कराने अतिरेकी हल्ले केले. त्यावरून शरीफ आणि पाकिस्तानी लष्कर यांचे मतभेद झाले होते. शरीफ यांना इस्लामाबाद उच्च न्यायालयाने आता अटकेपासून संरक्षण देणारा जामीन मंजूर केला आहे. त्यांच्या पीएमएल-एन पक्षाचे नेतृत्व सध्या त्यांचे बंधू व माजी पंतप्रधान शाहबाझ शरीफ करत आहेत. एप्रिल 2022 ते ऑगस्ट 2023 या काळात शाहबाझ पाकिस्तानचे पंतप्रधान होते; परंतु शाहबाझ यांना करिश्मा नाही; मात्र ते लष्कराचे लाडके आहेत. उलट नवाज यांच्या नावाचा देशभर दबदबा आहे. आज भारताच्या तुलनेत पकिस्तान अक्षरशः कःपदार्थ आहे. देशाचे सत्ताधारी जगभरात कटोरा घेऊन फिरत आहेत. वाजपेयी पंतप्रधान झाले, तेव्हा भारताकडे फक्त एक अब्ज डॉलरची गंगाजळी होती. आता ती 600 अब्ज डॉलर झाली, याकडे नवाज यांनी रास्तपणे लक्ष वेधले आहे.

लष्कराबरोबर तडजोड करूनच ते परतले असून, त्यामुळे त्यांना सत्तेत येण्यासाठी वा तेथे टिकून राहण्यासाठी समझोतेच करावे लागणार आहेत. गेल्या काही वर्षांत पाक लष्कराने सरकारच्या सर्व यंत्रणांत चंचुप्रवेश केला आहे. मुळात पंतप्रधानांचे अधिकारच मर्यादित करण्यात आले आहेत. नवाज यांचे मुख्य प्रतिस्पर्धी इम्रान असले, तरी त्यांना अपात्र घोषित करण्यात आले असून, त्यांचा पक्ष दुबळा झालेला आहे. पाकिस्तान पीपल्स पार्टीचे नेते बिलावल भुत्तो हे लष्कराच्या पसंतीचे नेते नाहीत; मात्र ज्या पाकिस्तानी लष्कर व न्यायव्यवस्थेवर शरीफ हे बरसत आहेत, त्यांच्याच सहकार्याने ते भविष्यात पाकिस्तानचे नेतृत्व करण्याची आकांक्षा बाळगून आहेत. उद्या नवाज यांना सत्तेची संधी 'मिळवून देण्यात' आली, तरीदेखील पाक लष्कराच्या हुकुमानुसारच त्यांना वागावे लागणार आहे. त्यामुळे नवाज येवोत वा अन्य कोणीही, भारतासंबंधीची पाकिस्तानची भूमिका मुळातून बदलण्याची शक्यता अजिबात नाही.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news