शेअर बाजार मचाये शोर!

शेअर बाजार मचाये शोर!

बर्कशायर हॅथवे या गुंतवणूक कंपनीचे अध्यक्ष आणि जगातील सर्वोत्कृष्ट गुंतवणूकदार मानले जाणारे वॉरन बफे यांचे एक सुप्रसिद्ध वचन आहे. 'श्रीमंत कसे बनायचे हे मी तुम्हाला सांगतो. जेव्हा इतर जण शेअर खरेदीसाठी उत्सुक असतील, तेव्हा तुम्ही सावध राहा आणि जेव्हा सर्व लोक खरेदीसाठी अनुत्सुक असतील, तेव्हा मात्र रिंगणात उतरा.' याचा अर्थ, जेव्हा तुम्ही प्रवाहाच्या विरुद्ध जाता, तेव्हा शेअर बाजारात तुम्हाला भरपूर लाभ मिळतो, हे सर्व सांगण्याचे कारण म्हणजे अमेरिकन अर्थव्यवस्थेच्या भरभराटीची चिन्हे, भारताच्या वाढीची सकारात्मक आकडेवारी आणि विदेशी गुंतवणूकदारांची तुफान खरेदी, यामुळे गेल्या आठवड्यात शेअर निर्देशांकात प्रचंड वाढ झाली.

सेन्सेक्स 71 हजारांच्या विक्रमी पातळीवर पोहोचला. धातू, आयटी तसेच टेक्नॉलॉजी कंपन्यांच्या शेअर्सच्या किमतीत उत्तम वाढ दिसून आली. अमेरिकेची अर्थव्यवस्था रुळावर येऊ लागली असून, तेथे व्याजदर कपात होण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची भारतातील गुंतवणूक आणखीनच वाढेल. शेअर बाजाराच्या सलग तीन सत्रांतील तेजीमुळे भारतीय गुंतवणूकदारांच्या अ‍ॅसेट किंवा मत्तेमध्ये आठ लाख कोटी रुपयांहून अधिक वाढ झाली.

आता तर येत्या काही दिवसांत सेन्सेक्स एक लाखावर जाईल, अशीही चर्चा सुरू आहे. तीन राज्यांतील विधानसभा निवडणुकांत भाजपने जबरदस्त यश मिळवल्यामुळे लोकसभा निवडणुकांतही याच यशाची पुनरावृत्ती होईल, अशी खात्री बाजारातील दलाल व गुंतवणूकदारांना वाटू लागली आहे. केंद्रात आणि राज्याराज्यांत बहुतेक ठिकाणी एकाच पक्षाची सरकारे असणे, यामुळे धोरणात्मक स्थैर्य राहते. ज्या राज्यांत भाजपचीच सरकारे आहेत, त्यांना केंद्राचे अधिक सहकार्य मिळते, हे स्पष्ट आहे. अर्थातच, सध्याचे हे वातावरण आर्थिक प्रगतीस पोषक असल्यामुळेच गुंतवणूकदार खूश आहेत. महत्त्वाचे म्हणजे, ही तेजी बॉड बेस्ड, म्हणजेच विविध क्षेत्रांतील निरनिराळ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये आलेली आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत बीएसई मिडकॅप निर्देशांकात 40 टक्क्यांची, तर स्मॉलकॅप निर्देशांकात 43 टक्क्यांची वाढ झाली. निफ्टी, बँक, ऑटो आणि आयटी अशा क्षेत्रवार निर्देशांकांतही लक्षणीय वृद्धी झाली असून, सरकारी क्षेत्रातील आणि खासगी क्षेत्रातील प्रमुख कंपन्यांच्या शेअर्सचे भावही वधारले. शेअर बाजारावर नेहमीच आंतरराष्ट्रीय तसेच देशातील घटनांचा परिणाम होत असतो. कच्च्या तेलाचे भाव घसरले आहेत. तसेच दहा वर्षे मुदतीच्या अमेरिकेन कर्जरोख्यांवरील यील्ड किंवा उत्पन्न हे कमी झाले आहे. हे आव्हान असतानाही निर्देशांकाचा बैल चौखूर उधळला, हे लक्षात घ्यावे लागेल.

2024 मध्ये अमेरिकेत टप्प्याटप्प्याने व्याजदरांना कात्री लावली जाईल, असे स्पष्ट संकेत देण्यात आल्यामुळे, बड्या बड्या गुंतवणूक कंपन्या किंवा परदेशी अर्थसंस्था भारतासारख्या उदयोन्मुख बाजारपेठांकडे वळणार, यात शंकाच नाही. केंद्रीय सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी खात्याने दिलेल्या माहितीनुसार, चालू वर्षाच्या दुसर्‍या तिमाहीत भारताचे ठोकळ देशांतर्गत उत्पादन, म्हणजेच जीडीपी 7.6 टक्क्यांनी वाढले आहे. रिझर्व्ह बँकेने, या संपूर्ण आर्थिक वर्षात मिळून 6.5 टक्के दराने जीडीपी वाढ होईल, असा अंदाज व्यक्त केलेला आहे. इतर अनेक देशांच्या अर्थव्यवस्थांच्या मानाने भारताची प्रगती नक्कीच उल्लेखनीय आहे. ऑक्टोबर महिन्यातच देशातील औद्योगिक उत्पादन 11.7 टक्क्यांनी वाढले, तर विजेच्या उत्पादनात 20 टक्क्यंची भरघोस वाढ झाली. भांडवली वस्तू, बांधकाम, पायाभूत व्यवस्था आणि गृहोपयोगी वस्तू या उद्योगांची गाडीही व्यवस्थित चालू आहे. देशातील मुख्य डिपॉझिटरी असलेल्या 'सीएसडीएल' या कंपनीकडे दहा लाख डीमॅट खाती आहेत. तसेच म्युच्युअल फंड उद्योगाच्या निव्वळ मालमत्तांमध्ये उत्तम वृद्धी झालेली आहे.

सिस्टिमॅटिक इन्व्हेस्मेंट प्लॅन्स किंवा एसआयपीमध्ये तर नोव्हेंबरात 17 हजार कोटी रुपये इतकी गुंतवणूक आकर्षित झाली. 'एस अँड पी ग्लोबल' या जगद्विख्यात वित्तीय कंपनीच्या निष्कर्षांनुसार, आगामी तीन वर्षांत भारत हा जगातील सर्वाधिक वेगाने प्रगती करणारा देश असेल. आज भारत ही जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. अमेरिका, चीन, जर्मनी आणि जपाननंतर भारताचा क्रमांक लागतो; परंतु 2030 मध्ये भारत ही जगातील तिसर्‍या क्रमांकाची अर्थव्यवस्था असेल, असा एस अँड पीचा ठाम विश्वास आहे; तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या 'वर्ल्ड इकॉनॉमिक आऊटलूक'नुसार, 2023 ते 2028 दरम्यान आपली अर्थव्यवस्था सरासरी 6.3 टक्के या गतीने वाढेल.

आज भारताची अर्थव्यवस्था 3.7 ट्रिलियन डॉलर्स इतकी आहे. ती 2028 पर्यंत 5.9 ट्रिलियन इतकी होईल. तसेच याच काळात भारताचे दरडोई जीडीपी जे आज 2,612 डॉलर आहे; ते 3,900 डॉलरपर्यंत जाईल. त्या तुलनेत, चीनच्या अर्थव्यवस्थेची वाढ न होता उलट घसरणच होणार असून, याच काळात तिच्या प्रगतीचा दर सरासरी चार टक्के असेल, असा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा अंदाज आहे. चीनमधील सरकारी उपक्रम आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांची अवस्था चांगली नाही. तसेच चीनच्या सार्वभौम रोख्यांबाबतचा द़ृष्टिकोन 'मूडीज'ने तरी नकारात्मक दर्शवला आहे. उलट चीनपेक्षा व्हिएतनामची प्रगती चांगली आहे. जागतिक पुरवठा साखळीची फेररचना होत असून, त्याचा लाभ व्हिएतनाम, मेक्सिको यासारख्या देशांना होत आहे.

भारतही जागतिक उत्पादन केंद्र म्हणून उदयाला येऊ शकतो आणि चीनमधील काही गुंतवणूक आपल्याकडे खेचून घेऊ शकतो; परंतु गुंतवणूकदारांच्या द़ृष्टीने सर्वच गोष्टी अनुकूल आहेत, असे नाही. आपला आर्थिक विकासदर काहीसा मंदावू शकेल, असेही मत काही अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. गेल्या दहा वर्षांच्या सरासरीपेक्षा सेन्सेक्स हा जास्त पातळीला जाऊन पोहोचला आहे. शेअर्सचे भाव प्रमाणाबाहेर वाढतात, तेव्हा भावांचा उलट्या दिशेनेही प्रवास होऊ शकतो म्हणूनच बफे म्हणतात, त्याप्रमाणे गुंतवणूकदारांनी सावध होऊन नीट विचार केला पाहिजे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news