हा अभिनय आता थांबवा! | पुढारी

हा अभिनय आता थांबवा!

आपल्या राज्यामध्ये दिवसभर जे काय चालते ते टीव्हीवर पाहिले तर आपल्या लक्षात येईल की, अजिबात मागेपुढे न पाहता ज्याला जे वाटेल ते तो बोलत आहे. एकाने प्रतिक्रिया दिली की, त्यावर टीका आणि समर्थन करणार्‍या विधानांचा पाऊस पडतो. यावरून असे लक्षात येईल की, आपल्या राज्यामध्ये कोणीही आपले डोके वापरायला तयार नाही. राजकीय लोकांचे डोके ठिकाणावर आहे काय? असा प्रश्न जनता विचारत आहे. ‘जो जे वांछील तो ते बोलो’ अशी काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे. एवढे सगळे चित्र आणि बुद्धीचा वापर न करता सुरू असलेले रणकंदन पाहून जनतेचे मात्र डोके दुखायला लागलेले आहे. हा अभिनय संपवून टाकायला हवा. हतबल झालेली जनता जे काय चालले आहे ते निर्विकार मनाने पाहत आहे. एके काळी सुसंस्कृत म्हणून ओळखला जाणारा महाराष्ट्र आज अत्यंत शिवराळ भाषेमध्ये बोलणार्‍या लोकांचा प्रांत झाला आहे. विशेषत: दूरध्वनीवर व्हायरल होत असलेले संभाषण पाहिले किंवा ऐकले, तर राज्यात डोक्याचा वापर कमीत कमी पातळीवर आला आहे, असे लक्षात येईल. वाचकहो, डोके म्हणजेच बुद्धी हा कुणाही व्यक्तीच्या शरीराचा फार मोठा भाग असतो. त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व त्यामधून दिसत असते. याच कारणासाठी महाराष्ट्रामध्ये डोक्याचा वापर कमी झाला आहे, याबद्दल आम्हास चिंता वाटायला लागलेली आहे.

शरीराचे काही भाग दुखणे हा त्या व्यक्तीचा गौरवच असतो. तुम्ही म्हणाल काहीपण सांगताय, पण नाही. आमचे प्रत्येक विधान काळाच्या कसोटीवर घासून पाहिले तर ते सत्यच असते, असे तुमच्या लक्षात येईल. उदाहरणार्थ, डोके दुखणे घ्या. काही लोक वारंवार ‘डोके दुखते’ अशी तक्रार करत असतात. आम्हाला त्यांचा हेवा वाटतो. डोके दुखते असे सांगणे याचा गर्भित अर्थ, ‘ते आपल्याकडे आहे,’ असे समोरच्या व्यक्तीला सांगणे असते. दुर्दैवाने आम्हाला ही संधी कधी लाभली नाही. क्वचित कधी आम्ही ‘डोके दुखते’ असे सांगितले, तर आमचे चाणाक्ष मित्र लगेच, ‘माहीत आहे, अभिनय पुरे’ अशी सूचना देऊन आम्हाला गप्प करतात. पण तुम्ही काहीही म्हणा, कुणी डोके दुखते म्हटले की, आम्हाला फार आनंद होतो.

आज महाराष्ट्रदेशी जर कशाची वाण असेल? तर ती याच व्याधीची आहे. जो अवयव वापरला जात नाही तो निकामी होतो, असे विज्ञान सांगते. जेवढे जास्त या व्याधीने ग्रस्त झालेले लोक या राज्यामध्ये वाढतील, तेवढी प्रगती लवकर होईल, असा सिद्धांत मांडणे सोपे आहे. बिहार, उत्तर प्रदेश आणि तत्सम राज्यांमध्ये या व्याधीने ग्रस्त झालेल्या जनतेची संख्या झपाट्याने घसरल्यामुळे ही राज्ये पार रसातळाला जाऊन पोहोचली. तसे आमच्या दगडांच्या देशाचे होऊ नये हीच आमची आंतरिक इच्छा आहे. जर लोकांचे डोके दुखत नसेल, तर ते दुखण्याची औषधे शोधून काढली पाहिजेत, त्यावर संशोधन केले पाहिजे आणि अशी औषधे लोकांना मोफत वाटली पाहिजेत, असे आमचे स्पष्ट मत आहे. राज्यात जे काही राजकारण सुरू आहे, त्यामुळे जनता खूपच गोंधळलेली दिसते. ‘हे काय या लोकांचे चालले आहे,’ हे शब्द आपसूक लोकांच्या तोंडातून पडत आहेत. एकमेकांवर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन जे राजकारण आहे, हे एका प्रकारचे मानसिक दुखणेच म्हणावे लागेल, हे कुठेतरी थांबण्याची गरज आहे!

संबंधित बातम्या
Back to top button