PIO : जिकडे तिकडे भारतीय | पुढारी

PIO : जिकडे तिकडे भारतीय

आता मात्र खूपच काही झाले. भारतीय वंशाच्या लोकांनी आपली पताका जगभर फडकवली आहे, हे आपल्याला माहीत आहेच. मग ते गुगलचे सुंदर पिचाई असोत किंवा मोठ्या मोठ्या कंपन्यांचे मुख्य अधिकारी असोत. ते भारतीय लोक आहेत. अगदी सिंगापूरचे पंतप्रधानही भारतीय वंशाचे आहेत. अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यापण भारतीय वंशाच्या आहेत. ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनाक हेही मूळ भारतीय वंशाचेच आहेत; पण या सगळ्यांवरती मात करत आणखी एक मोठी बातमी येत आहे, आणि ती येत आहे अमेरिकेतून.

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांची कारकीर्द शेवटच्या टप्प्यात आहे. पुढील निवडणुकीसाठी भारतीय वंशाच्या निकी हॅले या महिला अध्यक्षपदाच्या शर्यतीत आहेत. आतापर्यंत झालेल्या सर्वेक्षणामधून निकी या सर्वात लोकप्रिय उमेदवार ठरल्या असून, त्या कदाचित अमेरिकेच्या पुढच्या अध्यक्ष होऊ शकतील, अशी शक्यता निर्माण झाली आहे. आपल्या देशाला याचा प्रत्यक्ष फायदा होवो अथवा न होवो; पण जगभरात भारतीय वंशाच्या लोकांचा डंका वाजत आहे हे नक्की.

या ठिकाणी आम्हास असा प्रश्न पडला की, भारतीय लोकांमध्ये असे कोणते व्यवस्थापनाचे गुण आहेत की, जगभरात सर्वत्र त्यांना मागणी आहे? बहुधा भारतीय वंशाच्या माणसाला जन्मल्यापासून अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत आलेली आहे. फार पूर्वी जेव्हा घरामध्ये चार-पाच मुलेबाळे असायची तेव्हा नवीन जन्मलेल्या मुलाला घरातल्या टीचभर जागेत स्वतःची एक जागा निर्माण करण्याचा अडथळा असायचा. त्यानंतर मग शाळा, विविध प्रकारच्या परीक्षा, बोर्डाच्या परीक्षा, दहावीच्या परीक्षा, बारावीच्या परीक्षा या अशा असंख्य अडथळ्यांमधून पार करत करत भारतीय वंशाचा माणूस पुढे सरकत असतो. हा संघर्ष करण्याचा वसा भारतीय लोकांच्या डीएनएमध्ये आला असावा आणि तोच आज जगभर त्यांना लोकप्रिय करत आहे.

संबंधित बातम्या

सुनाक ब्रिटनचे पंतप्रधान झाले तेव्हा ब्रिटनची आर्थिक परिस्थिती धोक्याच्या वळणावर आलेली होती. सुनाक यांनी सूत्रे हातात घेताच अवघ्या वर्षभरात ब्रिटनमध्ये आर्थिक सुधारणा घडवून आणल्या आणि देश दिवाळखोरीत जाण्यापासून वाचवला. हे एक उदाहरण झाले.

फारसे अर्थसाक्षर नसलेल्या भारतीय वंशाच्या लोकांना काटकसर कशी करावी आणि त्याचे व्यवस्थापन कसे करावे, याचे उपजत ज्ञान असते. त्यात भारतीय महिला या सर्व प्रकारांमध्ये तरबेज समजल्या जातात. घरातील पुरुषाचे बनियन फाटले आणि त्याला असंख्य भोके पडली तर ते बनियन एकदा स्वच्छ धुऊन पुढे भांडे पुसण्यासाठी वापरले जाते. भांडे पुसण्यासाठी एक-दोन वर्षे वापरल्यानंतर जेव्हा त्या वस्त्राची अवस्था त्यापेक्षा वाईट होते, तेव्हा तेच बनियन फरशी पुसण्यासाठी वापरले जाते. म्हणजे एक वर्षभर वापरण्यासाठी आणलेले बनियन भारतीय घरांमध्ये पाच वर्षे वापरले जाते.

साधे टूथपेस्टचे उदाहरण घ्या. संपली संपली म्हटले तरी भारतीय घरांमध्ये टूथपेस्टवर आधी लाटणे फिरवून व त्यानंतरही थोडीशी उरलेली असेल, तर कात्रीने ती कापून शेवटच्या कणापर्यंत वापरली जाते. अशी असंख्य उदाहरणे घराघरांमध्ये पाहायला मिळतात. याच भारतीय वंशाच्या गुणांचा आज जगभर गौरव होत आहे. एकंदरीतच, भारतीय वंशाचे लोक जगभर नेतृत्व करत आहेत आणि या नेतृत्वाचा कुठे ना कुठेतरी फायदा आपल्या देशासाठी नक्कीच होणार आहे. निकी हॅले अमेरिकेच्या अध्यक्ष झाल्या तर आपल्या देशात दिवाळी साजरी होईलच. जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती मूळ भारतीय वंशाची असणे तमाम भारतीयांना अभिमानाचे असेल, यात शंका नाही.

Back to top button