तडका : लेडीज फर्स्ट | पुढारी

तडका : लेडीज फर्स्ट

मजा आहे बुवा महिलांची! कधीकाळी नवरा म्हणेल त्या उमेदवाराला आणि पक्षाला मतदान करणार्‍या महिलांचे दिवस पालटले आहेत. जेव्हापासून महिलांनी स्वतःच्या मनाने मतदान करायला सुरुवात केली तेव्हापासून सगळ्याच पक्षांनी महिलावर्गाला कसे खूश करता येईल, याचे प्रयत्न करायला सुरुवात केली. उदाहरणार्थ आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये विद्यमान सरकार सत्तेवर आल्याबरोबर त्यांनी केलेली पहिली घोषणा म्हणजे एसटी प्रवासामध्ये महिलांना 50 टक्के सूट दिली. या घोषणाला प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि राज्यभर एसटी बसेसमध्ये महिला प्रवाशांची गर्दी दिसायला लागली. अगदी ग्रामीण भागातून शहरांमध्ये काही काम असेल, तर महाराष्ट्रातील पुरुष मंडळी बायकोला पाठवून ते काम करून ये, असे सांगू लागली. महिला या मुळातच पुरुषांपेक्षा जास्त धोरणी आणि व्यवहारी असतात, हे महाराष्ट्रातील कुटुंब संस्थेने मान्य केले ही एक मोठीच उपलब्धी म्हणावी लागेल. यामुळे बसेसमध्ये जिकडे तिकडे महिलाच महिला दिसू लागल्या. काही ठिकाणी तर कंडक्टर महिला, प्रवासी महिला असे अघोषित महिलाराजच आले; पण एसटीचा एकंदरीतच नफा वाढला असेल, तर या धोरणाचे स्वागत करायला पाहिजे.

याची पुढची पायरी म्हणजे नुकत्याच तेलंगणामध्ये सत्तारूढ झालेल्या मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांनी पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत महिलांना बसचा प्रवास शंभर टक्के मोफत जाहीर केला. याही निर्णयाचे तिथे स्वागत होईल, याविषयी काही शंका नाही. महिला घराबाहेर पडून आपल्या माहेरी, सासरी, नातेवाईकांकडे किंवा अगदी बाजारहाट करण्यासाठी सर्रास फिरायला लागतील. कारण, त्यांचा प्रवास खर्च शून्यावर आलेला आहे. आता तेलंगणामध्ये एसटीचे काय व्हायचे ते होईल; पण ही सवलत घेण्यामध्ये महिलांची झुंबड राहील, यात काही शंका नाही. पूर्वी महिला चूल आणि मूल यात अडकून पडल्या होत्या. त्या आता सकाळी तयार होऊन, हातात पिशव्या घेऊन शहरात जाऊन खरेदी करून येतील. अगदी शेतीमाल विकण्यासाठी, इतर व्यवहार करण्यासाठीसुद्धा त्याच जातील आणि या सगळ्यांना पुरुष मंडळींचे प्रोत्साहन असेल. याचे कारण म्हणजे महिलांना मोफत मिळणारा एसटीचा प्रवास. ज्या देशांमध्ये महिला पुरुषांच्या बरोबरीने काम करतात त्या देशाची प्रगती होत असते, हे लक्षात ठेवूनच रेड्डी महोदयांनी तेलंगणात शंभर टक्के मोफत आणि शिंदे महोदयांनी महाराष्ट्रात 50 टक्के मोफत अशी सवलत दिली असावी. देश प्रगती करत असताना महिला मागे राहून कसे चालेल, असा काहीसा विचारा यामागे असावा.

एखाद्या कुटुंबाची विचारसरणी काहीही असेल, तरी त्याला न जुमानता महिला स्वतंत्रपणे मतदान करत आहेत. हे राजकीय पक्षांनी ओळखले आहे. मध्य प्रदेशमध्येही मुलगी जन्माला आल्याबरोबर तिच्या नावे भरपूर पैसे मिळतात. मुलीचे लग्न करायचे असेल, तर त्यासाठी पैसे मिळतात. महिलांच्या बचत गटांना जास्तीचे लोन आणि कमी व्याजदर लावण्यात आला. एकंदरीतच महिलावर्गाला खूश करण्यासाठी आता चढाओढ लागली आहे. त्याचाच एक भाग म्हणजे कुठे 50 टक्के आहे, तर काही राज्यांमध्ये आता एसटीचा प्रवासच मोफत करण्यात आलेला आहे.

संबंधित बातम्या

‘लेडीज फर्स्ट’ असे आपण आधी म्हणत असू. याचा अर्थ कुठेही महिलांना प्राधान्य दिले जात होते. इथून पुढे ‘लेडीज सर्वत्र’ असे ऐकू येणार आहे आणि त्याची सर्वांनी तयारी केली पाहिजे.

Back to top button