शाही कसरती

शाही कसरती
Published on
Updated on

नमस्कार सीएमसाहेब, काय, कसं काय चाललंय? देवाभाऊ दिसत नाहीत. परत नागपूरला गेले की काय?
या दादा, या. आताच तुमची आठवण काढली. शंभर वर्षे आयुष्य आहे तुम्हाला.
धन्यवाद सीएमसाहेब. शंभर वर्षे आयुष्य घेऊन काय करायचं आहे? आतापर्यंत त्यातली 65 वर्षे तर उपमुख्यमंत्री म्हणूनच गेली. मुख्यमंत्री झालो तर त्या आयुष्याला काही अर्थ आहे. आमच्या काकांनी निर्णय घ्यायला वेळ लावला आणि तुम्ही खुर्चीवर पटकन जाऊन बसलात.

अहो, चालायचंच. एवढं काय त्यात? नशिबापुढे कोणाचं काही चालत नाही; पण मी काय म्हणतो, कालचा नौसेना दिवसाचा कार्यक्रम काय झकास झाला. महाराष्ट्रातील जनतेच्या डोळ्यांचे पारणे फिटले. काय ते मोदीसाहेबांचे भाषण, काय त्या नौदलाच्या कवायती. दोन-तीनवेळा तर मला आभाळात हेलिकॉप्टर धडकतात की काय, असे वाटले होते.

अहो, त्यांनी भरपूर सराव केलेला असतो. चूक करत नाही नौदल कधीच; पण कालचा सोहळा मात्र डोळ्यांचे पारणे फेडणारा झाला, हे नक्की. येत्या विधानसभा निवडणुकीच्या वेळेला महाराष्ट्रातील जनता ट्रिपल इंजिन सरकारचा हात सोडणार नाही, याची मला खात्री आहे.
अहो, कशाला नाव काढता त्या हाताचं. हात नको, पंजा नको. तीन राज्यांमध्ये जनतेनेही त्याला झिडकारले आणि कमळ उचलून धरले. तसेच आपल्याकडेही होणार आहे. नौदलाच्या कवायती, त्यांच्या विमानांच्या कसरती पाहून खरं तर मला तुमचीच आठवण आली. तुम्ही हे छान केलेत. उगाच काही तरी कसरती करत बसण्यापेक्षा काकांचे विमानच ताब्यात घेऊन थेट मोदीसाहेबांसमोर धावपट्टीवर आणून ठेवले. या कसरतींचा जवाब नाही. आपल्याला फार आवडले.

शिंदेसाहेब, तुम्हीही तेच केलेत. उगाच विमानातले प्रवासी पळवा, विमानामध्ये काही तरी बिघाड निर्माण करा, यापेक्षा चक्क सगळे विमान घेऊनच धावपट्टीवर आलात; पण यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा रोल म्हणजे देवाभाऊंचा होता. देवाभाऊंनी आपली दोघांची विमाने उतरावीत म्हणून धावपट्टी तयार केली आणि स्वतः हिरवा झेंडा हातात घेऊन विमान कसे आणि कुठे उतरवायचे, याचे मार्गदर्शन केले. एकदा देवाभाऊंनी हिरवा झेंडा दाखवला की, मग आशीर्वाद द्यायला मोदीसाहेब स्वतः हजर होतेच.

बरोबर आहे. मोदीसाहेबांबरोबर राहिले तरच राजकारणामध्ये आपली नैय्या पार होऊ शकते, हे ओळखणारे महाराष्ट्रातले द्रष्टे राजकारणी आपणच दोघे आहोत, त्यामुळे आपणच एकमेकांचे अभिनंदन करूयात.

पण, शिंदेसाहेब, मला मोदीसाहेबांची कमाल वाटते. अथक परिश्रम करून प्रत्येक देशाच्या नागरिकांच्या मनामध्ये त्यांनी आपली एक जागा निर्माण केली. जातपात यापलीकडे विचार करून लोकांचे मतदान आपल्याकडे ओढणारा देशातील नाही, तर जगातील एकमेव नेता म्हणजे मोदीसाहेब आहेत, हे आता सर्वांनी मान्य केले आहे. त्यांच्या सोबतीने आपली दोघांची नैय्या पार होईल, यात मला काही शंका नाही.

दादा, मीही आमच्या आधीच्या पक्षात राहिलो असतो, तर असाच कुठे तरी कोपर्‍यात बसून हा कार्यक्रम पाहिला असता; पण देवाभाऊंनी बुद्धी दिली आणि मोदीसाहेबांसोबत आलो म्हणून सगळ्या देशासमोर भाषण करण्याची अनेकदा संधी मिळाली. आमचा काही देशपातळीवरचा पक्ष नाही, आम्ही आपले महाराष्ट्रात खूश आहोत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news