मायावी चंद्रमुखी | पुढारी

मायावी चंद्रमुखी

स्पेन या देशाने आपली पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता असलेली मॉडेल तयार केली आहे आणि तिचे नाव ठेवले आहे आयटाना. एका प्रसिद्ध अशा डिझायनरने तिचे रूप अत्यंत सुंदर असे घडवले आहे. ती बोलू शकते, तुमच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकते आणि सर्व मानवी प्रतिसादही देऊ शकते. म्हणजे जवळपास एक कृत्रिम बुद्धिमत्ता असलेली बुद्धिमान अशी स्त्री मॉडेल स्पेनमध्ये अस्तित्वात आली आहे. तिच्या रंग रूपाची भुरळ पडून अनेक जण ‘प्रथम तुज पाहता, जीव वेडावला’ अशा पद्धतीने तिच्या प्रेमात पडले आहेत. या मायावी परंतु कृत्रिम बुद्धिमत्ता असलेल्या मॉडेलचे इन्स्टाग्रामवर जवळपास दीड लाख फॉलोअर्स आहेत. भारतीय चलनामध्ये तिची महिन्याची सरासरी कमाई तब्बल तीन लाख रुपये आहे. चीनने तर अशा अनेक मॉडेल्स तयार करून त्यांची चक्क विक्रीपण करायला सुरुवात केली आहे.

आता भारतात अशा प्रकारची मायावी चंद्रमुखी कधी उपलब्ध होते, याविषयी तुमच्याही मनात उत्सुकता निर्माण झाली असेलच. कृत्रिम बुद्धिमत्ता असलेला एखादा चालता-बोलता जीव प्रत्यक्ष अस्तित्वात यावा, हे कधीकाळी स्वप्नवत वाटत असेल; पण आज ते प्रत्यक्षात उतरले आहे. उद्या चालून असे एखादे मायावी मॉडेल आपल्या देशात आले तर त्याच्या विविध प्रतिकृती तयार कराव्या लागतील. म्हणजे उदाहरणार्थ, महाराष्ट्रातील लोकांसाठी मराठी मॉडेल, उत्तर प्रदेशातील लोकांसाठी भाभीजी प्रकारचे मॉडेल, गुजराती लोकांसाठी गुज्जू भाभी मॉडेल म्हणजेच विभागीय आवडीनिवडींना डोळ्यासमोर ठेवून असंख्य प्रकारचे मॉडेल्स तयार करावे लागतील.

आता प्रश्न असा उभा राहतो की, खरेच असे मॉडेल्स बाजारात चाळीस-पन्नास हजारांत किंवा भलेही दोन-तीन लाखांत मिळत असतील तर त्यांच्या खरेदीसाठी नेमक्या कुणाच्या उड्या पडतील? म्हणजे अविवाहित लोकांच्या उड्या पडतील की विवाहित लोकांच्या पडतील? या प्रश्नाचे उत्तर मिळण्यासाठी असे मॉडेल्स भारतामध्ये सर्वत्र उपलब्ध होण्याची वाट पाहावी लागेल. विवाहित पुरुष बरेचदा किरकिर किंवा कटकट करणार्‍या बायकोला कंटाळलेले असतात. अशा लोकांसाठी ‘दुसरीच्या’ भानगडीत पडल्यापेक्षा चक्क दुकानातून ‘दुसरी’ आणणे सोपे जाईल. दुसरा विषय म्हणजे आजकाल बर्‍याच लग्नाळू तरुणांचे लग्न होण्याचे प्रश्न उभे राहिले आहेत. अशा लोकांसाठी पण या मॉडेल्स स्वरूपातून काही दिलासा देता आला तर तंत्रज्ञानाने जरूर प्रयत्न केला पाहिजे. अशा प्रकारचे मॉडेल महिलांनासुद्धा आवडण्याची शक्यता आहे. घरकाम करणार्‍या स्त्रियांवर विसंबून न राहता आणि त्यांचे नखरे न सांभाळता, सांगेल ते काम करणारी एखादी मायावी स्त्री घरामध्ये आली तर त्यांच्याही जीवाला तेवढाच आराम मिळेल.

संबंधित बातम्या

एकंदरीत विचार करता, अशा प्रकारचे मायावी मॉडेल ज्याला की कृत्रिम बुद्धिमत्ता देण्यात आलेली आहे, हे भारताच्या सर्व राज्यांमध्ये अत्यंत लोकप्रिय होईल यात काही शंका नाही. आता प्रतीक्षा आहे ती कृत्रिम बुद्धिमत्ता असलेल्या देशी मुखवट्याच्या मॉडेलची. लढाऊ विमाने देशात तयार होत असतील,चंद्र, सूर्यावर जाणारी याने तयार होत असतील तर मायावी चंद्रमुखी तयार करणे आपल्याला अजिबात अवघड नाही. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे मानवी जीवन सुकर झाले असले तरी त्याचे धोकेही अधिक आहेत, हे प्रत्येकाने लक्षात घ्यावे लागेल. एआयमुळे कोणत्याही वस्तूची निर्मिती केली जात असली तरी त्याचा वापर विवेकाने करायला हवा; अन्यथा त्याचा झटका बसल्याशिवाय राहणार नाही हे उघड आहे.

Back to top button