नैतिक वापर म्हणजेच संगणक साक्षरता | पुढारी

नैतिक वापर म्हणजेच संगणक साक्षरता

डॉ. दीपक शिकारपूर

माहिती-तंत्रज्ञान म्हणजेच ‘आयटी’ची गंगा भारतात अवतीर्ण होण्यास तीसेक वर्षे आणि ती सर्वसामान्य नागरिकांच्या प्रत्यक्ष अंगणी येऊनही आजघडीला एक दशकाहून जास्त काळ लोटला आहे. ही मूळची संगणकीय क्रांती असली, तरी तिचा खरा प्रसार आणि प्रभावही प्रत्येकाच्या हाती स्मार्टफोन आल्यापासून खर्‍या अर्थाने जाणवू लागला आहे. जागतिक संगणक साक्षरता दिवस दरवर्षी 2 डिसेंबर रोजी साजरा केला जातो.

इंटरनेटमुळे जग लहान झाले, असे म्हणता येईल. दूरदेशातील व्यक्तींशी वैयक्तिक, व्यापारी, सामाजिक संबंध जोडणे, तेही केवळ काही मिनिटांत शक्य झाले आहे. ज्ञान व माहितीचा प्रसार पुस्तके, पैसे आणि अंतराच्या सीमा ओलांडू शकला, तो इंटनेटमुळेच. आज आपल्याकडे 50 कोटी सेलफोनधारक आहेत आणि त्यांची संख्या दरमहा 30 एक लाखांनी वाढते आहे. माहिती आणि परस्पर संवादाच्या देवाणघेवाणीत अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार्‍या या साधनांमुळे एक नवीच स्मार्ट जीवनशैली निर्माण झाली आहे. कोणत्याही विषयाची माहिती तर घरबसल्या मिळतेच; परंतु त्याबरोबरच इतर अनेक सेवासुविधा इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे जगभरात कधीही, कोठेही उपलब्ध असतात. जगभरात संगणक तंत्र ज्ञानप्रसार व कुतूहल निर्माण करण्यासाठी तसेच डिजिटल साक्षरतेला चालना देण्यासाठी जागतिक संगणक साक्षरता दिवस साजरा केला जातो.

लहान मुले व महिलांना प्रेरित करणे आणि संगणक वापराद्वारे त्यांचे कार्य सुलभ करणे, हा सदर दिवस साजरा करण्यामागील मुख्य उद्देश आहे. संगणकाला न घाबरता, त्याच्यापासून दूर न पळता त्याला मित्र मानणे आणि त्याच्याबाबत अधिक माहिती मिळवणे काळाशी सुसंगतच ठरणार आहे. आतापर्यंत रेडिओचे बटण वगळता इतर कोणत्याही उपकरणाच्या बटणाला हात न लावणारे अनेक ज्येष्ठ नागरिक केवळ काही दिवसांच्या सरावानंतर मोबाईल फोन वापरताना आपणांस दिसतात. अशिक्षित माणूसही नवीन तंत्रज्ञान सहजपणे हाताळू शकतो, हे आपण पाहतच आहोत. पूर्वी जेव्हा केवळ मूठभर सधन संगणक हाताळत व माहिती मिळवत. हा स्रोत सर्वसामान्यांना उपलब्ध नव्हता, आवाक्याबाहेर होता कारण त्यांच्या किमती भरमसाट होत्या. संगणक साक्षरतेचे महत्त्व अधोरेखित होते. लहान गावात, खेडोपाडी जेव्हा तंत्रसाक्षरता येईल तेव्हा जीवन सुसह्य होईल.

शिक्षण, आरोग्य, शेती, विक्री, प्रशासन अशा अनेक बाबी त्यामुळे सुधारतील. नेटबॅँकिंग, डिजिटल वॉलेट उर्फ पैशाचे इलेक्ट्रॉनिक पाकीट यांसारख्या संकल्पनांचा वापर दैनंदिन जीवनात मोठ्या प्रमाणात दिसतो आहे. पण ही झाली खासगी आणि वैयक्तिक पातळीवरची परिस्थिती. खुद्द भारतीय सरकारी कामकाजाचा हत्ती आपली गजगती मागे टाकून डिजिटल बदलांबरोबर प्रवास करू लागेल, ही बाब काही वर्षांपूर्वी कोणाला स्वप्नातही पटली नसती! आता मात्र सरकारी कामकाज डिजिटल म्हणजेच नेटवरून होऊ लागले आहे आणि विविध सरकारी योजनंचा लाभ घेणेही नेटमुळे शक्य झाले आहे. सरकारी कारभाराचा ‘इन-लाईन’पासून ‘ऑन-लाईन’पर्यंतचा हा प्रवास बर्‍यापैकी वेगाने होत आहे.

नोटबंदीनंतर कॅशलेस आणि लेस-कॅश हे रोजच्या वापरातले शब्द बनले आहेत, अगदी कोपर्‍यावरच्या पानवाल्यापासून उद्योजकांपर्यंत. आपले आयुष्य, व्यवहार, उद्योग, व्यापार अधिक वेगवान व सुलभ करण्यासाठी हे तंत्रज्ञान विकसित व लोकप्रिय झाले. पण त्याचबरोबर दुसरी बाजूही लक्षात घेतली पाहिजे, कारण हेच सर्व तांत्रिक प्रवाह एकाद्या विकृत, गुन्हेगारी वृत्तीच्या व्यक्तींच्या हाती पडले तर नाशही होऊ शकतो. इंटरनेटवर अनेक गुन्हेगार वावरत असतात, तसे अतिरेकी मनोवृत्तीचे लोकही वावरत असतात. निर्माण होणारा ई-कचरा, सायबर गुन्हे, डिजिटल व्यसनाधीनता या सर्व बाबी वापरकर्त्यांना कळल्या पाहिजेत म्हणजे ते काळजी घेतील व सुरक्षित व सावध वापर करतील. 2023 मध्ये साक्षरतेचा हा नवीन अर्थ आहे. तंत्रज्ञानाचा सजग, सुरक्षित, नैतिक वापर म्हणजे स्मार्ट संगणक साक्षरता. असे स्मार्ट वापरकर्ते जर आपण देशभर प्रशिक्षित करू शकलो तरच ‘इंडिया’ खरेच ‘डिजिटल’ होईल.

Back to top button