युद्धविरामाची फलनिष्पत्ती | पुढारी

युद्धविरामाची फलनिष्पत्ती

इस्रायल आणि हमासमधील चार दिवसांचा युद्धविराम संपला असला तरीसुद्धा या संघर्षातून मार्ग निघू शकतो, असा आशावाद या युद्धविरामाने निर्माण केला आहे. या काळात विश्रांती घेतलेले दोन्हीकडील सैन्य नव्या दमाने परस्परांशी भिडेल, नव्याने व्यूहरचना केली जाईल आणि क्षेपणास्त्रे डागली जातील, याबाबत कुणाच्याही मनात शंका नाही; परंतु मानवतेवरील संकट ठरलेला हा संघर्ष कधी आणि कसा संपणार, याबाबत संपूर्ण जगाला वाटणारी चिंता कायम आहे. असे असले तरी, या युद्धविरामाने काय साधले? याचा विचार करता झालेली पहिली महत्त्वाची गोष्ट ही की, एकूणच भविष्यातील वाटचालीबाबत आशेचा किरण त्यामुळे निर्माण झाला. चर्चा आणि सौहार्दाची हीच वाट पुढे जात राहावी आणि अमेरिकेसारख्या महासत्तेने हस्तक्षेप करून संघर्ष थांबविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा या पार्श्वभूमीवर जगभरातून व्यक्त केली जात आहे.

दोन्ही बाजूंकडून झालेल्या समझोत्यानुसार, गाझामधून पन्नास ओलिसांची सुटका करावयाची होती आणि इस्रायलने 150 पॅलेस्टिनी कैद्यांची मुक्तता करावयाची होती. ही तडजोड घडवून आणण्यामध्ये कतार देशाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. अमेरिका, इस्रायल आणि हमासशी सातत्याने चर्चा करून कतारने ही तडजोड घडवून आणली. मध्य पूर्वेतील एकमेव मध्यस्थ आपणच असल्याचे कतारने यानिमित्ताने पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले. चार दिवसांचा युद्धविराम संपला, त्याने नेमके काय साध्य झाले आणि भविष्यात काय वाढून ठेवले आहे, हे जाणून घेण्याची संपूर्ण जगाला उत्सुकता आहे. आंतरराष्ट्रीय संबंधांच्या जाणकारांच्या म्हणण्यानुसार, युद्धविरामाचा लाभ प्रामुख्याने हमासला झाला असून, व्यूहरचनात्मकद़ृष्ट्या हे त्यांचे मोठे यश मानले जाते. अनेक दिवस चाललेल्या युद्धानंतर थोडीशी उसंत घेण्याची संधी यानिमित्ताने हमासला मिळाली. भल्या पहाटे इस्रायलला झोपेत बेसावध गाठून हल्ला करून हमासने मोठा धक्का दिला असला तरी इस्रायलने दिलेल्या प्रत्त्युत्तरामुळे पॅलेस्टिनी लोक होरपळून निघाले. सुडाग्नीने पेटलेल्या इस्रायलने गाझापट्टीत अक्षरशः धुमाकूळ घातला. त्यात हमासचे कंबरडे तर मोडलेच; परंतु सामान्य नागरिकांनाही युद्धाची मोठी झळ सोसावी लागली. हमासचे मोठे नुकसान झाले, शिवाय त्यांची कोंडी झाली. त्यातून बाहेर पडण्याची संधी हमासला या युद्धविरामामुळे मिळाल्याचे जाणकारांचे मत. दरम्यानच्या काळात इस्रायली सैनिकांचे अधिकाधिक नुकसान करता येईल आणि त्यांच्या हल्ल्याचा मुकाबला करता येईल, अशा ठिकाणी हमास आपल्या सैनिकांना स्थापित करू शकेल हा धोका व्यक्त केला जातो. ताब्यातील ओलिसांना नव्या ठिकाणी स्थलांतरित करण्याची संधी हमासला मिळाली. इस्रायलसाठी शोध घेणे कठीण होईल, अशा ठिकाणी त्यांची रवानगी केली जाईल. ओलिसांच्या बळावरच हमासला पुढच्या टप्प्यातील चर्चेची फेरी करता येणार असल्यामुळे, तोच त्यांच्यासाठीचा महत्त्वाचा दुवा ठरेल. युद्धविश्रांतीने हमासला फार काही मिळणार नसल्याचे वरवर दिसत असले, तरी हाच प्रत्यक्षात मोठा फायदा आहे आणि युद्ध अधिक काळ लांबवण्यासाठी ते त्याचा वापर करून घेऊ शकतात.

युद्धात अंतिम विजय इस्रायलचा होणार याबाबत हमास समर्थकांच्या मनातही शंका नाही; परंतु युद्ध अधिकाधिक काळ लांबवण्याचे, म्हणजे इस्रायलला जेरीस आणण्याचे हमासचे प्रयत्न राहतील. एकीकडे, छोट्याशा युक्रेनने बलाढ्य रशियाला दीड वर्षांहून अधिक काळ झुंजवल्याचे उदाहरण ताजे आहे. तीच जिद्द हमास दाखवू इच्छिते; परंतु इथे फरक एवढाच की, युक्रेनसोबत अधिकृतपणे अमेरिकेसह युरोपीय देश आहेत. इथे अद्याप हमाससोबत थेटपणे अन्य देश युद्धात उतरलेले नाहीत. अन्य देशांनी पॅलेस्टाईनच्या बाजूने युद्धात उतरावे, असे हमासचे प्रयत्न असले, तरी त्या प्रयत्नांना अद्याप म्हणावे तसे यश आलेले नाही. जागतिक अर्थकारण आणि व्यापारी संबंधांमुळे या देशांना एकमेकांशी बांधून ठेवले आहे. अर्थात, वरकरणी झालेली देशांची विभागणी नाकारता येत नाही. कतारची मध्यस्थी हे त्याद़ृष्टीने पहिले यश. मात्र, संघर्ष लगेच थांबणार नाही. हमासच्या ताब्यातील ओलिसांची सुटका होईपर्यंत इस्रायलचे हल्ले सुरू राहतील; परंतु ओलिसांना शोधणे इस्रायलसाठी तेवढे सोपे असणार नाही. युद्धविरामाची मोठी गरज हमाससाठी होती. ओलिसांतील ज्येष्ठ नागरिक आणि आजारी लोकांची सोय करणे हमाससाठी अडचणीचे ठरत होते, अशा लोकांची सुटका करून त्यांनी मानवतेचे दर्शन घडवलेले नाही, तर आपल्यावरील ओझे कमी केले. नजीकच्या काळात हमास साधारणत: दीडशेपर्यंत ओलिसांनाच आपल्या ताब्यात ठेवेल, असे मानले जाते कारण अधिक लोकांचा बोजा त्यांच्यासाठीही त्रासदायक आहे. दुसरीकडे, जेवढे अधिक ओलिस असतील तेवढा हमाससाठी अधिक फायदेशीर सौदा ठरणार असल्याचे मानले जाते.

अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार, युद्धविरामाच्या काळातली ओलिसांची आणि कैद्यांची अदलाबदल पूर्ण झाल्यावर गाझा शहरावर ताबा मिळविण्यासाठी पुन्हा धुमश्चक्री सुरू होईल. ही धुमश्चक्री किती दिवस चालेल, याबाबत तूर्तास अंदाज व्यक्त करणे कठीण. दरम्यानच्या काळात इस्रायली सैन्य गाझापट्टीच्या दक्षिणेकडे आपला मोर्चा वळवू शकेल, असे संकेत इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी दिले आहेत. हमासचे प्रमुख नेते हजारो सैनिकांसह दक्षिण भागात असून, त्यांच्यासोबत मोठ्या संख्येने इस्रायली ओलिस असल्याचा त्यांचा अंदाज आहे. संयुक्त राष्ट्रांकडील माहितीनुसार, सात ऑक्टोबरच्या हल्ल्यानंतर गाझापट्टीतील सुमारे वीस लाखांहून अधिक लोक विस्थापित झाले असून, त्यांनी गाझापट्टीच्या दक्षिणेकडे कूच करून तिथे आश्रय घेतला. प्रचंड त्रासदायक परिस्थितीत हे लोक राहत आहेत, तिकडे इस्रायलने मोर्चा वळवल्यास मानवतेपुढील नवे संकट जगासमोर येऊ शकेल. अशा परिस्थितीत आजवर इस्रायलला अमेरिकेकडून जे पाठबळ मिळत आले, ते मिळेल का? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. खरे तर असे संकट निर्माण होण्यापूर्वीच अमेरिकेसह अन्य प्रमुख राष्ट्रांनी मध्यस्थी करून हा तात्पुरता युद्धविराम स्थायी युद्धविरामामध्ये बदलावा, अशी इस्रायलच्या नागरिकांसह जगभरातील लोकांची अपेक्षा आहे. ती अनाठायी नाही.

Back to top button