लवंगी मिरची : पर्यटनाचीही नशा..! | पुढारी

लवंगी मिरची : पर्यटनाचीही नशा..!

काय मित्रा, बरेच दिवस झाले आला नाहीस? कुठे गायब होतास?
अरे, विशेष काही नाही. दिवेआगार, गुहागर, तारकर्ली, गणपतीपुळे, मालवण संपूर्ण कोकण आठ दिवस फिरून आलो. किती छान तो निसर्ग, ते समुद्रकिनारे ते कोकणातील हवामान आणि ते लज्जतदार कोकणी पदार्थ. वाह! मजा आली.

अरे पण अचानक असा कसा काय पर्यटनाला गेलास? मला म्हणाला असतास तर आम्ही दोघेही आलो असतो ना?
अरे तसे अचानकच ठरले. काय झाले की बायकोची सारखी भुणभुण सुरू होती. तिच्या कुणी ना कुणी मैत्रिणी कायम भारतभर कुठे ना कुठेतरी फिरत असतात. तिने सारखे माझ्यामागे टुमणे लावले की, तुम्हाला कसली हौसच नाही. बाकी लोक बघा, किती मजा करतात. माझ्या एका मैत्रिणीने गणपतीपुळ्याला देवाचे दर्शन घेतले. तिथले फोटो ती व्हाट्सअ‍ॅप स्टेटसला आठ दिवस टाकत होती. मला मेलीला चान्सच मिळत नाही. कुठे जाऊ म्हटले की, तुमची किरकिर सुरू होते. शेवटी तिच्या आणि मुलांच्या म्हणण्यापुढे मान तुकवावी लागली आणि जाऊन आलो बाबा.

हो, पण समजा, वहिनींच्या गावातल्या किंवा शेजारच्या मैत्रिणी जाऊन आल्या तर त्यांना कळेल; पण परगावच्या मैत्रिणी समजा फिरून आल्या तर यांनी कशाला मनावर घ्यायचे, म्हणतो मी?

संबंधित बातम्या

अरे बाबा, ते तसेच असते. रोज कुठली ना कुठली तरी हिची मैत्रीण स्टेटस अपडेट करते. कुणी बंगळूरला असतं, कोणी कुलू मनालीला असतं, काही मैत्रिणी कोकणात गेलेल्या असतात, कुणी जिवाची मुंबई करत असतात. काही काही तर तिच्या मैत्रिणी परदेशीपण म्हणजे सिंगापूर, थायलंड, मलेशिया,भूतान, श्रीलंका फिरत असतात. असे पर्यटन करणार्‍या लोकांनी निव्वळ डोक्याला वात आणलाय.

अरे हो, बरोबर आहे. हिवाळा सीझन आहे, पर्यटन स्थळे खचाखच भरलेली आहेत. तिथे जाणार्‍या वाहनांचा ओघ इतका जास्त आहे की सर्वत्र रहदारी प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे. तीर्थक्षेत्राला तेवढीच गर्दी आणि पर्यटन स्थळावरपण तेवढीच गर्दी.

अरे, हे तर काहीच नाही. गणपतीपुळेसारखे ठिकाण; जिथे देवही आहे आणि समुद्रही आहे, तिथली गर्दी तर बघायला नको. या गर्दीत काय मजा करत असतील, काय शांतता मिळत असेल आणि काय सुट्टी जात असेल, त्यांचे त्यांनाच माहिती.

आणि तिथे गेल्यानंतरसुद्धा काही निसर्ग असेल, समुद्र असेल तर ते पाहण्याच्या आधी फोटो काढण्याची घाई असते. कधी एकदा फोटो काढतो, त्याला फिल्टर मारतो आणि कधी एकदा सोशल मीडियावर टाकतो असे लोकांना झालेले आहे. सोशल मीडियावर फोटो टाकण्यासाठी म्हणूनच काही काही लोक फिरायला जातात की काय, असे मला वाटते.
आता काही लोकांना पर्यटनाचीही नशा व्हायला लागली आहे की काय, हे काय समजायला मार्ग नाही; इतक्या मोठ्या प्रमाणावर पर्यटन वाढेल याची कल्पना नसल्यामुळे पर्यटन स्थळावरील लोकपण भांबावून गेले आहेत. तुम्ही आधी जर रूम बुक केली नाही, तर तुम्हाला रस्त्यावर झोपण्याची वेळ येऊ शकते इतकी गर्दी आता गोवा आणि कोकणात सध्या झालेली आहे. सोशल मीडियाची नशा वाढत जाईल तशी पर्यटनाचीपण नशा वाढत जाणार आहे, हे तू आधी समजून घे. पर्यटनामुळे माणसाचा शीण निघून जातो आणि थोडासा हवा बदल झाल्याने मनाला शांतता मिळते. त्यामुळे पर्यटनाची नशा हवीच!

Back to top button