तंत्रज्ञानाने आपले अवघे जीवन व्यापून टाकले आहे. जाग आल्यापासून रात्री झोपेपर्यंत आणि त्यानंतरही सदान् कदा आपल्यासोबत असेल, तर ते तंत्रज्ञान! माणसाला जगण्यासाठी प्राणवायू लागतो, त्याबरोबरच आता तंत्रज्ञान अनिवार्य ठरले आहे. तंत्रज्ञानाशिवाय आपले अस्तित्वच नाही जणू. याच तंत्रज्ञानाचे आतापर्यंतचे सर्वांत विदारक आणि धोकादायक रूप समोर आले ते गेल्या आठवड्यात. रश्मिका मंदाना या दाक्षिणात्य अभिनेत्रीचे काही अश्लील व्हिडीओ समाजमाध्यमांवर पसरवले गेले; पण प्रत्यक्षात ते व्हिडीओ रश्मिकाचे नव्हतेच, तर व्हिडीओमधील मूळ महिला बदलून त्या जागी रश्मिकाचा चेहरा तसेच पूर्ण शरीराचा वापर करण्यात आला होता. तेच पुढे कॅटरिना कैफ आणि काजोल यांच्या बाबतीत झाले. परवाच्या वर्ल्डकप फायनलनंतर सचिन तेंडुलकरची मुलगी साराच्या बाबतीतही अशीच छायाचित्रे पसरवली गेली.
फोटोमधील चेहरे बदलून त्या जागी सेलेब्रिटींचे किंवा महनीय व्यक्तींचे चेहरे बसवणे आणि अशा व्यक्तींची बदनामी करणे नवे नाही. गेल्या अनेक वर्षांपासून हे प्रकार घडत आहेत; पण आतापर्यंत हा प्रकार फक्त फोटोपुरता मर्यादित होता. शिवाय असे मॉर्फ केलेले फोटो ओळखणेही फार अवघड नव्हते; पण आता चक्क व्हिडीओ बेमालूमपणे मॉर्फ करणे शक्य झाले आहे. मूळ व्यक्तीच्या जागी आपल्याला हवी ती व्यक्ती उभी करून तिच्याकरवी हवे ते करवून घेणे शक्य झाले आहे. या नव्या तंत्रज्ञानाचे नाव आहे 'डीपफेक'. गेल्या दशकभरात प्रचलित झालेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआयचा हा आविष्कार. 2018 मध्ये एका समाजमाध्यम वापरकर्त्याच्या नावावरून पडलेले हे नाव म्हणजे डीपफेक. त्याच्या नावातच बनवेगिरी आहे. प्रसिद्ध सेलेब्रिटीच्या जागी स्वतःला उभा करून तो वापरकर्ता सेलेब्रिटीची कृती करायचा. ते गेल्या पाच वर्षांत इतके विकसित झाले की, या तंत्रज्ञानाच्या आधारे विराट कोहलीच्या जागी स्वतःला उभे करून थेट मॅच खेळण्याचा व्हिडीओ बनवणे कुणालाही शक्य आहे. शाहरूख खानच्या जागी स्वतःला उभे करून नवा 'जवान' चित्रपट साकारणेही शक्य आहे.
आणखी थोडे मागे गेले की, थेट पंतप्रधानांच्या बनावट आवाजाने स्टेट बँकेच्या फसवणुकीचा प्रकारही घडल्याचे दिसून येते. 'तातडीने 60 लाख रुपये रुस्तम नागरवाला या माणसाकरवी पाठवून द्या आणि त्याची पोचपावती पीएमओमधून घ्या', असा आदेश तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी फोनवरून स्टेट बँकेच्या मुख्य कॅशियरला दिल्यानंतर तत्कालीन हेड कॅशियरने त्याची तंतोतंत अंमलबजावणी करत रुस्तम नागरवालाकडे 60 लाख रुपये दिलेही. ते पैसे घेऊन खरे तर नागरवालाने इंदिरा गांधींच्या निवासाकडे जाणे अपेक्षित होते; पण त्याकाळी 60 लाखांवर डल्ला मारला गेला. पैसे तिकडे पोचलेच नाहीत. कारण, तो आदेश इंदिरा गांधींनी दिलाच नव्हता, तर इंदिरा गांधींच्या आवाजाची नक्कल करून फोनवरून खुद्द रुस्तम नागरवालाच स्टेट बँकेच्या कॅशियरशी बोलला होता. नागरवाला घोटाळा म्हणून प्रसिद्ध असलेली ही घटना 1971 मधली.
त्यावेळचे तंत्रज्ञान आजच्याइतके प्रगत नव्हते, तरीही अशा प्रकारच्या फसवणुकीच्या घटना घडत होत्या. या तंत्रज्ञानाचा सर्वव्यापी आणि समाजजीवन सुकर करण्याच्या हेतूने वापर सुरू होण्याआधीच गुन्हेगारांच्या जगतात तो सुरू झाला. ताज्या घटनांनी ते अधिक स्पष्ट होते. त्याहून गंभीर म्हणजे, तंत्रज्ञानाचा हा वापर आता थेट माणसाच्या खासगी आयुष्यात केवळ प्रवेशच नव्हे, तर आघात करत आहे. सेलेब्रिटींच्या सार्वजनिक जीवनावर परिणाम करू लागला आहे. अर्थात, हा बुडबुडा असला, तरी त्याने माणसाचे जीवन प्रदूषित केला जाण्याचा मोठा धोका संभवतो. कुणाच्याही व्हिडीओमध्ये कुणाचीही सहजगत्या अदलाबदल करण्याने मानवी नात्यांमध्ये किती उलथापालथी होतील, हा विचारच थरकाप उडवणारा आहे. सार्वजनिक जीवनामध्ये कोलाहल माजवण्याची, कोणत्याही देशाची सुरक्षितता धोक्यात आणण्याची क्षमता असणारे हे तंत्रज्ञान अवघ्या मानवजातीला पुन्हा रानटी युगाकडे घेऊन जाईल का, असा प्रश्न पडावा इतके ते धोकादायक आहे. भाजपने आयोजिलेल्या दिवाळी मिलन सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक किस्सा सांगितला.
यंदाच्या दसर्यात मोदींचा गरबा खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल करण्यात आला होता; पण वास्तव असे की, मोदींनी शालेय जीवनानंतर कधीही गरबा खेळलेला नाही, तरीही व्हिडीओ पाहणार्याचा हाच समज होणार की, पंतप्रधान गरबा खेळताहेत. म्हणजे डीपफेक तंत्रज्ञान किती डीप परिणाम करणारे असू शकते, याचा अंदाज येईल. तो अंदाज रश्मिकाच्या व्हिडीओमुळे सरकारला आला, हे बरेच झाले. कारण, लगोलग केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने देशातील प्रमुख संगणक तंत्रज्ञान कंपन्यांच्या संचालकांशी चर्चा सुरू केली. डीपफेक तंत्रज्ञानाला आवर कसा घालता येईल, यावर विचार सुरू केला आहे. त्याचबरोबर कायदे कडक करण्यासाठी गेल्या आठवड्यात बैठकही झाली; पण फक्त कायदे कडक करून डीपफेकचा हा ब्रह्मराक्षस आवरला जाणार नाही.
आंतरराष्ट्रीय स्तरावरच त्यावर बंदी आणली गेली पाहिजे. 1996 मध्ये क्लोनिंग तंत्रज्ञानाने 'डॉली' या मेंढीचा जन्म झाला. पुढे हा प्रयोग मानवावरही होणार होता; मात्र मानवी क्लोनिंगवर आंतरराष्ट्रीय बंदी आणण्यात आली. मानवाला अमरत्व प्राप्त करून देण्याच्या प्रयत्नात असणार्या शास्त्रज्ञांनी मानवी क्लोनिंगचा प्रयत्न सुरू ठेवावा की नाही, हा वेगळा विषय; पण मानवाच्या नैतिकतेलाच आव्हान देणार्या डीपफेक तंत्रज्ञानाला मुळासकट उपटून टाकणे हा आतापर्यंतचा उपाय दिसतो. 'विज्ञान शाप की वरदान' हा प्रश्न विचारला जाण्यापूर्वीपासून अति तेथे माती ही म्हण अस्तित्वात आहे. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच असतो. ती गोष्ट कितीही चांगली असली तरी! अवघे समाजजीवन ढवळून काढण्याचा आणि नव्या संकटांना आमंत्रण देण्याची प्रचंड क्षमता असणार्या घातकी डीपफेक तंत्रज्ञानावर बंदी हा एकच पर्याय आहे.