

महाराष्ट्र राज्यात सर्वात मोठा आजार कोणता असेल, तर तो म्हणजे मार्गदर्शन करण्याचा. जो तो उठतो आणि दुसर्याला मार्गदर्शन करत असतो. नुकतीच एका ग्रामपंचायतीने सभा घेतली आणि त्यामध्ये असा ठराव मंजूर केला की, दशक्रिया विधीच्या वेळेला भाषणे करू नयेत. दशक्रिया विधीच्या वेळेला गावातील लोक जमा होतात, त्यावेळेला साहजिकच राजकीय नेत्यांना तिथे मार्गदर्शन करण्याची संधी असते. ते उभे राहून तासन्तास बोलतात आणि दहा वाजताचा दशक्रिया विधी साडेबारा-एकपर्यंत लांबतो.
राजकारणी लोकांनी कुठल्याही ठिकाणी लोकांची गर्दी झाली की, त्यांना मार्गदर्शन करण्याची जी परंपरा सुरू केली आहे त्याला पूर्ण देशात तोड नाही. आता मार्गदर्शन करायचे म्हणजे, कुठल्या विषयावर करायचे? राजकारणी लोक कुठल्याही विषयावर मार्गदर्शन करतात. बोलण्याची जी प्रक्रिया सुरू होते, ती संपता संपत नाही आणि अरे थांब, अरे थांब म्हणेपर्यंत लोक बोलत राहतात. दशक्रिया विधी दोन, चार तास चालतात, यामुळे ग्रामस्थ नाराज झाले. आजूबाजूच्या चार-पाच ग्रामपंचायतींनी आधीच ठराव घेतला होता की, आपल्याकडे दशक्रिया विधीच्या वेळेला कुठलीही भाषणे होणार नाहीत.
जो आत्मा गेलेला आहे आणि दशक्रिया विधी म्हणजे त्याचा स्वर्गाच्या दिशेने अंतिम प्रवास सुरू झाला, त्यावेळेला त्या आत्म्याचाही तळतळाट घेऊन भाषण करून घेतात की काय, अशी शंका वाटते. कधी असे होऊ शकते की, एखाद्या माणसाचा दशक्रिया विधी खूप वेळ रंगला, तर दशक्रिया विधीमध्ये आणखी एक महत्त्वाचा भाग असतो. तो म्हणजे कावळ्याने येऊन काकस्पर्श करणे. पाच-दहा मिनिट वेळ या गोष्टीसाठी लागतो. तेवढा वेळ थांबणे अपेक्षित आहे. कावळा येतो, स्पर्श करून जातो, तरी यांची भाषणे सुरूच. त्यामुळे नंतर दहा-बारा कावळे येऊन सगळे अन्न फस्त करून जातात; पण यांची भाषणे काही संपत नाहीत. त्याला ग्रामस्थ कंटाळले आणि त्यांनी शेवटी इथून पुढे दशक्रिया विधीच्या वेळेला कुठल्याही प्रकारची भाषणे करण्यावर बंदी आणली. एखाद्या दशक्रिया विधी असेल, बारसे असेल, डोहाळे जेवण असेल, मुंज असेल, लग्न असेल यावेळी राजकारणी लोक संधी साधून घेतात; कारण अशावेळी जास्तीत जास्त लोकांना भेटण्याची संधी मिळते.
आपण म्हणतो ना आपल्या भाषेत की, मरणाला आणि तोरणाला माणसांनी सोबत असले पाहिजे. तोरणाला म्हणजे घरामध्ये तोरण लागते तेव्हा नवीन कार्य होते, तेव्हा लग्नकार्य होते आणि मरणाला म्हणजे कोणाचा मृत्यू होतो, अशा वेळेला प्रसंगी उपस्थित असले पाहिजे. राजकारणी लोक तातडीने त्या ठिकाणी जातात किंवा मी प्रत्येक वेळी जनतेच्या सोबत प्रत्येक क्षणाला आहे, असे दाखवतात. कधी कधी प्रश्न पडतो की, डोहाळे जेवणाला राजकारणी लोक काय करतात?
हे लोक मग त्यांच्या बायकांना पाठवतात. आमदार साहेबांच्या मिसेस आल्या होत्या; मग तेवढीच त्या घराची प्रतिष्ठा वाढते. अशा पद्धतीने जर राजकारणी लोकांनी आपल्याला ज्या ठिकाणी मॉब मिळेल तिथे भाषण करायला सुरुवात केली, तर नजीकच्या काळामध्ये घरबंदी, गावबंदी नव्हे; तर राजकारणी लोकांना जिल्हाबंदी पण होऊ शकते, याचे भान कुणी ठेवणार आहे की नाही? अनेकांना अनेक तास बोलण्याची सवय असते, त्यांना कितीही थांबवले तरी ते बोलतच राहतात.