लवंगी मिरची : फराळाचा आग्रह!

लवंगी मिरची : फराळाचा आग्रह!
Published on
Updated on

अरे काय मित्रा, किती तुझा आग्रह? दिवाळी सुरू झाल्यापासूनच घोशा लावला आहेस, दिवाळी संपली की फराळाला ये म्हणून. काय, एवढं काय विशेष आहे? आणि किती फोन केलेस? आज तर ये म्हणून सकाळपासून तब्बल पाच फोन केले आहेस तू मला. वाटले काही इमर्जन्सी आहे की काय? पण फोन उचलला की तुझे एकच, फराळाला ये.

अरे, तसे विशेष काही नाही. आमच्या घरची प्रथाच आहे तशी आणि हे काही तुझे पहिलेच वर्ष नाही माझ्या घरी फराळाला येण्याचे. जवळपास आठवे वर्ष आहे. तू दिवाळी संपली की दोन-तीन दिवसांमध्ये फराळाला येतोस, या वेळेला थोडा उशीर केलास पण आलास हे महत्त्वाचे.

अरे तुझा फोन आला आणि मी आलो नाही असे कधी होईल काय? पण हे आग्रह करून फराळाला बोलवायचं नेमकं काय कारण आहे मला कळू तरी देशील?

अरे विशेष काही नाही. आमच्या हिला फराळ तयार करायची फार आवड आहे. तिच्या आईने म्हणजे सासूबाईंनी तिला शिकवले आहे की, फराळ कधीही विकत आणायचा नाही. त्यामुळे होतं काय की, कधी कधी तिचा अंदाज चुकतो आणि फराळ जास्त होतो. बाकी हिचा फराळ कोणत्या चवीचा असतो याविषयी मी फारसे बोलणार नाही. तुला प्रत्यय येईलच. या वेळेला काय झालं की, नेमका चिवडा जास्त झाला आणि चकल्या पण भरपूर उरल्या आहेत. आता या उरलेल्या चिवड्याचे आणि चकल्यांचे काय करायचे? मग ही म्हणते तुमच्या मित्रांना बोलवा म्हणून.
अरे छान असतो तुझ्याकडचा फराळ. यावर्षी लाडू केले नाहीत का?

अरे लाडू केले होते. पण ते इतके घट्ट आणि कडक झाले की, ते दाताने कोरून खाण्याची वेळ आली. शेवटी भरपूर उरलेले लाडू आणि बराचसा चिवडा हिने आमच्या घरी कामाला येतात त्या मोलकरणींना देऊन टाकला. त्यातील एका मोलकरणीने दुसर्‍या दिवशी ते सगळे लाडू परत आणले, हिच्यासमोर ठेवले आणि म्हणाली… बाई, लाडू फुटंनात. माझा नवरा म्हनला पुढच्या वेळेला बाईंना म्हण लाडूबरोबर एक लहान कुर्‍हाडपण द्या म्हणून.

अच्छा म्हणजे लाडू कसेबसे संपले. चिवडा आणि चकल्या उरल्या म्हणून तू मला बोलावलेस? अरे पण चुकलं तुझं. छान झालेलं दिसतंय सगळं. पाहिल्याबरोबर कोणालाही मोह होईल खाऊन टाकावा म्हणून. चकल्या घे, चिवडा घे. सगळे छान झालेले आहे. केवळ चकल्या थोड्या वातड झालेल्या आहेत. म्हणजे बराच वेळ चघळाव्या लागतात. चिवडा पण छान झाला आहे. पण नेमके काय झाले की आम्ही चिवडा केला त्या दिवशी पावसाळी वातावरण होते. चिवडा करून तसाच कढईमध्ये ठेवून दिला. थोडक्यात म्हणजे बंद हवेच्या डब्यात ठेवायचे आमची ही विसरून गेली. आज तुझ्याबरोबरच आणखी चार-पाच मित्रांना बोलवले होते, पण तू एकटाच आलास.

अरे मग तर फारच चांगले केलेस. आमच्या कॉलनीमधील दोन ज्येष्ठ नागरिकांना बोलावले होते. ते आमच्या घरी फराळाला आले आणि दुसर्‍या दिवशीच आमच्या हिला प्रत्येकी दोनशे रुपये बक्षीस देऊन गेले. झाले असे की, त्यांना त्यांच्या दाढा काढायच्या होत्या, त्याचा खर्च तब्बल आठ हजार रुपये प्रत्येकी येणार होता. ते आमच्या घरी आले आणि चकल्या, चिवडा चघळताना अलगद त्यांच्या दाढा हातात येऊन पडल्या. पैसे वाचले म्हणून उड्या मारत गेले. तुझी पण दाताची ट्रीटमेंट कॅन्सल कर आणि आमच्या घरचा फराळ कर. तू पण उद्या येऊन आमच्या घरी पाचशे रुपये बक्षीस देऊन जाशील याची मला खात्री आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news