फेसबुक : ध्रुवीकरणाची प्रक्रिया कशी घडते? | पुढारी

फेसबुक : ध्रुवीकरणाची प्रक्रिया कशी घडते?

- मोहसीन मुल्ला

भारतीय क्रिकेट संघाने टी-20 वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तानविरुद्धचा सामना हरल्यानंतर भारतीय खेळाडूंविरोधात टीकेची राळ उठली. त्यातही मोहम्मद शमीला मुस्लिम असल्याने मोठ्या प्रमाणावर लक्ष करण्यात आले. शमीची बाजू घेणार्‍या कर्णधार विराट कोहलीलाही ट्रोल केले गेले. एका कंपनीच्या ‘जश्न ए रिवाज’ या दिवाळीसाठीच्या जाहिरात कॅम्पेनलाही उर्दू शब्दांमुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागला. तर सारा अली खान आणि इतर काही मुस्लिम अभिनेत्री किंवा अभिनेते हिंदू उत्सवात सहभागी होतात, तेव्हा मुस्लिम कट्टरपंथीय त्यांना टीकेचे लक्ष्य करतात. समाजात वाढत असलेल्या या ध्रुवीकरणाचे सर्वांत महत्त्वाचे कारण आहे ते सोशल मीडिया. फेसबुक आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ज्या पद्धतीने काम करतात, त्यातून समाजात ध्रुवीकरण वाढण्यासाठी मोठा हातभार लागतो. फेसबुकच्या कार्यपद्धतीतून आपण ही ध्रुवीकरणाची प्रक्रिया कशी घडत आहे, हे समजून घेऊ.

फिल्टर बबल

फेसबुकचे मिशन स्टेटमेंट काय आहे? लोकांना कम्युनिटी उभी करण्याचे सामर्थ्य देणे आणि जग अधिकाधिक जवळ आणणे; पण प्रत्यक्ष घडते आहे उलट. जग अधिकाधिक जवळ येण्यापेक्षा समाजात फूट पडू लागली आहे. फेसबुकमुळे जी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्याला लेखक एली प्रेजर यांनी ‘फिल्टर बबल’ असे नाव दिले आहे. त्यांचे या विषयावर पुस्तकही प्रसिद्ध झाले आहे.

‘फिल्टर बबल’ नेमका आहे तरी काय?

फेसबुकचे अल्गोरिदम आपल्याला जो मजकूर आवडतो आणि जो मजकूर आपण शेअर करण्याची शक्यता आहे, तशाच प्रकारचा मजूकर आपल्याला जास्तीत जास्त दाखवतो. अशांना विरुद्ध विचारसरणीचा फार कमी मजकूर दिसतो. त्यामुळे जे खुल्या मतप्रवाहाचे समर्थन करतात, त्यांना अधिकाधिक मजकूर तशा प्रकारचा दिसेल. जे शाकाहारी आहेत, त्यांना शाकाहारी पदार्थांच्या बाजूने असणारा मजकूर जास्तीत जास्त मिळेल. जे उजव्या विचारांचे आहेत, त्यांना उजव्या विचारांना पोषक मजकूर जास्त दिसेल. म्हणजे आपल्या विरोधी विचारसरणीचा मजकूर आपल्यापर्यंत फार कमी पोहोचतो. त्यामुळे स्वतःच्याच वैचारिक बुडबुड्यात आपण अडकतो. या बुडबुड्याला ‘फिल्टर बबल’ असे नाव दिले गेले आहे. हा ‘फिल्टर बबल’ तुम्हाला विरोधी विचारांपासून बाजूला करतो. आणि हे सामाजिक ध्रुवीकरणाचे प्रमुख कारण आहे.

तुमचे मित्र कोण?

फेसबुकच्या विश्वात तुमचे मित्र कोण असले पाहिजे, हे फेसबुकने सुचविलेल्यांतून आपण ठरवतो. एक प्रकारे आपले मित्र फेसबुकचे अल्गोरिदम ठरवत असतात. आपल्याला काय आवडते, हे मित्रांपेक्षा जास्त चांगले कुणाला माहिती असू शकत नाही. त्यामुळे न्यूज फीडमधील मजकूर हे आपल्या मित्रांनी काय शेअर केले आहे, काय कमेंट केले आहे, यावरून ठरते. एकाच विचारसरणीच्या फेसबुक मित्रांकडून एकाच विचारप्रवाहाचा मजकूर आपल्या फीडमध्ये येऊन पडत असतो.

विचारांवर नियंत्रण कुणाचे?

अमेरिकेतील लेखक फ्रँकलीन फॉर यांनी ‘वर्ल्ड विदाऊट माईंड’ या पुस्तकात म्हटले आहे की, गेल्या अनेक शतकांत अभियंत्यांनी शारीरिक श्रमाचे ऑटोमेशन करण्यात यश मिळवले; पण नव्या अभियंत्यांना विचारांना ऑटोमेट करायचे आहे. मानवी विचार करण्याच्या प्रक्रियेवर अल्गोरिदम कसा प्रभाव टाकत आहेत ते फॉर यांनी सांगितले आहे. आपण आपली बौद्धिक प्रक्रिया काही कंपन्यांना आऊटसोर्स करत आहोत, असे फॉर म्हणतात. अनेक लोकांना असे काही अल्गोरिदम असतात तेच माहिती नाही, आणि ज्यांना माहिती आहे त्यातील अनेकांना अल्गोरिदममुळे फार काही फरक पडतो, असे वाटत नाही.

फेसबुकचा भावनिक प्रभाव किती?

सोशल सायकॉलॉजी कशी काम करते आणि ती कशी प्रभावित करता येऊ शकते, याचे गमक फेसबुकला उलगडले आहे. फेसबुक वापरकर्त्यांना स्वतःबद्दल जितकी माहिती आहे, त्यापेक्षा थोडी जास्तच माहिती फेसबुकला वापरकर्त्यांबद्दल असते. वापरकर्त्याने काय लाईक केले यावरून फेसबुक त्या वापरकर्त्याचा वंश, लैंगिक कल, रिलेशनशिप स्टेटस याबद्दल अचूक अंदाज करू शकतो. अमेरिकेत 2010 च्या मिडटर्म इलेक्शनमध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी फेसबुकने ‘आय व्होटेड’ हे स्टिकर लाँच केले होते. या उपक्रमामुळे पूर्वीच्या तुलनेत मतदानाची टक्केवारी वाढली. ज्या युजर्सनी ‘आय व्होटेड’ हे स्टिकर वापरले, त्यांच्यामुळे पीअर प्रेशर निर्माण होऊन इतरांनीही मतदान केल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. यातून फेसबुकचा भावनिक प्रभाव कशा प्रकारे निर्माण होऊ शकतो, हे दिसून येते. मतदानाची टक्केवारी वाढणे हा जरी चांगला भाग असला तरी एखाद्या खासगी कंपनीला इतका मोठा प्रभाव टाकण्याचे सामर्थ्य असणे हे जास्त धोकादायक आहे. सोशल सायकॉलॉजीवरील फेसबुकचा प्रभाव आणि ‘फिल्टर बबल’ या दोन्हींचा एकत्रित विचार केला तर सामाजिक ध्रुवीकरण वाढण्यात सोशल मीडिया कसे कारणीभूत आहे, हे समजून येते.

Back to top button