एक महिन्याचे विध्वंसपर्व | पुढारी

एक महिन्याचे विध्वंसपर्व

हमास आणि इस्रायलच्या संघर्षाला बघता बघता एक महिना उलटून गेला. गाझामध्ये इस्रायलने केलेल्या आक्रमणामुळे अवघे जग चिंताक्रांत बनले आहे. प्रचंड संख्येने मानवी संहार आणि मानवी हक्कांचे खुलेआम दमन होत असताना कथित महासत्तांनी डोळ्यावर कातडे ओढून घेतले. एरव्ही कुठे छोटीशी घटना घडली, तरी त्यासंदर्भात प्रतिक्रिया देऊन आपणच जणू जगाचे फौजदार आणि मानवी हक्कांचे रखवालदार असल्याचा आव आणणार्‍या सगळ्या शक्ती सुट्टीवर गेल्यासारखे चित्र आहे. रशिया आणि युक्रेन युद्धाच्या निमित्ताने चीनसारखा अपवाद वगळता बहुतेक जग एका बाजूला आणि रशिया एका बाजूला असे चित्र होते. इथे परिस्थिती पूर्ण वेगळी आहे.

अरब आणि मुस्लिम राष्ट्रे एका बाजूला आणि बाकीची एका बाजूला असे चित्र आहे. त्या अर्थाने इथे धार्मिक विभाजन झालेले दिसते आणि ते जगाच्या द़ृष्टीने धोकादायक ठरणारे आहे. हमासने आगळीक केली आणि सार्‍या जगालाच वेठीस धरले आहे, याबद्दल कुणाच्याही मनात शंका नाही. त्यामुळे अपमानित इस्रायलने प्रतिहल्ला केला आणि ते स्वाभाविक होते. त्यातून गाझामध्ये जो काही संहार सुरू आहे, तो जगाच्या इतिहासातील एक काळा अध्याय म्हणून नोंदला जाईल. या देशांच्या हिंस्रतेचे चित्र विदारक आहे. हमासने इस्रायलवर केलेला हल्ला हा दहशतवादी हल्ला होता आणि त्याचे समर्थन कधीच कुणी केलेले नाही, ते करता येणार नाही. त्याचा त्याचवेळी निषेधही नोंदवला गेला. परंतु, शेवटी हमास ही दहशतवादी संघटना आहे आणि इस्रायल हा स्वतंत्र देश आहे, हे लक्षात घ्यावे लागेल.

दहशतवादाचा बंदोबस्त वा बिमोड करण्यासाठी इस्रायलने स्वीकारलेला मार्ग त्याचमुळे वादात सापडला आहे. आक्रमक इस्रायलपुढे हमासही नमायला तयार नाही. त्यातून दोन्हीकडील माणसे मारली जात आहेत. परंतु, त्याहीपेक्षा चिंता करायला लावणारी गोष्ट म्हणजे अमेरिकावादी राष्ट्रांनी या नरसंहाराबाबत बाळलेले मौन. या संघर्षात अमेरिका इस्रायलला मदत करीत आहे, तो त्या देशाच्या धोरणाचा भाग असला, तरी जिथे निरपराधांचे बळी जाताहेत तिथे महासत्तेने हस्तक्षेप करायला पाहिजे. परंतु, अमेरिकेने तिथे सोयीस्कररीत्या तटस्थता राखली आहे, जी त्या देशाच्या इभ—तीला शोभणारी नाही. बिल क्लिंटन, बराक ओबामा यांच्यासारख्या राष्ट्राध्यक्षांनी अशा प्रसंगांमध्ये मानवतेच्या हिताच्या भूमिका घेतल्या. डोनाल्ड ट्रम्प कितीही आक्रस्ताळे असले, तरीही अमेरिकेने कोणत्या प्रसंगात कसे वागायचे, याचे नेमके भान त्यांना होते. जो बायडेन मात्र सभ्यपणाचा मुखवटा लावून नेभळटपणा दाखवत आहेत. अफगाणिस्तानचा ताबा तालिबानकडून घेतला जात असताना त्यांनी अशीच पलायनवादी भूमिका स्वीकारली होती, याची आठवण इथे आल्यावाचून राहत नाही.

अलीकडेच गाझापट्टीतील युद्धात अडकलेल्या एका छोट्या मुलीचा व्हिडीओ व्हायरल झाला. एखादा देश, एखादा समूह एकटा पडल्यानंतर तिथल्या सामान्य माणसांच्या वेदना काय असू शकतात, याचे प्रातिनिधिक दर्शन त्यातून घडते. त्या छोट्या मुलीने उपस्थित केलेले प्रश्न आणि व्यक्त केलेली वेदना जगाला व्याकूळ करते. एकूणच गाझापट्टीतील नागरिकांचे होणारे हाल आणि त्याचे माध्यमांमधून समोर येणारे चित्र कुणाही संवेदनशील माणसाची झोप उडवणारे आहे. आपण कोणत्या जगात वावरत आहोत आणि आपल्या अवतीभवती काय घडत आहे, हे सगळेच विलक्षण आहे.

सात ऑक्टोबरच्या भल्या सकाळी हमासने इस्रायलवर केलेला हल्ला अभूतपूर्व होता. कोणत्याही युद्धाचा अंतिम परिणाम विनाशात होत असतो. हमासने पहिला हल्ला करत मोठी चूक केली. त्याला प्रत्युत्तर देताना इस्रायलने पॅलेस्टाईनवर केलेला प्रतिहल्ला तेवढाच निकराचा ठरला. हमासच्या हल्ल्यात इस्रायलमधील सुमारे चौदाशे लोक ठार झाले आणि दोनशे लोकांना त्यांनी ओलिस ठेवले. इस्रायलकडून केल्या गेलेल्या हल्ल्यात दहा हजारांहून अधिक लोक ठार झाले. अमानवी आणि मानवी संवेदना हेलावून सोडणारे म्हणजे ठार झालेल्यांमध्ये चार हजारांहून अधिक लहान मुले आहेत. ज्या मुलांनी हे जग नीट पाहिलेले नाही अशा निष्पाप मुलांना युद्धात प्राण गमावावे लावण्याएवढी दुर्दैवी घटना अन्य कुठली असू शकत नाही. हे इस्रायललाही ठाऊक आहे आणि जगभरातील राष्ट्रांनाही त्याची कल्पना आहे.

गाझामध्ये दर दहा मिनिटाला एका लहानग्याचा मृत्यू होत आहे, यावरून तेथील मृत्यूचे तांडव किती भीषण आहे याची कल्पना येऊ शकते. इस्रायलमधील जखमींची संख्या 5,400 आणि गाझामधील जखमींची संख्या पंचवीस हजारांहून अधिक आहे. गाझामधून सुमारे अडीच हजार लोक बेपत्ता असून त्यातील निम्म्याहून अधिक लहान मुले आहेत. बॉम्ब हल्ल्यामुळे अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या असून त्या ढिगार्‍याखाली अडकलेल्यांची संख्या मोठी असल्याचे सांगण्यात येते.

गाझामधील दोन लाखांहून अधिक इमारतींचे नुकसान झाले आहे. हमासने इस्रायली आणि इतर देशांच्या मिळून 242 लोकांना ओलिस ठेवले असून त्यात तीस मुले असल्याचा दावा इस्रायलने केला आहे, तर ओलिस ठेवलेल्यांपैकी 57 लोक इस्रायलने केलेल्या बॉम्ब हल्ल्यात ठार झाल्याचे हमासने म्हटले. गाझामधील निम्म्याहून अधिक लोकसंख्येला आपली घरे सोडून सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा लागला. गाझापट्टीमध्ये बावीस लाख लोक राहत असून त्यात निम्मी संख्या लहान मुलांची आहे. संयुक्त राष्ट्र आणि पॅलेस्टाईनच्या आकडेवारीनुसार गाझामधील पंधरा लाख लोक महिनाभरात विस्थापित झाले. या काळात 46 पत्रकारांना प्राण गमावावे लागले. विस्थापित लोकांनी शाळा, धार्मिक स्थळे, इस्पितळे किंवा सार्वजनिक इमारतींमध्ये आश्रय घेतला. इतका सगळा विध्वंस आणि निष्पापांचा संहार सुरू असताना संयुक्त राष्ट्रासारख्या संघटनाही हतबल बनल्याचे चित्र दिसते. ते नक्कीच आशादायक नाही आणि नव्या प्रश्नांना जन्म घालणारे आहे. हे धोरण मानवतेच्या मारेकर्‍यांना आणि युद्धखोरांना फूस लावणारे आहे.

Back to top button