भाजपच्या जनाधाराचा विस्तार | पुढारी

भाजपच्या जनाधाराचा विस्तार

सुरेश पवार

महाराष्ट्रातील 2,359 ग्रामपंचायतींच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. त्यात भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक ग्रामपंचायतींत कमळ फुलवले. भाजपच्या जनाधाराचा विस्तार होत असल्याचा हा संकेत म्हणावा लागेल. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काकांवर मात केल्याचे वास्तव समोर आले आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटाची पीछेहाट झाल्याचे निकालावरून दिसून येते. राज्यात एकूण 28,813 ग्रामपंचायती आहेत. त्यापैकी 2,359 म्हणजे सुमारे आठ टक्के ग्रामपंचायतींत निवडणुकीची रणधुमाळी झाली. ही टक्केवारी तुलनेने कमी वाटत असली, तरी त्यांचे निकाल दिशादर्शक आहेत, असा तर्क करता येतो.

ग्रामपंचायतीच्या निवडणुका या प्रामुख्याने स्थानिक पातळीवरच आणि स्थानिक प्रश्नावरच लढल्या जातात. उमेदवाराचे कर्तृत्व, त्याची प्रतिमा याला महत्त्व दिले जाते आणि गावागावांतील परंपरागत गटाचाही पगडा असतो. राष्ट्रीय प्रश्नांचा फारसा विचार होत नाही. राज्य पातळीवरील प्रश्नही उपस्थित होत नाहीत. मराठा आरक्षणाचे आंदोलन ऐन भरात होते; पण ग्रामपंचायतीच्या कक्षेत हा विषय येत नसल्याने त्याचाही फारसा परिणाम या निवडणुकीवर होण्याची शक्यता नव्हती. मराठवाड्यात या आंदोलनाची धग अधिक होती. बीड, छ. संभाजीनगर, लातूर, नांदेड, परभणी या जिल्ह्यांतील ग्रामपंचायतींमध्ये प्रामुख्याने फारसा सत्तापालट झालेला नाही. आंदोलनाचा या निवडणुकीवर म्हणावा तसा परिणाम झाला नाही, असे म्हणता येते. ग्रामीण भागातील वारे कसे वाहत आहे, याचा अंदाज या निवडणूक निकालावरून बांधता येतो. वार्‍याची दिशा भाजपच्या बाजूने असल्याचा निष्कर्ष धाडसाचा ठरणार नाही.

भाजपचा जनाधार वाढला

राज्यातील सुमारे नऊ कोटी मतदारांच्या तुलनेत या निवडणुकीतील मतदार संख्या खूपच मर्यादित असली, तरी त्यातून काही आडाखे बांधता येतात. 2,359 ग्रामपंचायतींपैकी 293 ग्रा.पं. निवडणुका बिनविरोध झाल्या. उर्वरित 2,066 पैकी भाजप, अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गट यांनी तब्बल 1,336 ग्रामपंचायतींवर झेंडा फडकावला. म्हणजे 70 टक्के ग्रा. पं. वर महायुतीची सत्ता आली. या 1,336 पैकी निम्म्यापेक्षा अधिक म्हणजे 715 ग्रामपंचायतींत कमळ फुलले. म्हणजे निवडणूक झालेल्या 2,036 पैकी 35 टक्के ग्रामपंचायती भाजपने जिंकल्या. भाजपचा जनाधार वाढल्याचे हे चिन्ह मानता येईल.

अजित पवार गटाची बाजी; शरद पवारांना धक्का

बारामती तालुक्यातील 31 पैकी 29 ग्रा.पं.वर वर्चस्व मिळवून अजित पवार यांनी शरद पवार यांना चांगलाच धक्का दिला आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 425 ग्रा. पं. वर विजय मिळवला, तर शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षाला 187 ग्रा.पं. वर कब्जा करता आला. शरद पवार यांचा ग्रामीण भागावर असलेल्या प्रभावावर या निकालाने परिणाम होण्याची शक्यता आहे.

ठाकरे गटाची पीछेहाट

शिवसेना ठाकरे गटाची या निवडणुकीत पीछेहाट झाल्याचे दिसत आहे. शिंदे गटाने 265 ग्रामपंचायती जिंकल्या, तर ठाकरे गटाला त्या तुलनेने निम्म्यापेक्षा कमी म्हणजे 115 ग्रामपंचायती राखता आल्या.

काँग्रेसपुढे आव्हान

एकूण निवडणुकीपैकी 244 ग्रामपंचायतीत काँग्रेस पक्षाला यश मिळवता आले. ग्रामीण भागातील या पक्षाच्या प्रभाव क्षेत्रात भाजपने मुसंडी मारल्याचा हा संकेत असू शकतो. आगामी निवडणुकीमध्ये काँग्रेसला थेट आव्हानाला तोंड द्यावे लागणार आहे.

बीआरएसचा चंचुप्रवेश

तेलंगणाच्या सीमावर्ती महाराष्ट्राच्या भागात बी.आर.एस. भारत राष्ट्र समितीने दहा ग्रामपंचायती जिंकून चंचुप्रवेश केला आहे. आगामी निवडणुकांत बी.आर.एस.चे प्रामुख्याने काँग्रेस पक्षाला आव्हान होऊ शकेल. ग्रामपंचायत निवडणुकांचा तसा कल दिसत आहे.

Back to top button