लवंगी मिरची : गावगाड्यातील धुरळा..!

लवंगी मिरची : गावगाड्यातील धुरळा..!

ग्रामपंचायत निवडणुका नुकत्याच सर्वत्र पार पडल्या. या निवडणुकांमध्ये जेवढे चैतन्य असते, तेवढे तर लोकसभेच्या निवडणुकीतसुद्धा नसते. कारण इथे सगळेच एकमेकांना ओळखत असतात. अटीतटीने या निवडणुका लढवल्या जातात. काही काही गावांमध्ये तर संपूर्ण गावच एकमेकांचे भावकी असते. त्या सर्वांची आडनावे एकच असतात. त्यामुळे भावकीमध्ये जसे सर्वत्र घडते तसाच संघर्ष येथे ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये पाहायला मिळतो. पूर्वीच्या काळी सरपंचपदाला फार मोठा मान असे. सगळे गाव हे सरपंचाच्या ऐकण्यामध्ये असायचे. सरपंच जर जिल्ह्याच्या शहराला गेले तर तेथील आमदार, खासदारसुद्धा उठून उभे राहायचे.

सरपंच सांगेल त्याला लोकसभेत आणि विधानसभेत मतदान करायचे हे गावाचे ठरलेले असायचे. थोडक्यात म्हणजे गाव सरपंचाच्या ऐकण्यात असायचा. काळ बदलला तसे सरपंचपदाचे ग्लॅमरपण निघून गेले. सरपंचाच्या ऐकण्यामध्ये त्याच्या घरचेसुद्धा असतील की नाही, याचीपण आजकाल त्याला स्वतःलाच शंका असते. शिवाय शेजारची घरे आणि भावकी यांचा तर विरोधच असतो. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये दीर आणि भावजय, जावा-जावा, सासवा-सुना, भाऊ-भाऊ; इतकेच काय, क्वचित नवरा-बायको पण वेगवेगळ्या पॅनलकडून उभे असतात आणि एकमेकांच्या विरोधात लढत असतात.

ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या. त्यानंतर काल त्याचे निकालही लागले. निकाल लागल्यानंतर गाव साधारणत: दोन महिने धुमसत असते. आपल्या उमेदवाराला पाडण्यासाठी कोणी काय कारस्थाने केली असतील याची चर्चा घरोघर होत असते. संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर ग्रामपंचायत निवडणुकांनंतर किमान पाच-पन्नास टाळकी फुटत असतील हे नक्की. आपण पडल्याचा राग मनात धरून आज ना उद्या शेतात, रस्त्यात किंवा जिथे सापडेल तिथे निवडून आलेल्या उमेदवाराला किंवा त्याच्या जवळच्या कार्यकर्त्यांना चांगल्यापैकी चोप दिला जातो. त्याशिवाय पराभूत उमेदवाराचा आत्मा शांत होत नाही.

आपल्या देशात लोकशाही आहे आणि ती जर सर्वात कुठे जिवंत असेल तर ती ग्रामीण भागात असते. ग्रामीण भागामध्ये दोन महत्त्वाच्या निवडणुका असतात. एक म्हणजे ग्रामपंचायत आणि दुसरी म्हणजे सोसायटीची निवडणूक. आजकाल ग्रामपंचायतीमध्ये फारसा पैसा राहिलेला नाही. निवडणुकीसाठी खर्च केलेला पैसा येत्या पाच वर्षांत भरून निघेल अशी अजिबात शक्यता नाही. तरीही प्रतिष्ठेसाठी या निवडणुका प्रतिष्ठेच्या केल्या जातात. एकदाचे सरपंच अमुक तमुक असे आपल्या नावापुढे लागले की, त्या व्यक्तीला आकाश ठेंगणे वाटायला लागते. पुढे यथावकाश सरपंचपद गेले तरी माजी सरपंच ही पदवी कोणीही काढून घेऊ शकत नाही.

पुढे प्रत्येक लग्नपत्रिकेमध्ये त्या व्यक्तीच्या नावापुढे 'मा' काढून टिंब दिलेले असते. त्या मा.चा अर्थ माननीय किंवा माजी सरपंच असा असतो. या निवडणुकांमध्ये पक्षीय विचार फारसा नसतो. दिल्लीमध्ये मोदी खूप चांगले काम करत असतील तरी त्याचा परिणाम गावातील मतदानावर होईल असे अजिबात नसते. गावात मतदान करताना आपल्या जवळचा, लांबचा, भावकीतला, विरोधी पार्टीतला, नेहमीच्या बैठकीतला असा विचार करून उमेदवार निवडला जातो. एकदाचे ग्रामपंचायत इलेक्शन संपले की पाच वर्षांनंतर पुन्हा येणार्‍या इलेक्शनची तयारी लगेच सुरू होते. दोन महिने टाळके फोडाफोडी आणि नंतर गळाभेटी आणि पाच वर्षांनंतर पुन्हा निवडणुका या चक्रामध्ये गावगाड्यातील धुरळा बाराही महिने गावाच्या शिवारात उडत असतो.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news