उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका : शाब्दिक गलिच्छता आणि सारवासारव | पुढारी

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका : शाब्दिक गलिच्छता आणि सारवासारव

श्रीराम जोशी

उत्तर प्रदेश च्या विधानसभा निवडणुका जसजशा जवळ येऊ लागल्या आहेत, तसतसे त्या राज्यातले राजकीय वातावरण जास्तच गढूळ होऊ लागले आहे. यावेळच्या रणधुमाळीत शाब्दिक गलिच्छपणा नव्या टोकावर गेला, तर आश्चर्य वाटावयास नको.

उत्तर प्रदेश च्या रणांगणात सत्ताधारी भाजप विरुद्ध अखिलेश यादव यांची सपा अशी मुख्य लढत आहे. कमकुवत असलेला मायावती यांचा बसपा आणि प्रियांका गांधी-वधेेरा यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसने हुंकार भरला असला, तरी हे दोन्ही पक्ष किती जागा खेचून आणणार, हा प्रश्नच आहे. निवडणुकीचा काळ म्हणजे काहीही बोलण्याचा काळ असल्यासारखे विविध पक्षांचे नेते प्रक्षोभक विधाने करीत आहेत.

काँग्रेसचे सलमान खुर्शीद, रशीद अल्वी, सपाचे अखिलेश यादव, एमआयएमचे असदुद्दीन ओवैसी यांचा त्यात प्रामुख्याने समावेश आहे. कधीकाळी देशाचे परराष्ट्रमंत्री राहिलेले काँग्रेसचे नेते सलमान खुर्शीद यांनी हिंदुत्वाची तुलना कट्टर इस्लामिक दहशतवादी संघटना इसिस आणि बोको हरामसोबत करून टाकली. इसिसने गेल्या पाच-सहा वर्षांत इराक, सीरिया, अफगाणिस्तान आणि इस्लामबहुल देशांमध्ये अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे. लाखो निरपराध लोकांच्या कत्तली या संघटनेने केलेल्या आहेत.

दुसरीकडे बोको हराम ही नायजेरियातील इस्लामिक दहशतवादी संघटना आहे. नायजेरियाला गेल्या दशकभरात पूर्णपणे अस्थिर करण्याचे काम केलेली बोको हराम ही आफ्रिका खंडातील सर्वात क्रूर दहशतवादी संघटना आहे. इसिस आणि बोको हरामसोबत हिंदुत्वाची तुलना खुर्शीद यांनी केली. खुर्शीद यांनी हे विधान जाणीवपूर्वक केले असावे, असे म्हणण्यास वाव आहे. कारण, काँग्रेस नेतृत्वाकडून त्याचे थेट खंडन करण्यात आलेले नाही.

यामुळेच भाजपने या मुद्द्यावरून काँग्रेसला झोडपण्यास सुरुवात केली असली, तरी त्यामुळे काँग्रेस फारशी विचलित झाल्याचे दिसत नाही. याचे कारण काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी हिंदू आणि हिंदुत्व असे शाब्दिक कोडे टाकत खुर्शीद यांच्या विधानाचे एकप्रकारे समर्थनच करण्याचे काम केले आहे. उत्तर प्रदेश ची निवडणूक तोंडावर असताना भाजपच्या हाती यामुळे मोठे कोलीत लागले आहे.

काँग्रेस सुरुवातीपासूनच कशी हिंदूविरोधी आहे, हे पटवून देण्याची सुरुवात भाजप नेत्यांनी केली आहे. खुर्शीद यांनी काही वर्षांपूर्वी शीखविरोधी दंगलीचे जोरदार व खुलेआम समर्थन केले होते. त्यावेळीही त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती. काँग्रेसमध्ये खुर्शीद यांना विरोध झाला नाही, असे नाही. सध्या पक्षाने बाजूला सारलेल्या गुलाब नबी आझाद यांनी तर हिंदुत्वाची इसिस व बोको हरामसोबतची तुलना करणे साफ चुकीचे असून ती अतिशयोक्ती असल्याचे म्हटले आहे.

काँग्रेसचेच आणखी एक नेते रशीद अल्वी हेही ‘जय श्रीराम’ घोषणेवरून वादात अडकले आहेत. “जय श्रीराम’ म्हणणारे सर्वच साधुसंत नाहीत. काही राक्षसही आहेत,’ असे ते म्हणाले. काँग्रेसला या वक्तव्यांचे निवडणुकीत काय फळ मिळणार, हे येणारा काळच सांगू शकेल.

तिकडे समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनीसुद्धा भारत तोडणार्‍या मोहम्मद जिना यांना राष्ट्रनायक संबोधून खळबळ उडवून दिली. स्वातंत्र्याची धामधूम सुरू असताना एकीकडे जिना हे धर्माच्या नावावर देश तोडण्याच्या कामात मग्न होते, तर दुसरीकडे असंख्य राजघराण्यांना भारतात सामील करण्यासाठी सरदार वल्लभभाई पटेल अहोरात्र झटत होते. असे असताना पटेल व जिना हे राष्ट्रनायक होते, असे सांगत यादव यांनी नव्या वादाला तोंड फोडले.

ठरावीक वर्गाची मते प्राप्त करण्यासाठी तर त्यांनी हा बाण सोडला नसावा, अशी शंका येण्यास वाव आहे. मुस्लिम मतांसाठी प्रत्येक जिल्ह्यात पायपीट करीत असलेले एमआयएमचे ओवैसी यांच्यासह काँग्रेस आणि बसपाची मुस्लिम मतांसाठी लागलेली स्पर्धा यामुळे आता अखिलेश यांनादेखील या संघर्षात उतरावे लागले असावे, असे वाटते.

राजस्थानमध्ये संतुलन साधण्याचा प्रयत्न

पंजाब काँग्रेसमध्ये झालेल्या दुफळीची पुनरावृत्ती राजस्थानसारख्या मोठ्या राज्यात होऊ नये, यासाठी काँग्रेस हायकमांडने कंबर कसली आहे. असंतुष्ट सचिन पायलट यांनी गेल्या आठवड्यात हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेत आपले म्हणणे मांडले. तत्पूर्वी, मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी प्रियांका गांधी-वधेरा यांची भेट घेतली होती. उत्तर प्रदेशपाठोपाठ राजस्थानच्या राजकारणात प्रियांका यांनी लक्ष घातल्याचे हे लक्षण आहे. 2023 ला राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत.

राज्यात भाजप सुस्थितीत नसल्याची काँग्रेसला पूर्ण कल्पना आहे. त्यामुळेच कोणत्याही परिस्थितीत पंजाबसारखा धोका पक्ष नेतृत्व राजस्थानात पत्करण्यास तयार नाही. आगामी मंत्रिमंडळ विस्तारावेळी पायलट गटाच्या नेत्यांना संधी दिली जाणार काय, हे पाहणे महत्त्वाचे राहील. ज्या लोकांनी संघर्ष केला, त्यांना संधी मिळालीच पाहिजे, असा स्पष्ट उच्चार पायलट यांनी केला. त्यामुळे प्रदेश काँग्रेसच्या द़ृष्टीने येत्या काही दिवसांतील घडामोडी या महत्त्वपूर्ण राहणार आहेत.

अनुराग ठाकूर मुख्यमंत्री?

हिमाचल प्रदेशात मंडी लोकसभा, तसेच तीन विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीत भाजपला काँग्रेसकडून सपाटून मार खावा लागला. काँग्रेस पक्षात ज्याप्रमाणे गटबाजी पाहावयास मिळते, तशीच परिस्थिती सध्या हिमाचल प्रदेश भाजपमध्ये आहे. त्याचे दुष्परिणाम सध्या पक्षाला भोगावे लागत आहेत. पुढील वर्षी राज्यात विधानसभा निवडणूक आहे. त्यामुळेच जयराम ठाकूर यांना मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याच्या चर्चेने वेग घेतला आहे.

गेल्या काही महिन्यांपूर्वी भाजपने गुजरात आणि उत्तराखंडमध्ये अनपेक्षितपणे मुख्यमंत्री बदलले. अंतर्गत आढावा घेऊन हे बदल केले होते. हिमाचलच्या पोटनिवडणुकीचे विश्लेषणही पक्षाकडून सुरू आहे. त्यात जर विद्यमान नेतृत्वाच्या अनुषंगाने धोक्याचा इशारा दिसून आला, तर जयराम ठाकूर यांना हटवून अती आक्रमक नेते अशी ओळख असलेल्या केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांना मुख्यमंत्रिपदाची संधी दिली जाऊ शकते. याबाबतचे चित्र अर्थातच येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल.

Back to top button