भारताचे मानवतावादी पाऊल

भारताचे मानवतावादी पाऊल
Published on
Updated on

इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध संघर्षामुळे गाझापट्टीमध्ये परिस्थिती अत्यंत बिकट बनली आहे. तिथल्या लोकांना ना आवश्यक गोष्टी नीट मिळत आहेत ना उपचार मिळत आहेत. अशा स्थितीत संकटग्रस्त पॅलेस्टाईनमध्ये औषधे आणि आपत्ती निवारण साहित्याची खेप पाठवून भारताने मानवतावादी आणि लोकशाही मूल्यांच्या बाजूने असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.

इतिहासात डोकावल्यास आजवर कोणत्याही देशात असे कोणतेही संकट आले की, भारताने तिथे मदतीचा हात पुढे केला आहे. कोरोनाच्या काळात जगातील अनेक देशांना औषधे आणि लसींची गरज असताना भारताने त्यांना मुक्तहस्ते आणि उदार अंतःकरणाने मदत केली. विशेष म्हणजे, त्यावेळी प्रगत, पाश्चिमात्य राष्ट्रे आत्मकेंद्री बनली होती. कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन औषधांचा आणि लसींचा साठा करत होती. परिणामी, तिसर्‍या जगातील गरीब देशांना लसी मिळणे दुरापास्त झाले होते. अशा वेळी भारताने अब्जावधी लसींचा पुरवठा करून या देशांना संजीवनी दिली. आताच्या संघर्षादरम्यान पंतप्रधान मोदींनी पॅलेस्टिनी राष्ट्राध्यक्षांना मदतीचे आश्वासन दिले होते. पॅलेस्टाईनशी भारताचे नेहमीच सौहार्दपूर्ण संबंध राहिले आहेत. पॅलेस्टाईनच्या सार्वभौमत्वाबाबत आणि लोकशाही हक्कांच्या बाजूने भारत नेहमीच उघडपणाने भूमिका घेत आला आहे. मात्र, इस्रायलवर हमासने हल्ला केल्यावर भारताने इस्रायलच्या पाठीशी उभे राहण्याची घोषणा केली आणि या हल्ल्यातील पीडितांबाबत संवेदना व्यक्त केल्या. यामुळे भारताने आपली पारंपरिक भूमिका बदलल्याचे विचित्र वातावरण विरोधकांकडून निर्माण करण्यात आले.

जागतिक पटलावरही भारताच्या हितशत्रूंनी अशा प्रकारची मांडणी करण्याचा प्रयत्न केला; पण जेव्हा गाझाच्या अल अहली हॉस्पिटलवर हल्ला झाला, ज्यात सुमारे पाचशे लोक मारले गेले आणि शेकडो जखमी झाले तेव्हा पंतप्रधानांनी पॅलेस्टाईनच्या राष्ट्राध्यक्षांशी फोनवर बोलून शोक व्यक्त केला आणि त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. त्या आश्वासनाची पूर्तता करून औषधे आणि आपत्ती निवारण साहित्याची पहिली खेपही रवाना करण्यात आली आहे. भारताने आता पॅलेस्टाईनच्या मूलभूत हक्कांबाबत आपल्या बाजूने कोणताही बदल केला नसल्याचे स्पष्ट केले आहे. पॅलेस्टाईनचे सार्वभौमत्व कायम राहून त्यांना त्यांची हक्काची जमीन मिळाली पाहिजे, असेही पंतप्रधानांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते. भारताची इस्रायलशी जवळीक काही काळापासून वाढली आहे. विशेषतः तांत्रिक बाबींमध्ये इस्रायलचे सहकार्य भारतासाठी मोलाचे राहिले आहे.

पाकिस्तान व काश्मीरचा मुद्दा याबाबत इस्रायलने नेहमीच भारताची पाठराखण केली आहे. त्यामुळे पॅलेस्टाईन आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या संघर्षात भारत इस्रायलच्या पाठीशी उभा राहिला, यात गैर काही नव्हते. भारत नेहमीच दहशतवादाच्या विरोधात राहिला आहे आणि जगातील कोणत्याही व्यासपीठावर, जिथे जिथे संधी मिळाली तिथे दहशतवादाविरुद्ध सामूहिक लढा देण्याची मागणी भारत करत आला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या व्यासपीठावरून भारत सातत्याने ही मागणी लावून धरत आला आहे. त्यामुळे हमासच्या हल्ल्याला विरोध करताना भारताने इस्रायलबद्दल सहानुभूती व्यक्त केली. आता जेव्हा मुद्दा पॅलेस्टाईनच्या हक्काचा आहे तेव्हा भारत पुन्हा नेहमीप्रमाणे संकटकाळातील पाठीराखा म्हणून आपली भूमिका बजावत आहे. आजचे जग आर्थिक आणि व्यापारी संबंधांच्या आधारावर गटांमध्ये विभागले गेले आहे आणि यामध्ये शक्तिशाली देश नेहमीच एकत्र राहिले आहेत. अमेरिका उघडपणे इस्रायलच्या पाठीशी उभी आहे. भारताचे अमेरिका आणि इस्रायल या दोन्ही देशांशी घनिष्ठ संबंध आहेत. असे असूनही भारताने केवळ व्यापारी, आर्थिक संबंधांना प्राधान्य दिले नाही, तर मानवी आणि लोकशाही मूल्यांचे महत्त्वही लक्षात घेऊन त्यानुसार पावले उचलली आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news