लवंगी मिरची : दोस्ती आणि दुश्मनी | पुढारी

लवंगी मिरची : दोस्ती आणि दुश्मनी

काय सांगतोस मित्रा, सध्या आपला शेजारी देश पाकिस्तान पार शोक सागरात बुडून गेला आहे! भारताकडून जबर पराभव करून घेतल्यानंतर थोडाफार सावरतो न सावरतो तोच अफगाणिस्तानने त्यांना मार दिला. अरे, क्रिकेटचं बोलतोय, वर्ल्ड कपचं! लागोपाठ हार पत्करल्यामुळे पाकिस्तानवर शोककळा पसरली असून तेथील नागरिक हसणे विसरून गेल्याचे वृत्त हाती आले आहे.

अरे, क्रिकेटमध्ये हरणे म्हणजे प्रत्यक्ष युद्धामध्ये हरणे, अशी ज्या देशातील नागरिकांची धारणा असते ना त्यांना कोणीही वाचवू शकत नाही. वर्ल्डकप सुरू होण्यापूर्वी ‘भारत हमारा दुश्मन देश हैं’ असे म्हणणारे पाकिस्तानी तसे खिलाडू वृत्तीचे कधीच नव्हते. भारतात आल्यानंतर भारताच्या पट्टीच्या क्रिकेट खेळाडूंनी पाकिस्तानला चारीमुंड्या चीत केले आणि हे प्रक्षेपण पाहणारे पाकिस्तानी नागरिक यांनी चिडून अनेक टीव्ही फोडले; पण मला याचे आश्चर्य वाटले की, भारताकडून पराभूत होण्यापेक्षा अफगाणिस्तानकडून झालेला पराभव त्यांच्या जास्त जिव्हारी लागलेला दिसतो.

भारतीय प्रेक्षकांनी अफगाण खेळाडूंना मैदानात भरपूर सपोर्ट केला. म्हणजे पाकिस्तान हरावे ही तमाम भारतीयांची इच्छा इथे पुन्हा प्रकट झाली आणि त्याप्रमाणे हरल्यानंतर अफगाण खेळाडूंनी संपूर्ण स्टेडियमवर फिरत भारतीय प्रेक्षकांना मानवंदना दिली. त्यात पुन्हा भारताचा माजी गोलंदाज इरफान पठाण याने अफगाणिस्तानच्या दुसर्‍या पठाणाबरोबर विजयाचा आनंद व्यक्त केला. आता दोन पठाणांना एकमेकांच्या जिंकण्याचा आनंद झाला असेल आणि त्यांनी तो भरस्टेडियमवर नाच करून साजरा केला असेल, तर त्यात वावगे काही नव्हते; पण आधीच चिडलेल्या पाकिस्तानच्या ओल्या जखमेवर त्यामुळे मीठ चोळले गेले आणि संपूर्ण पाकिस्तानभर एक नैराश्याची लाट पसरत गेली. आपले खेळाडू कसे मूर्ख आहेत, त्यांचा जागतिक दर्जाच नाही, इतका मूर्ख कॅप्टन दुसरा कोणी असू शकत नाही, आठ-आठ किलो मटण खाऊन सुस्त झाले आहेत, यांना फिल्डिंगसाठी पळणे होत नाही अशा विविध आरोपांनी पाक खेळाडू त्रस्त झाले. पूर्वी पराभव झाला, तर एकमेकांच्या देशात काय प्रतिक्रिया आहेत, याचा अंदाज येत नसे; परंतु आता सोशल मीडियामुळे काही क्षणांत तिकडच्या किंवा इकडच्या पब्लिकच्या प्रतिक्रिया तत्काळ जगभर पसरतात.

संबंधित बातम्या

मला एक सांग, अफगाणिस्तान जिंकला याचा भारताला का आनंद झाला असेल? हे बघ, अफगाणिस्तानसाठी भारताचा सक्रिय हात आहे. म्हणजे बघ त्यांच्याकडे मैदाने आणि स्टेडियम नसल्यामुळे भारताने वर्षभर त्यांना आपले स्टेडियम उपलब्ध करून दिले होते. अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी जो सराव केला तो भारतातच केला आहे, हे पहिल्यांदा लक्षात घे आणि दुसरी गोष्ट म्हणजे अफगाणिस्तानच्या या संघ उभारणीमध्ये माजी भारतीय क्रिकेटपटू अजय जडेजा याचा फार मोठा सहभाग आहे. अजय जडेजा हा आपल्या काळचा अत्यंत प्रसिद्ध आणि विविध देशांच्या विरुद्ध खेळलेला खेळाडू आहे. त्याला प्रत्येक देशाचे कमकुवत दुवे माहीत आहेत. ते सर्व ओळखून त्याने आपल्या संघाची बांधणी केली आहे. अफगाणिस्तानच्या संघाला उभा करणारा एक भारतीय खेळाडू असल्यामुळे साहजिकच भारताची सहानुभूती अफगाणिस्तानच्या बाजूने होती आणि अफगाणिस्तानचा विजय म्हणजे आपलाच विजय असे समजून भारतीय प्रेक्षकांनी तो साजरा केला. यात पाकिस्तानची नाचक्की झाली, याला अगदीच भारताचा नाईलाज होता. शेवटी खेळ हा खेळ आहे आणि तो खेळायचा असतो.

– झटका

Back to top button