पर्यावरणस्नेही वाहनांची निर्मिती व्हावी! | पुढारी

पर्यावरणस्नेही वाहनांची निर्मिती व्हावी!

रंगनाथ कोकणे, पर्यावरण अभ्यासक

कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी जगभरात जीवाश्म इंधनाचे ज्वलन किमान पातळीवर आणण्यावर भर दिला जात आहे. यासाठी वीजेवर चालणार्‍या वाहनांच्या प्रचार-प्रसारावर सर्वच देश मोठ्या प्रमाणावर भर देत आहेत. त्याचा पर्यावरणावरील परिणाम हा कोणत्या प्रकारच्या वीजेपासून चार्जिंग केले जाते, यावर अवलंबून आहे. बहुतांश देशातील वीज ही सध्या पर्यावरणस्नेही नाही. कोळशावर आधारित वीज निर्मिती केंद्रे प्रदूषणकारी आहेत. त्यामुळे पर्यावरणासाठी ईव्ही हा शेवटचा पर्याय नाही. त्यावरचा तोडगा हा समाधानकारक जीवनशैली, गाड्यांचा संतुलित वापर तसेच वाहतुकीच्या पद्धतीतील बदल यात आहे.

भारताने 30 टक्के खासगी मोटारी, 70 टक्के व्यावसायिक मोटारी तसेच 80 टक्के दोन आणि तीनचाकी वाहने 2030 पर्यंत वीजेवर चालविण्याचे महत्त्वाकांक्षी ध्येय केंद्र सरारने निश्चित केले आहे. हे ध्येय गाठण्यासाठी सरकार ईव्ही-व्हेईकलच्या खरेदीदारांना आणि निर्मात्यांना अनेक प्रकारचे प्रोत्साहन देत आहे. यात अंशदान, करात सवलत आदी गोष्टींचा समावेश आहे. ईव्ही व्हेईकलबाबतीत अतिउत्साह दाखविण्याऐवजी पुरेशी काळजी घेत पुढे वाटचाल करणे कसे गरजेचे आहे, हा आहे. पर्यावरणावर एखाद्या वाहनाचा पडणार्‍या परिणामाचे आकलन हे त्याचे उत्पादन, संचालन, उपयोग तसेच स्क्रॅपिंग यावर अवलंबून असते.

उत्पादनाचा प्रश्न येतो तेव्हा ईव्हीच्या निर्मितीच्या वेळी होणार्‍या कार्बन उत्सर्जनच्या प्रमाणाचे आकलन करायला हवे. यासाठी वाहनांचे सुटे भाग आणि त्यासाठी लागणारा कच्चा माल याचाही विचार करायला हवा. पेट्रोल आणि डिझेलवरची वाहने किंवा ईव्ही तयार करताना बॅटरी वगळता, जवळपास सर्व उत्पादनांत सारख्या प्रमाणात कार्बनडाय ऑक्साईड (सीओटू) सोडला जातो. मात्र ईव्ही बॅटरीच्या निर्मितीने उर्त्सजनाचे प्रमाण अधिकच होते. बॅटरी हा ईव्हीचा महत्त्वाचा भाग आहे. निर्मिती करताना प्रत्येक बॅटरीमागे किलोवॉट प्रतितास 150 किलो सीओटू सोडला जातो. एक सरासरी ईव्ही प्रती किलोमीटर 0.20 केडब्ल्यूएच खर्च करते आणि 300 किलोमीटरपर्यंत चालणार्‍या चांगल्या ईव्हीसाठी बॅटरीची क्षमता 60 केडब्ल्यूएच असणे अपेक्षित आहे.

कच्च्या मालात रेअर अर्थ मटेरियल जसे लिथियम, नियोडियमबरोबरच तांबे, कोबाल्ट, अ‍ॅल्यूमिनिअम, निकेल, मॅगनिंग आणि ग्रॅफाईटचा समावेश आहे. रेअर अर्थ मटेरियल हे काही देशांतच उपलब्ध आहे. लिथियम बॅटरीमध्ये वापरले जाणारे जस्तसारखे तत्त्व हलके असते आणि त्यामुळे विद्युतप्रवाह वेगाने होतो. सध्याच्या काळात ऑस्ट्रेलियात लिथियम हा सर्वात मोठा पुरवठादार आहे. एकूण जागतिक साठ्यात बोलिव्हिया, चिली, अर्जेंटिना हा ‘लिथियम त्रिकोण’ जगातील निम्म्या उत्पादनाला जबाबदार आहे. सध्याच्या काळात जागतिक पातळीवर लिथियम आयर्न बॅटरीच्या निर्मितीत चीनचा वाटा 77 टक्के असून, जगातील सर्वात मोठ्या दहा कंपन्यांपैकी सहा कंपन्या चीनमध्ये आहेत.

भारत सध्याच्या काळात आपले संपूर्ण लिथियम ऑस्ट्रेलिया आणि अर्जेंटिनावरून आयात करते आणि लिथियम आयन सेलची 70 टक्के गरज ही चीनकडून भागविण्यात येते. राजस्थान तसेच जम्मूत लिथियमचा साठा अलीकडेच सापडल्याने, भारत भविष्यात या घटकाच्या उत्पादनात आघाडीचा देश ठरू शकतो. ‘थॉम्सन रायटर्स’च्या एका अभ्यासातून, एका चांगल्या स्थितीतही म्हणजे 2040 मध्ये जगातील रस्त्यावर निम्म्यापेक्षा अधिक वाहने हे जीवाश्म इंधनाचीच असतील. मात्र विक्री करणारी सर्व वाहने ही ईव्हीचेच असतील. त्यामुळे ‘सीओटू’ उत्सर्जन सुमारे 40 टक्के कमी होईल. परंतु ईव्हीच्या चार्जिंगसाठी वीजेची मागणी वाढेल. त्यासाठी 2050 पर्यंत 3 हजार टेरावॉट अधिक वीजेची गरज भासेल. पर्यावरणासाठी ईव्ही हा शेवटचा पर्याय नाही. त्यावरचा तोडगा हा समाधानकारक जीवनशैली, गाड्यांचा संतुलित वापर तसेच वाहतुकीच्या पद्धतीतील बदल यात आहे.

Back to top button