लवंगी मिरची : गाडी बाजूला घ्या..! | पुढारी

लवंगी मिरची : गाडी बाजूला घ्या..!

प्रत्येक परिस्थितीचे काही विशिष्ट डायलॉग असतात. उदाहरणार्थ, निळू फुले यांचा चित्रपट असला की, त्यांचा तो प्रसिद्ध डायलॉग सगळ्यांना पाठ आहे आणि तो म्हणजे ‘बाई वाड्यावर या.’ मध्यंतरी पत्रकार बंधूंना ढाब्यावर जेवू घालण्याची सूचना एका नेत्याने कार्यकर्त्यांना केली आणि तो म्हणजे ‘दादा, धाब्यावर या.’ समजा, आपण वाहन चालवत असतो. आपली काही चूक असते किंवा नसते; पण समोरील ट्राफिक हवालदार आपल्याला सूचना करतो आणि ती म्हणजे काय, गाडी बाजूला घ्या. आपण त्याला हातवारे करून सांगतो की, साहेब, माझे काही चुकलेले नाही. पण तो ऐकायला तयार नसतो. त्याचा एकच धोशा असतो आणि तो म्हणजे, आधी गाडी बाजूला लावा. म्हणजे एकदा का गाडी बाजूला लावली की, चर्चा करता येते आणि चर्चेमधून मार्ग निघत असतात, हे सर्वांनी मान्य केले आहे. अर्थात, याला अपवाद आहे तो म्हणजे हमास आणि इस्रायलमधील युद्ध. ते काही चर्चेने सुटेल असे वाटत नाही.

आम्हास प्रश्न पडला की, गाडी बाजूला घ्या असे का म्हणत असतील? किंवा बरेचदा आपण बाहेरगावी प्रवास करत असतो. तिथे रस्त्यामध्ये आरटीओचे पथक असते. पोलिस इन्स्पेक्टरसारखे दिसणारे आरटीओचे इन्स्पेक्टर उभे असतात आणि ते ट्रकवाले, मोठ्या वाहनांचे चालक यांच्याबरोबर काही ना काही तोडगा काढण्यासाठी समजूतदारपणे वाटाघाटी करत असतात. आता या तोडगा काढण्याच्या प्रक्रियेला काही लोक तोडपाणी म्हणतात, त्याला इलाज नाही. आपल्याकडे कितीही चांगल्या मार्गाने काम केले, तरी नाव ठेवणारे लोक आहेतच. समजा, ट्रक बाजूला घेतला आणि त्याच्याबरोबर काही वाटाघाटी चालू आहेत, तर दोन्ही पक्ष म्हणजे ट्रकवाला आणि आरटीओ यांच्या चेहर्‍यावरील हावभाव पाहिले तर असे लक्षात येईल की, वाटाघाटी योग्य दिशेने चालू आहेत आणि त्यावर तोडपाणी माफ करा, तोडगा निघून काही वेळातच सर्व काही मिटवून तो ट्रक मार्गस्थ होईल. शेवटी एकदाची देवाण-घेवाण होते.

ट्रकवाला साहेबांना नमस्कार करतो. साहेब ‘चल निघ,’ असे म्हणून त्याला सांगतात आणि दोघेही आपापल्या कामासाठी पुढे मोकळे होतात. गाडी बाजूला घेण्यास सांगण्याचे आणखी एक कारण म्हणजे, जे काय व्हायचे ते रस्त्याच्या कोपर्‍यात होत असते. शिवाय रस्त्यावरच उभे राहून वाटाघाटी करण्यामध्ये वेळ गेला तर इतर वाहनांना अडथळा होण्याची शक्यता असते. त्यामुळे गाडी बाजूला घ्या, हा आरटीओ यंत्रणेचा आग्रह असतो. सुज्ञ लोक गाडी बाजूला घ्या, अशी सूचना आल्याबरोबर कागदपत्रे आणि इतर गोष्टींमध्ये काही ना काहीतरी त्रुटी असते ती आठवत, साधारणतः दोन एक हजार रुपयांची तरतूद करून ठेवतात.

संबंधित बातम्या

जोपर्यंत हे गोडीगुलाबीत चालू असते तोपर्यंत काही वाटत नाही; परंतु तीन दिवसांपूर्वी ‘समृद्धी’ महामार्गावर झालेल्या अपघातामध्ये असाच काहीसा प्रकार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे, हे मात्र भयानक आहे. ‘समृद्धी’ महामार्गावर कोणतेच वाहन थांबणे अपेक्षित नाही. अशा वेळी तेही रात्री एका ट्रकचा पाठलाग करून आरटीओच्या पथकाने त्याला ट्रक बाजूला घ्यायला सांगितला आणि तो बाजूला उभा असलेला ट्रक पाठीमागून प्रवाशांनी भरून येत असलेल्या वाहनाला दिसला नाही आणि त्याला धडकून भीषण अपघात झाला. आता यात चूक कुणाची, याची चर्चा आणि चौकशी होईल. चौकशी होऊन बहुधा कोणालाही शिक्षा होणार नाही आणि झाली तरी किरकोळ असेल. परंतु कोणा सरकारी अधिकार्‍यांचा किरकोळ मोह काही लोकांचा जीव घेऊन शांत झाला असेल का, याची शंका वाटते.

Back to top button