साखरपुड्याची हिऱ्याची अंगठी झाली स्वस्त, दरात मोठी घसरण, जाणून घ्या अधिक | पुढारी

साखरपुड्याची हिऱ्याची अंगठी झाली स्वस्त, दरात मोठी घसरण, जाणून घ्या अधिक

- परनीत सचदेव, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ

हिरा सर्वात मौल्यवान गुंतवणुकीचे साधन म्हणून राहिला आहे. सामान्यांसाठी तो आवाक्याबाहेरचा असला तरी हिरा उद्योगात होणारी उलाढाल मोठी आहे. सीएनबीसीच्या अहवालानुसार, 2022 नंतर नैसर्गिक हिर्‍यांच्या मागणीत बरीच घट झाली आहे. एवढेच नाही; तर ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, डी बियर्स या हिरा उत्पादनातील अग्रगण्य जागतिक कंपनीने लोकप्रिय असलेली साखरपुड्याची दोन ते चार कॅरेटची अंगठी आणि तीही पैलू न पाडलेली, त्याची किंमत ही 40 टक्क्यांपर्यंत कमी केली आहे.

हिरा उत्पादनातील जगातील सर्वात मोठी कंपनी असणार्‍या डी बियर्सने एक घोषणा करत आपली प्रसिद्ध जाहिरात ‘हीरा है सदा के लिए’ ही मोहीम जगभरात पुन्हा राबविणार असल्याचे जाहीर केले. सुमारे दीडशे वर्षांपासून जगातील हिर्‍याच्या बाजारावर अधिराज्य गाजविणार्‍या या मोठ्या कंपनीला पुन्हा 1930 रोजीची जाहिरात पुन्हा बाहेर का काढाविशी वाटली? यासाठी आपल्याला दक्षिण आफ्रिकेकडे जावे लागेल. 1860 चे दशक. आजच्या किंबर्ली शहराजवळ निकोलास आणि डीडरिक डी बियर्सची शेती होती. या शेतीत दोन खाणींचे उत्खनन करण्यात आले. त्यातून लाखमोलाच्या गोष्टी बाहेर काढण्यात आल्या आणि त्याची विक्री होऊ लागली. वास्तविक, या खाणी अजूनही आहेत; मात्र त्यातून हिरे निघत नाहीत. ब्रिटानिकाच्या मते, 1871 मध्ये इंग्रज उद्योजक सेसिल रोड्स यांनी पहिल्यांदा डी बियर्सच्या हिर्‍याच्या खाणी खरेदी केल्या आणि नंतर दक्षिण आफ्रिकेतील जवळपास सर्वच खाणी खरेदी केल्या. 1888 मध्ये त्यांनी ‘डी बियर्स कन्सोलिटेड माइन्स लिमिटेड’ची स्थापना केली आणि जगभरात हिर्‍यांच्या वितरणावर नियंत्रण मिळवले. 1890 मध्ये डायमंड सिंडिकेट तयार झाले आणि तेच पुढे सेंट्रल सेलिंग आर्गनायजेशन (सीईएसओ) यात परावर्तीत झाले. या आर्थिक आणि मार्केटिंग कंपनीने जगभरातील हिर्‍यांच्या व्यापारावर वर्चस्व मिळवले. आता डायमंड ट्रेडिंग कंपनी (डीटीसी) नावाने ओळखले जाते.

हिर्‍यांच्या खाणीपासून वितरणापर्यंत डी बियर्स वेगवेगळ्या मार्गाने हिर्‍यांच्या व्यापार्‍यावर नियंत्रण ठेवते. 1930 च्या दशकांत मंदीच्या काळात हिर्‍याची मागणी घसरली. अनेक खाणी बंद कराव्या लागल्या होत्या. तेव्हा एनडब्ल्यूएअर अँड सन नावाच्या जाहिरात कंपनीने ‘हीरा है सदा के लिए’ ही घोषणा केली आणि ती परिणामकारक ठरली. हिर्‍याला सामाजिक प्रतिष्ठा मिळाली. डी बियर्स आणि त्याच्या सहकारी कंपन्यांनी नेहमीच जगभरात हिर्‍याचा अधिकाधिक पुरवठा केला आणि त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न केले. डी बियर्सच्या प्रभावामुळेच साखरपुड्याला हिर्‍याची अंगठी देण्याची परंपरा सुरू झाली. एवढेच नाही, तर या अंगठीच्या किमतीची बरोबरी ही दोन महिन्यांच्या पगाराशी करण्यात आली. ‘द वॉशिंग्टन पोस्ट’ने एकदा डी बियर्सबाबत लिहिले की, हिर्‍याचे उत्खनन, वितरण आणि मूल्य निश्चित करणारे हे एक जागतिक पातळीवरचे कार्टल आहे. त्यामुळे या कंपनीला द कस्टोडियन अशीही उपाधी मिळाली. आता सर्वकाही बदलले आहे. ‘सीएनबीसी’च्या अहवालानुसार, 2022 नंतर नैसर्गिक हिर्‍यांच्या मागणीत बरीच घट झाली आहे. तर ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, डी बियर्सने लोकप्रिय असलेली साखरपुड्याची दोन ते चार कॅरेटची अंगठी आणि तीही पैलू न पाडलेली, त्याची किंमत ही 40 टक्क्यांपर्यंत कमी केली आहे. ग्लोबल रफ डायमंड प्राईस इंडेक्स हे काही महिन्यांत 186 च्या उच्च स्तरावरून 155 वर आला आहे. त्याचे कारण काय? तर पहिले कारण म्हणजे जागतिक महागाई आणि आर्थिक मंदी पाहता, लोकांकडे रोकड राहिलेली नाही. कोरोनानंतर ते प्रवासावर अधिक खर्च करत आहेत. दुसरे म्हणजे ऑस्ट्रेलिया आणि रशियात अन्य हिर्‍याच्या कंपन्यांची झालेली सुरुवात. डी बियर्स हे एके काळी जगाच्या एकूण पुरवठ्यापैकी 80 टक्क्यांपेक्षा अधिक बाजार नियंत्रण करत. गेल्या दोन दशकांत त्याचा वाटा घसरून एक तृतीयांशच राहिला. रशियाच्या अलरोसा ही कंपनी स्पर्धा करत आहे. 2022 मध्ये जागतिक कच्च्या हिर्‍यांचे उत्पादन 118 दशलक्ष कॅरेट होते. पैकी अलरोसा समूहाने 35.6 दशलक्ष कॅरेट उत्पादन केले. त्यानंतर रियो टिंटो (ऑस्ट्रेलिया)सारखे अन्य प्रतिस्पर्धीही आहेत.

आता प्रयोगशाळेत तयार होणारे हिरेही (एलजीडी) बाजारात आले आहेत. प्रयोगशाळेत विकसित हिर्‍यांचे उत्पादन दोन तंत्राने केले जाते. एक उच्च दाब उच्च तापमान (एचपीएचटी) आणि दुसरे म्हणजे रासायनिक बाष्प गोळा करणे (सीव्हीडी). भारतात सीव्हीडी तंत्रज्ञानाचा वापर करत प्रयोगशाळेतील हिरे या क्षेत्रातील सर्वात मोठ्या उत्पादनापैकी एक आहे. या हिर्‍यांचा वापर दागिन्यांसाठी केला जातो. याशिवाय संगणकाची चिप्स, उपग्रह, फाईव्ह-जी नेटवर्कमध्ये त्याचा वापर होतो.

भारत जगातील हिर्‍यांना पैलू पाडणे आणि प्रक्रिया करणारे प्रमुख केंद्र आहे. मात्र पैलू न पडलेले हिरे आणि प्रक्रिया करणार्‍या मशिनची आयात करावी लागते. केंद्रीय अर्थसंकल्पात 2023-24 मध्ये एलजीडी मशिन तयार करण्यासाठी, संशोधन करण्यासाठी आयआयटी मद्रासला पाच वर्षांसाठी अनुदान देण्यात आले आहे. वाणिज्य मंत्रालयानुसार, जागतिक पातळीवरील प्रयोगशाळेत तयार होणार्‍या हिर्‍यांच्या दागिन्यांचा बाजार 2020 मध्ये एक अब्ज डॉलर होता आणि तो 2025 पर्यंत पाच अब्ज डॉलरवर जाणार आहे. तो 2035 पर्यंत 15 अब्ज डॉलरपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे. भारत यात मोठा हिस्सा मिळवू इच्छित आहे. युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशियाच्या हिर्‍यावर बंदी कशी घालावी, यावर चर्चा करण्यासाठी जी-7 चे प्रतिनिधी मंडळ भारतात येत आहे. यामागचे कारण म्हणजे जगातील 90 टक्केपेक्षा अधिक हिर्‍यांचा व्यापार या ठिकाणी होतो आणि दुसरे म्हणजे युक्रेनच्या राष्ट्रीय भ्रष्टाचार निवारण एजन्सीने जगातील सर्वात मोठे हिर्‍यांना पैलू पाडणार्‍या आणि निर्यात करणार्‍या कंपनीपैकी एक भारताच्या श्री रामकृष्ण एक्स्पोर्टस्ला आंतरराष्ट्रीय युद्ध पुरस्कृत कंपनीच्या यादीत ठेवले आहे. असे म्हटले जाते की, एसआरके (रामकृष्ण एक्स्पोर्ट)ने 2022 मध्ये रशियन कंपनी अलरोसाकडून 3.8 अब्ज डॉलर किमतीचे हिरे आयात केले. पण रशियाच्या तेल आणि गॅस निर्यातीच्या तुलनेत हे 3.8 अब्ज नगण्यच आहेत. त्यामुळे जी-7 की यात्रा ही वास्तवात युक्रेनबाबत होणार नाही म्हणून हिर्‍यांच्या किमतींबाबत तर चर्चा हेाण्याची शक्यता कमीच आहे.

Back to top button