सिक्कीम जलप्रलयाची कारणमीमांसा! | पुढारी

सिक्कीम जलप्रलयाची कारणमीमांसा!

रंगनाथ कोकणे, पर्यावरण अभ्यासक

काही दिवसांपूर्वी सिक्कीममध्ये झालेल्या ढगफुटीनंतर आलेल्या पुराचा 40 हजारांहून अधिक जणांना फटका बसला आहे. चार जिल्ह्यांतील 25 हजार जणांना बेघर होण्याची वेळ आली असून चुंगथान धरण फुटले आहे. या संकटामागचे मुख्य कारण म्हणजे ‘ग्लेशियर लेक आऊटबस्ट फ्लड’ आहे. हिमननदीच्या सरोवराची पातळी विक्रमी प्रमाणात वाढते तेव्हा हे संकट आपसूक येते. मोठ्या प्रमाणात पाणी परिसरातील नद्यांत आणि ओढ्यात जाते आणि अचानक पूर येऊन ते संकटाचे कारण बनतात.

गेल्या दशकभरात ढगफुटी आणि अतिवृष्टीमुळे शहरे जलमय होण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. विशेषतः निसर्गाची देणगी लाभलेल्या हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या गावांवरही आता पुराचे सावट राहू लागले आहे. अलीकडेच सिक्कीम येथे झालेला जलप्रलय ताजे उदाहरण आहे. या भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यमार्ग क्रमांक दहा बंद पडल्याने, या भागातील रस्ते खचल्याने तसेच दळणवळण व्यवस्था कोलमडून पडल्याने देशाच्या अन्य भागांशी संपर्क तुटला. परिणामी, मदत अणि बचाव पथकांनाही अडचणींचा सामना करावा लागला. सुमारे तीन हजार पर्यटक यामध्ये अडकून पडल्याने त्यांना बाहेर काढण्यासाठी लष्कराला पाचारण करावे लागले. तिस्ता नदीच्या काठावर असलेल्या औषधी कंपन्या, जलविद्युत प्रकल्प आणि बरदांग येथील लष्कराच्या छावणीला बरेच नुकसान सहन करावे लागले आहे.

सिक्कीममध्ये आलेल्या पुराचा आतापर्यंत सुमारे 41 हजार 870 जणांना फटका बसला आहे. चार जिल्ह्यांतील 25 हजार जणांना बेघर होण्याची वेळ आली असून चुंगथान धरण फुटले आहे. तिस्ता नदीच्या काठावर राहणार्‍या सुमारे 20 ते 22 हजार नागरिकांना अन्य ठिकाणी बस्तान न्यावे लागले. सुमारे 6 हजार 675 जणांना मदत शिबिरात नेण्यात आले. या राज्यातील 1 हजार 320 पेक्षा अधिक घरांची हानी झाली आहे. मंगन, पाक्योंग, नामची आणि गंगटोक जिल्ह्यातील बाजार, पूल, कालवे, रस्त्यांची हानी झाली आहे. एकट्या जलपायगुडी जिल्ह्यातील 11 हजार जणांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात प्रशासनाला यश आले आहे. या जलप्रलयादरम्यानच्या बचाव कार्यात लष्कराच्या छावणीतील 41 वाहने चिखलात रुतून बसली होती. सिक्कीमध्ये 42 जणांचे मृतदेह हाती लागले आहेत. तथापि, लष्कराच्या 13 जवांनासह 142 जण बेपत्ता आहेत. राज्याचे मुख्यमंत्री प्रेमसिंह तमांग यांच्या मताशी सहमती दर्शविली तर धरणाच्या कामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्यामुळे राज्यात जलप्रलय आल्याचे बोलले जात आहे. प्रत्यक्षात ढगफुटी झाल्याने या भागात धोकादायक स्थिती निर्माण झाली. महापुरामुळे सिक्कीममधील 1200 आणि 550 मेगावॅट क्षमतेचे दोन जल विद्युत प्रकल्प पाण्यात गेले.

या संकटामागचे मुख्य कारण म्हणजे ‘ग्लेशियर लेक आऊटबस्ट फ्लड’आहे. ल्होनक सरोवर दुथडी भरून वाहिल्याने तिस्ता नदीची पातळी वाढली आणि चुंगथांग धरणावर ताण येऊन ते फुटले. सिक्कीमच्या चुंगथाम भागातील ल्होनक हे हिमसरोवर फुटल्याने या भागात महापूर आल्याचे सांगितले जात आहे. हे सरोवर ल्होनक ग्लेशियरपासून तयार झाले आहे. त्याला हिमनदी असेही म्हटले जाते. आताची आपत्ती ही नैसर्गिक संकट असली, तरी ती अचानक आली, असेही म्हणता येणार नाही. केंद्रीय जल आयोगाचे अधिकारी हे सिक्कीममधील महापुराला नेपाळ आणि भारतात आलेला भूकंप जबाबदार असल्याचे सांगत आहे. असे असले तरी आणखी एक सत्य नाकारता येत नाही आणि ते म्हणजे 168 हेक्टर क्षेत्रावर व्यापलेले सरोवर हे अगोदरपासूनच असुरक्षित होते आणि तशी घोषणाही झालेली आहे. हवामान बदलाशिवाय मानवी घडामोडींही या घटनांना कारणीभूत आहेत. गरजेपेक्षा अधिक इंधनाचा वापरही अशा घटनांना निमंत्रण देत आहे. ग्लेशियर वितळत असल्याने उंच पर्वतरांगांत वेगाने कृत्रिम सरोवरे तयार होऊन ती फुटण्याचा धोका राहील. पर्वताच्या पायथ्याशी किंवा कुशीत असलेल्या नागरी वस्तींसाठी हा मोठा धोका आहे. म्हणूनच तापमानवाढ आणि हवामान बदलाच्या परिप्रेक्ष्यातून अशा संकटांचा विचार करणे गरजेचे आहे.

Back to top button